बाळ होणार या जाणीवेनं होणारा आनंद गरोदरपणात स्त्रीला नवीन ताकद देतो . या ताकदीवरच गरोदरपणाचं आव्हान स्त्रिया पेलतात. पण असं असलं तरी गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात खूप काही घडत असतं. बदलेल्या हार्मोन्समुळे शरीरात मोठे बदल होतात. जसे बाहेरुन होतात तसे आतूनही होतात. या बदलांचाच परिणाम म्हणजे काही समस्या या काळात महिलांना नव्यानं जाणवायला लागतात. किंवा पूर्वी जाणवणाऱ्या समस्या या काळात तीव्र होतात्. त्या अनेकातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे बध्दकोष्ठता. साधारणत: तीन महिन्यानंतर ही समस्या वाढते. पोट साफ न झाल्याच्या भावनेने अनेक महिला अस्वस्थ होतात. आणि अनेक महिला तर पोट साफ होण्यासाठी स्वत:च्या मनानं रेचक घ्यायला सुरुवात करतात. पण ही गोष्ट आरोग्याच्या आणि पोषणाच्या दृष्टिकोनानं एकदम चुकीची असल्याचं तज्ञ्ज्ञ सांगतात.
रेचक हे एक औषध असतं त्यामुळे त्याचं सेवन हे जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनानं केलं तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. एरवीही अनेकजण स्वत:च्या मनानं रेचक घेतात. अनेकांना आठवड्यातून एकदा एरंड्याचं तेल घेण्याची सवय असते. पण गरोदरपणात रेचक घेण्याचे संदर्भ बदलतात आणि दुष्परिणामांचा धोका जास्त असतो. त्यामुळे एरवी रेचक घ्यायची सवय असली तरी ती गरोदरपणात थांबवायला हवी. आणि बध्दकोष्ठतेचा खूपच त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
गरोदरपणात रेचक का घेऊ नये?
गरोदरपणात रेचक घेणं का हानिकारक आहे याची शास्त्रीय कारणं आहेत ती समजून घ्यायला हवीत.
रेचक म्हणून ओळखली जाणारी औषधं ही मल पातळ करुन त्याला शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात. या रेचकात समाविष्ट असलेल्या रासायनिक घटकांमुळे हे घडून येतं. गोळी, कॅप्सूल, चूर्ण, सिरप स्वरुपात ही रेचक उपलब्ध आहेत, गरोदर स्त्रीला रेचक सूचवतानां स्वत: डॉक्टरही विचारपूर्वक औषधं सूचवतात.
गरोदरपणात रेचक घेतल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम संभवतात. कोणतं रेचक घेता त्यावर हे दुष्परिणाम अवलंबून असतात. सामान्यपणे गरोदरपणात रेचक घेतल्यास पोटात मूरडा मारणं, पोट फूगणं, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणं, चक्कर येणं, गडद रंगाची लघवी होणं हे दुष्परिणाम होतात.
रेचक हे औषध आहे त्याची शरीरास सवय लागणं घातक आहे. दीर्घ काळापर्यंत रेचक घेतल्यास आतड्यांच्या नलिकेतून अन्न बाहेर पडण्याचं काम वेगानं होतं. त्यामुळे अन्नातून पोषक द्रव्यं शोषून घेण्याची आतड्यांची क्षमता कमजोर होते. आणि शरीरास पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम आईच्या तब्येतीवर आणि बाळाच्या पोषणावर होतो.
जास्त काळ रेचक घेतल्यास किंवा स्वत:च्या मनानं तीव्र रेचक घेतल्यास रक्तात मॅग्नेशिअमची कमतरता निर्माण होते.
रेचक घेतल्यानं गर्भापात होतो का?
गरोदर स्त्रीनं रेचक घेण्याचे दुष्परिणाम आहेत, पण रेचक घेतल्यानं गर्भपात होतो यावर पुरेसा अभ्यास झालेला नाही. पण एक आहे गरोदरपणात एरंड्याचं तेल घेतल्यानं गर्भास नुकसान होण्याचा धोका असतो. कारण एरंड्याच तेल हे नैसर्गिक रेचक असून ते तीव्र स्वरुपाचं रेचक मानलं जातं. रेचकमुळे बाळात व्यंग किंवा आजार होण्याची किंवा गरोदरपणात गुंतागुंत होण्याची कोणतीहे निरिक्षणं किंवा निष्कर्ष नाहीत. पण म्हणून गरोदरपणात रेचक घेणं सुरक्षितही अजिबात नाही. रेचक स्वत:च्या मनानं घेण्याऐवजी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर सौम्य रेचक सूचवतात. ते घेण्याची पथ्यं सांगतात. बध्दकोष्ठतेबाबतची तक्रार वेळीच डॉक्टरांना सांगितली तर ते नैसर्गिकपणे पोट साफ होण्याचे पर्याय सूचवतात. यासाठी आहारात तंतूमय घटकांचा जास्त समावेश करणं, थोडा व्यायाम करणं, शरीराची हालचाल करणं हे पर्याय आहेत. हे पर्याय सुरक्षितपणे पोट साफ होण्यास मदत करतात.