Join us   

गरोदरपण म्हणजे आजारपण नव्हे, ६ टिप्स-गरोदरपणात नोकरी-काम सांभाळूनही राहा प्रसन्न, सांभाळा तब्येत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2022 7:58 PM

6 Tips For Working Pregnant Woman : गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार विहार सांभाळून नोकरी व्यवसाय करता येतोच. मात्र काही गोष्टी सांभाळायला हव्यात.

बाळांतपण म्हणजे दुसरा जन्म हे खरंच. ९ महिने जगण्याचे अनेक सुंदर रंग कळतात, आयुष्य बदलायला लागतं. शरीरासह मनातही बदल होतात. मात्र काही स्त्रिया याच काळात नोकरी किंवा बिझनेस सांभाळत असतात. तब्येत चांगली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुरेशी काळजी घेऊन काम करायला काहीच हरकत नसते. गरोदरपण म्हणजे आजारपण नव्हे. मात्र घरकाम, ऑफिसचे काम यामुळे दगदग होऊ शकते. दमल्याने अशक्तपणा येतो. त्याकाळात आराम सांभाळून, उत्तम आहार आणि हलका व्यायाम यानं प्रसन्न राहता येऊ शकतं(6 Tips For Working Pregnant Woman).

काय काय करता येऊ शकत ?

१. आहाराकडे लक्ष द्या - गरोदर महिलांसाठी सकस व पौष्टिक आहार खूप महत्वाचा असतो. बाळाची योग्य वाढ होण्यास आहार मुख्य भूमिका बजावतो. या काळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट तयार करून ते काटेकोरपणे फॉलो करा. कामाच्या गडबडीत जेवणाच्या वेळा चुकवू नका. हलका व्यायाम करा.

२. छोटे-छोटे ब्रेक घ्या - दिवसभर ८ ते ९ तास एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. कामाच्या मध्ये छोटे-छोटे ब्रेक घ्या. एक दोन तासांनी थोडसं चालणं, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणं यामुळे तुमचं शरीर आणि मन निवांत राहण्यास मदत होईल.

३. ताण-तणावापासून दूर रहा - गरोदरपणात ऑफिसचे काम करताना शक्य तितक्या ताण-तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ऑफिस म्हटलं की कामाचा ताण, चढाओढ, स्पर्धा असणारच. मात्र या सर्वांमुळे तुमच्या मनात कोणताही नकारात्मक भावना येणार नाही याची काळजी घ्या. कारण तुमच्या मनातील या विचारांचा तुमच्या शरीर आणि पर्यायाने बाळावर परिणाम होऊ शकतो.

४. चांगली झोप - गरोदर महिलांनी दररोज किमान ८ ते १० तासांची चांगली झोप घेणे आवश्यक असते. त्यामुळे कामाचे टेंशन, ताण न घेता तुमची झोप पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. 

५. योग्य प्रमाणात पाणी प्या - गरोदरपणात योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेच असत. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही गोष्ट फारच महत्त्वाची ठरते. या काळात शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांमुळे शरीर डिहायड्रेट होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच जर तुम्हाला हायड्रेट रहायचं असेल तर पुरेसं पाणी प्या.

६. प्रवासात काळजी घ्या - गरोदरपणात रोज घर ते ऑफिस हा प्रवास जर तुम्हाला करावा लागत असेल तर तुम्ही एखादी पाण्याची बाटली आणि स्नॅक्स जवळ ठेवा. गर्दीची ठिकाण आणि खडबडीत रस्त्यावरून प्रवास करणे टाळा.

टॅग्स : गर्भवती महिलाप्रेग्नंसी