आपल्या कुटूंबात नवा पाहुणा येणार याची चाहूल लागली की, सगळे घरदार आनंदून जाते. येणारे बाळ सुखरूप यावे आणि निरोगी असावे तसेच आईची तब्येतही नऊ महिने चांगली रहावी, यासाठी मग प्रत्येकजण आपापल्या परीने गर्भवतीची काळजी घेऊ लागतो. तिच्यावर आणि होणाऱ्या बाळावर असणाऱ्या प्रेमापोटी प्रत्येकजण तिला गर्भारपणात काय करावे आणि काय टाळावे हे सांगू लागतो. हळूहळू हे सल्ले आणि सूचना यांची एक भली मोठी लिस्टच तयार होते. सूचनांच्या या जंजाळातून नेमके खरे काय नि खोटे काय हे समजून घेताघेताच नाकी नऊ येतात.
काय खावे, काय खाऊ नये, इथपर्यंत ठिक आहे. पण कसे बसावे, कसे उठावे अशाही सूचना आल्या, की मग मात्र ती होणारी आई कंटाळून जाते. गरोदर महिलांना नेहमी ऐकावी लागणारी एक सूचना म्हणजे बसताना पायावर पाय टाकून म्हणजेच पायाची अढी घालून बसू नये. आजकाल खुर्चीवर किंवा पाय पसरून बसले की सहज आपण आपल्या एका पायावर दुसरा पाय टाकतो. म्हणजेच पायाची अढी घालताे. ही सवय काही जणींच्या इतकी अंगवळणी पडलेली असते, की बसल्यावर त्यांच्याही नकळत पायाची अढी घातली जाते. त्यावेळी आपण गरोदर आहोत, हे देखील अनेकींच्या डोक्यात नसते. त्यांना अशा अवस्थेत पाहिले की सासू किंवा आईचा हमखास ओरडा खावा लागतो आणि पाय सरळ ठेवून बसावे लागते.
पण गरोदर बायकांनी पायाची अढी घालून बसल्याने त्यांना किंवा होणाऱ्या बाळाला काहीही त्रास होत नाही. या काळात त्यांचा कम्फर्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्या जर पायाची अढी घालून मागे टेकून निवांत बसल्या असतील आणि त्यांना तशा बसण्याचा काहीही त्रास होत नसेल, तर त्यांना तसे बसू द्या, असे औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ व प्रसुती विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले आहे. गरोदर महिलांनी असेच बसावे किंवा तसेच बसावे, असे त्यांच्यावर कोणतेही दडपण आणू नका. त्यांना जसे आरामदायक वाटत असेल तसे त्यांना निवांत बसू द्या, असेही डॉ. गडप्पा यांनी सांगितले आहे.