Join us   

कधी प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही, कधी नको असताना दिवस जातात.. तज्ज्ञ सांगतात प्रेग्नंसीचे नेमके कॅल्क्युलेशन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2022 2:16 PM

Pregnancy or Unwanted Pregnancy How to Calculate perfect Days to Conceive : प्रेगनन्सी राहण्याचा काळ स्त्रीबीज तयार होण्याच्या आधी आणि नंतर असा आठ दिवसांपर्यंत असतो.

ठळक मुद्दे स्त्रीबीज तयार होतानाच्या काळात स्त्रीमध्ये कामभावना जास्त जागृत असते.संबंध आल्यावर वीर्य स्खलन जरी योनीमार्गाच्या बाहेर झालं तरी त्याआधी होणाऱ्या स्त्रावांमध्ये शुक्राणू असू शकतात आणि प्रेगनन्सी राहू शकते.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

"डॉक्टर, प्रेगनन्सी कशी असेल अहो?आम्ही व्यवस्थित "precautions" घेतो नेहेमी! समोर बसलेल्या तरुण जोडप्याच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण दिसत होता. "कोणते गर्भनिरोधक वापरता तुम्ही? " "नाही , तसं काही वापरायची वेळच येत नाही आमच्यावर .आम्ही " ते" (ज्या दिवसात प्रेगनन्सी राहण्याची जास्त शक्यता असते)दिवस टाळतोच आणि त्या दिवसात संबंध आलाच तरी काळजी घेतो. (म्हणजे वीर्य स्खलन योनिमार्गात होणार नाही याची दक्षता घेतो) गेले सहा महिने असं व्यवस्थित चालू होतं. यावेळी काय झालं कळत नाही!" (Pregnancy or Unwanted Pregnancy How to Calculate perfect Days to Conceive).

(Image : Google)

यावेळी निसर्गाने आपलं काम चोख बजावले आहे मी मनात म्हटलं.आजच्या काळात अजूनही खूप तरुण मंडळींना गर्भनिरोधनाबद्दल योग्य शास्त्रीय माहिती नाही हे आश्चर्यकारक आहे. स्त्रीची पाळी नियमित असेल तर पाळी येण्याच्या आधी चौदा दिवस तिच्या अंडाशयात (ovary) स्त्रीबीज तयार होते. ते चोवीस ते छत्तीस तास टिकते. लैंगिक संबंधानंतर शुक्राणू पाच ते सहा दिवस टिकतात. त्यामुळे प्रेगनन्सी राहण्याचा काळ स्त्रीबीज तयार होण्याच्या आधी आणि नंतर असा आठ दिवसांपर्यंत असतो. हे आठ दिवस संबंध टाळला तर प्रेगनन्सी राहण्याची शक्यता कमी असते पण नसतेच असं मात्र अजिबात नाही.

यामध्ये मुख्य मेख अशी आहे की स्त्रीबीज प्रत्येक मासिक चक्रामध्ये एकाच वेळी तयार होईल असं सांगता येत नाही.ही वेळ काही महिन्यात बरीच मागेपुढे होऊ शकते.परिणामी पाळीच्या मासिक चक्रात कोणत्याही दिवशी गर्भधारणा होऊ शकते.अजून एक म्हणजे स्त्रीबीज तयार होतानाच्या काळात स्त्रीमध्ये कामभावना जास्त जागृत असते. त्यामुळे लैंगिक संबंध येण्याची शक्यता वाढते.संबंध आल्यावर वीर्य स्खलन जरी योनीमार्गाच्या बाहेर झालं तरी त्याआधी होणाऱ्या स्त्रावांमध्ये शुक्राणू असू शकतात आणि प्रेगनन्सी राहू शकते.

(Image : Google)

हा सगळा खरंतर निसर्गाचा खेळ आहे. ज्या जोडप्याची जननक्षमता उत्तम असते त्यांच्या बाबतीत अश्या गोष्टी होतात. ज्यांची ही क्षमता कमी असते त्यांना सगळे प्रयत्न करूनही प्रेगनन्सी साठी समस्या येतात. त्यामुळे हे सगळं नीट समजावून घेऊन मगच गर्भनिरोधकाविषयी निर्णय घ्या. याबद्दल स्त्रीरोग तज्ज्ञांशी सल्ला मसलत करून निर्णय  घेणे केव्हाही उत्तम!! 

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ञ आहेत)  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसी