Join us   

घरच्याघरी प्रेगन्सी टेस्ट, ती पॉझिटिव्ह आली की गर्भपाताच्या गोळ्या घेऊन मोकळे ?- सावधान, जीवाला धोका आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 5:24 PM

फोनवर डॉक्टरांकडे गर्भपाताच्या गोळ्या मागणं, प्रेंग्नंट आहोत हे लपवणं अत्यंत धोकादायक आहे ! डॉक्टरांना भेटा, वैद्यकीय सल्ला घ्या..

ठळक मुद्दे आपल्या मनानेच उपचार घेणं आणि माहिती लपवणं भयंकर धोकादायक आहे.

डॉ. ऐश्वर्या रेवडकर

दर दोनेक दिवसातून मला एक तरी फोन कॉल  किंवा पर्सनल मेसेज येतो, गर्भपाताच्या गोळ्या विचारण्यासाठी. ज्या व्यक्तीसाठी त्या हव्या असतात, ती कुठेतरी अमुक ठिकाणी असते, जी व्यक्ती फोन करतेय ती तमुक ठिकाणी असते आणि मी आणखी तिसऱ्याच अमक्या ढमक्या ठिकाणी. मला अगदी जुजबी, कमीत कमी माहिती पुरवली जाते की, ‘अमक्या तारखेला शेवटची पाळी आली होती. आज घरी कीटने तपासले तर टेस्ट पॉझिटिव्ह आली, सध्या इतक्यात बाळ नको आहे, तर गर्भपाताच्या गोळ्या सांगा. आम्ही त्या दुकानातून घेऊन देऊ, घरीच सर्व करू.’ इतके सहज सोपे वाटते सर्वाना हे ! दुकानात जाऊन चणे फुटाणे घ्यावेत इतके सहजतेने विचारतात लोक. यामध्ये सर्व प्रकारचे लोक येतात, शहरी व ग्रामीण, शिक्षित व अशिक्षित, विवाहित किंवा अविवाहित. कधी मुलीचा नातेवाईक फोन करतो तर कधी मुलीच्या बॉयफ्रेंडचा मित्र (कारण त्या दोघांना लाज वाटते बोलायला). कधी तर कोणी फेसबुकवरून पण मेसेज करतात, इमर्जन्सी म्हणून. अशा सर्वच लोकांना पाहून आश्चर्यही वाटते आणि चिंताही.

मला मग पहिले शांतपणे कौउन्सिलिंग करावे लागते की असे उपचार रुग्णाला प्रत्यक्षात न तपासता फोनवरून करणे कसे जीवघेणे ठरू शकते आणि त्यामुळे मी असे करू शकत नाही. कारण जर डायरेक्ट कोणाला म्हणाले की जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरकडून तपासून मग औषधे घ्या, तर बऱ्याच लोकांना राग येतो. आम्हाला गरज आहे म्हणून फोन केला तर या डॉक्टर मदत करत नाहीये. काहीना वाटते की पैसे मिळत नाही म्हणून या फोनवर उपचार सांगत नाहीये. असे बरेच गैरसमज  होतात. सकाळच्या वेळी मी ओपीडीमध्ये तर संध्याकाळी, रात्री मी डिलिव्हरीमध्ये तर कधी सिझेरिअन शस्त्रक्रियेच्या तयारीमध्ये व्यस्त असते. कधी कामाने, अति ताणाने थकून आराम करत असते, अशावेळी जास्त बोलत न बसता, मी “रुग्णालयात जा”, असा सल्ला देते तेव्हा लोकांना माझा राग येतो. परंतु त्यांना हे समजून घ्यायचे नसते की डॉक्टर असा सल्ला का देत आहेत. जेव्हा पाळी चुकते, तेव्हा कोणीही घरच्या घरी युरीन प्रेग्नसी कीट आणून सकाळचे पहिले मुत्र घेऊन तपासणी करू शकते. त्याने गर्भ राहिला आहे की नाही हे लगेच कळते. जर ही टेस्ट निगेटिव्ह आली आणि तरी पाळी आली नाही तर पुन्हा ७ दिवसांनी आम्ही ही टेस्ट करायला सांगतो, कदाचित आणखी काही दिवसानंतर ही टेस्ट पॉझीटीव्ह येऊ शकते. एकदा ही टेस्ट पॉझीटीव्ह आली की त्या स्त्रीला गर्भ राहिला आहे हे निश्चित होते. परंतु सर्व गर्भवती महिलांपैकी २-५ टक्के महिलांचा गर्भ हा एक्टोपिक गर्भ असू शकतो. याचा अर्थ गर्भ गर्भपिशवीमध्ये नसून , तो गर्भनलिकेमध्ये असतो. प्रत्येक महिलेमध्ये गर्भ हा प्रथम गर्भनलिकेमध्येच तयार होतो आणि नंतर तो गर्भपिशवीच्या पोकळीमध्ये येऊन रुजतो. तर ज्या महिलेचा गर्भ नलिकेतच राहतो, त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी असे म्हटले जाते यामध्ये जर लवकर समजले नाही तर मोठा होत असताना असा गर्भ नलिकेत वाढून, त्यामुळे गर्भनलिका फुटून, त्यातून पोटामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन महिलेवर जीवघेणी परिस्थिती ओढवते. अनेकदा रुग्णालयात पोहोचेपर्यंत जलदगतीने स्त्रीची स्थिती गुंतागुंतीची होऊन, काही स्त्रिया जीव गमावून बसतात. 

गर्भावस्था नॉर्मल आहे की अशी एक्टोपिक आहे, हे कसे समजते ?

१. युरीन प्रेग्नसी कीट ने फक्त स्त्री गर्भवती आहे एवढेच समजते. बाकी ज्यादाची माहिती त्यातून समजत नाही. २. आम्ही स्त्रीच्या योनीतून दोन बोटांनी जी तपासणी करतो , (पर व्हजायनल एक्झामिनेशन ) त्यातूनही हे काही प्रमाणात समजू शकते. ३. सोनोग्राफीमधून खात्रीशीर माहिती कळते. ४. रुग्णाच्या विशेष रक्त तपासणीद्वारे (बीटा एचसीजी होर्मोन लेव्हल ) हे समजू शकते, परंतु ही विशेष तपासणी सर्वच रुग्णालयात उपलब्ध असेल असे नाही. (खासकरून ग्रामीण भागात उपलब्ध नाही.) ५. तसेच गर्भवती स्त्रीला जर पोटात अचानक दुखू लागले आणि योनिद्वारे रक्तस्त्राव सुरु झाला, तर तेव्हा रुग्णाची सामान्य तपासणी करताना, ही ‘गुंतागुंत निर्माण झालेली एक्टोपिक गर्भावस्था’ आहे हे आमच्या लक्षात येते.

यावर उपचार काय ?

तर अशी गर्भावस्था वेळीच म्हणजे, गर्भ आकाराने आणि दिवसांनीही लहान असताना, गुंतागुंत निर्माण झालेली नसताना ओळखली गेली तर आणि रुग्णाच्या रक्त चाचण्या ठीक असतील तर विशेष औषधे देऊन उपचार करता येऊ शकतात. परंतु जर गुंतागुंत निर्माण झाली असेल, आकार मोठा असेल, तर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय राहतो. त्यातही अनेकदा काही तासांच्या आतच शस्त्रक्रिया झाली तरच रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो. आता एवढे मोठे पुराण मी का सांगत बसले ? तर रुग्णाची तपासणी न करता, फोनवरूनच मी जर गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि चुकून एखादीचा गर्भ एक्टोपिक असेल, तर तो पोटातच फुटून महिलेचा जीव जाऊ शकतो.

 

(मुळच्या महाराष्ट्रातील असलेल्या डॉ. ऐश्वर्या  रेवडकर स्त्रीरोग तज्ज्ञ असून सध्या छत्तीसगड येथील दुर्गम भागात रुग्णसेवा बजावत आहेत. फेमिनिस्ट, ट्रॅव्हलर, लेखिकाही त्या आहेत. अलीकडेच त्यांच्या ‘बिजापूर डायरी’ या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे.)

टॅग्स : प्रेग्नंसीगर्भवती महिला