Join us   

चाळीशीतलं गरोदरपण : नेहा धुपियासारखा चाळीशीत बाळाचा निर्णय, हे धोक्याचं की टाळावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 2:12 PM

नेहा धुपियाने चाळीसाव्या वर्षी दुसऱ्या बाळाचा निर्णय घेतला, चर्चा झाली लेट प्रेगनन्सीची. हे उशीराचं गरोदरपण चूक की बरोबर हा वादाचा विषय नाही, उलट या गरोदरपणात धोके काय, काळजी काय घ्यायला हवी हे समजून घ्यायला हवे.

ठळक मुद्दे वैद्यकीयदृष्ट्या पहिलं बाळ तिशीच्या आत आणि दुसरं बाळही तिशीच्या आत किंवा पस्तीशीच्या आत होणं सुरक्षित असतं. पण याचा अर्थ असा नाही की पस्तीशीनंतर किंवा चाळीशीत गरोदर राहूच नये.

चाळीशीला पोहोचलेली नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होण्याची बातमी प्रसारमाध्यमात झळकली आणि ‘लेट प्रेगनन्सी’ हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. तिशी पस्तीशीनंतर मूल नकोच म्हणणाऱ्यांपासून त्यात काय घाबरायचं इथपर्यंतच्या प्रतिक्रिया उमटल्या. प्रामुख्याने पस्तीशीनंतर किंवा चाळीशीत गरोदरपण हा वादाचा मुद्दा नसून खरंतर तो वैद्यकीय अंगानं समजून घेण्याचा विषय आहे. खरंच उशिरा गरोदरपण अर्थात लेट प्रेगनन्सी ही धोकादायक असते का? धोका असेल तर तो कोणता आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची? नेमका या गरोदरपणाचा कसा विचार करायचा याबाबत नाशिकस्थित स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि किशोरवयीन मुलामुलींसाठी स्पेशल क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. गौरी करंदीकर यांच्याशी संवाद साधला. त्या सांगतात..

छायाचित्र:- गुगल 

लेट प्रेगनन्सी खरंच धोकादायक असते का?

लेट प्रेगनन्सी प्रश्नाला दोन तीन बाजू आहेत. वैद्यकीय दृष्टीने विचार केल्यास पहिले आम्ही सांगतो की तिशीच्या आत पहिलं बाळांतपण व्हायला हवं. ते उत्तम आहे. उत्तम यासाठी की तिशीच्या आत गरोदर झाल्यास स्त्री बीजाची गुणवत्ता उत्तम असते. वयाच्या तिशीनंतर पस्तीशीत वगैरे अंडाशयात तयार होणाऱ्या स्त्री बीजाची गुणवत्ता कमी होत जाते. पस्तीशीनंतर ती आणखी कमी होते. स्रीबीजाची गुणवत्ता कमी होण्याचा आलेख वयाच्या पस्तीशीनंतर अधिकच खाली उतरत जातो. पण म्हणून तिशी पस्तीशीनंतरच्या प्रत्येकच गरोदरपणात धोका असतो असं नाही मात्र स्त्री बीज अँबनॉर्मल असण्याची शक्यता वाढत जाते.  आणखी एक बाब म्हणजे स्त्रीचं वय जर चाळीस असेल तर अर्थात जोडीदाराचं वय आणखी जास्त असेल किंवा तेवढंच असेल अशा परिस्थितीत पुरुषाच्या बीजाचाही तेवढाच परिणाम गर्भावर होतो. यातून जो गर्भ तयार होतो त्यात जनुकीय दोष येण्याची शक्यता वाढते. वय वाढलं की ही शक्यता वाढत जाते. पण म्हणून हा धोका सगळ्यांनाच असतो असं नाही .

छायाचित्र:- गुगल 

याशिवाय अजून काही गोष्टींचा विचार करायला हवा.

१. लेट प्रेगनन्सीमधे आईच्या तब्येतीचा विचारही महत्त्वाचा असतो. पस्तीशीच्या पुढे, चाळीशीनंतर आईच्या आरोग्यविषयक समस्या वाढत जातात. स्त्रियांमधे मधुमेह, रक्तदाब असे आजार निर्माण व्हायला लागतात. तसेच ताणाशी निगडित समस्या वाढत जातात. तिशीच्या आत आणि तिशीनंतर स्त्रियांच्या आरोग्याचा तुलनात्मक विचार केल्यास त्यात मोठा फरक दिसतो. हाडांची कॅल्शियम शोषून घेण्याची जी क्षमता असते याला ‘कॅल्शियम मेटॉबॉलिझम’ म्हणतात तो तीस पस्तीस वयानंतर उत्तम असतो. पण त्यानंतर स्त्रीच्या शरीरातील कॅल्शियमचं गणित बदलायला लागतं. आणि अशा परिस्थितीत योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचा गर्भावरही परिणाम होतो.

२. प्रत्यक्ष गरोदरपणात होणाऱ्या गुंतागुती हाही महत्त्वाचा विषय आहे. गरोदरपणात होणारा मधुमेह ज्याला ‘जस्टेशनल डायबिटीज’ म्हटलं जातं, गरोदरपणात वाढणारा रक्तदाब किंवा बाळाची योग्य पध्दतीनं वाढ न होणं, अपुऱ्या दिवसात प्रसूती होण्याचा धोका असतो. यात नैसर्गिकरित्या गरोदर राहाणाऱ्या स्त्रिया आणि आयव्हीएफद्वारे राहाणारं गरोदरपण यातही असं दिसून येतं की कृत्रिमरित्या गरोदरपणात मधुमेह, रक्तदाब, लवकर प्रसूती होणं किंवा बाळाची मर्यादित वाढ होणं या सगळ्या समस्यांची शक्यता थोडी जास्त असते. त्यामुळे वय हा घटक गरोदरपणात महत्त्वाचा होतो. वैद्यकीयदृष्ट्या पहिलं बाळ तिशीच्या आत आणि दुसरं बाळही तिशीच्या आत किंवा पस्तीशीच्या आत होणं सुरक्षित असतं. पण याचा अर्थ असा नाही की पस्तीशीनंतर किंवा चाळीशीत गरोदर राहूच नये. अनेकदा तसा निर्णय जोडपी किंवा स्त्रिया घेतात, त्या गरोदरपणात जास्त काळजी घ्यायला हवी, हे महत्त्वाचे.

टॅग्स : नेहा धुपियाप्रेग्नंसी