Lokmat Sakhi >Health >Pregnancy > ‘गर्भधारणा नको? त्यात काय एवढे, खा गोळ्या!’- या बेदरकार वृत्तीच्या बायका बळी ठरतात तेव्हा..

‘गर्भधारणा नको? त्यात काय एवढे, खा गोळ्या!’- या बेदरकार वृत्तीच्या बायका बळी ठरतात तेव्हा..

अनेकजण मात्र चुकीच्या पद्धतीने गोळ्या खाऊन, महिनाभर रक्तस्त्राव अंगावर काढून, मग डॉक्टरकडे जातात. अनेकदा खोटेच सांगतात कि आपोआप गर्भ पडला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 05:53 PM2021-04-21T17:53:14+5:302021-04-21T18:02:20+5:30

अनेकजण मात्र चुकीच्या पद्धतीने गोळ्या खाऊन, महिनाभर रक्तस्त्राव अंगावर काढून, मग डॉक्टरकडे जातात. अनेकदा खोटेच सांगतात कि आपोआप गर्भ पडला.

pregnant women abortion pills, dangerous for health, take medical help narikaa | ‘गर्भधारणा नको? त्यात काय एवढे, खा गोळ्या!’- या बेदरकार वृत्तीच्या बायका बळी ठरतात तेव्हा..

‘गर्भधारणा नको? त्यात काय एवढे, खा गोळ्या!’- या बेदरकार वृत्तीच्या बायका बळी ठरतात तेव्हा..

Highlightsगर्भपात करण्यासाठी फक्त स्त्रीची संमती पुरेशी आहे. तिचा नवरा किंवा जोडीदाराची संमतीची जरूर नसते.

डॉ. ऐश्वर्या रेवडकर

प्रेगनंन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या तरी या फक्त ७ आठवड्यांपर्यंतच उपयोगाला येतात. त्यापेक्षा जास्त दिवसांचा गर्भ असेल तर अर्धा अधुरा गर्भपात होतो आणि रक्तस्त्राव थांबत नाही. अनेकींना पूर्ण महिना भर रक्तस्त्राव होत राहतो. त्याने कमजोरी, रक्तक्षय, जंतुसंसर्ग असे सर्व होऊन, मग ती स्त्री रुग्णालयात येते. जो गर्भपात सुरक्षितद्वारे होऊ शकला असता, तो विनाकारण गुंतागुंतीचा बनून जातो.
काहींसाठी जीवघेणा ठरतो. अनेकींची पाळी ही पुढे मागे होत असते. अशावेळी फक्त तारखेवरून गर्भाचे वय ठरवणे अशक्य असते. रुग्णालयात जाऊन डॉक्टरने व्हजायनल तपासणी किंवा सोनोग्राफी केल्यानंतरच, प्रत्यक्ष चर्चा करून गर्भपात कोणत्या पद्धतीने करायचा याचा निर्णय त्या स्त्रीने घेणे योग्य ठरते. ७ आठवड्यांच्या आतील लहान गर्भासाठी औषधे आणि त्यापेक्षा मोठा असेल तर १-२ दिवस रुग्णालयात भरती राहून, छोट्या भूलीखाली केल्या जाणाऱ्या २०-३० मिनिटांच्या सोप्या शस्त्रक्रियेद्वारे गर्भपात सुरक्षितरित्या केला जातो.
त्याआधी हिमोग्लोबिन आणि रक्ताच्या इतर चाचण्या केल्या जातात. गर्भपातासोबतच पुढे कोणते कुटुंब नियोजनाचे साधन वापरावे, याचीही डॉक्टर माहिती देतात. ते साधन तेव्हाच ठरवून एकत्रच तेही साधन बसवता येऊ शकते (तांबी बसवणे) किंवा इंजेक्शन असेल तर घेता येते. गर्भपातानन्तर पुढील काही दिवस काय काळजी घायची, किती दिवस आराम करायचा, कोणती औषधे घायची,लैंगिक  संबंध कधी सुरु करावेत, अशी सर्व माहिती रुग्णालयात सांगितली जाते. तसेच बरेचदा गर्भपातामुळे स्त्रीला अपराधी भाव निर्माण होतो कि मी बाळाचा जीव घेते आहे, त्याने तिला मानसिक त्रास होऊ शकतो. कधी काही स्त्रियांना भीती वाटते कि एकदा
गर्भपात केल्यानंतर पुढच्या वेळी मूल राहू शकेल की नाही? तर अशा सर्व शंकांचे समाधान करण्याकरिता, मानसिक आधार वाटण्याकरिता डॉक्टरशी प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन घेणे खूप महत्वाचे आहे.
काहीवेळी औषधांनी काहींचा लहान गर्भ पडत नाही किंवा अर्धाच पडतो, तुकडे आत राहतात, अशावेळी ही रुग्णालयात जाऊन १-२ दिवस भरती राहिलेले चांगले. या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या प्रत्यक्षात बोलता येतात. त्यामुळे डॉक्टरांना फोन करत बसण्यापेक्षा, आपल्या रुग्णाला घेऊन किंवा स्त्री स्वतःहून एकटी, जिथे विश्वास आहे, तिथे जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून घेतलेली हे स्त्रीच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे ठरते.
तसेच कायदेशीररित्या सुरक्षित गर्भपातासाठी स्त्रीची लिखित स्वरुपात संमती घेणे, हे बंधनकारक आहे. अशी लिखित संमती नसेल, तर कायद्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल होऊ शकतो. 


आणखी एक महत्वाची बाब. गर्भपात करण्यासाठी फक्त स्त्रीची संमती पुरेशी आहे. तिचा नवरा किंवा जोडीदाराची संमतीची जरूर नसते. अनेकदा माझ्यासमोर काही डॉक्टर्स “तुझ्या नवऱ्याला सोबत घेऊन ये” असे म्हणून ग्रामीण भागातील किंवा आदिवासी स्त्रीला परत पाठवतात, गर्भपात नाकारतात, तेव्हा मला खूप वाईट वाटते. स्त्रीला गर्भपाताचा अधिकार कोणीही नाकारू शकत नाही.
आता हे इतके सगळे रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना नाही सांगता येत फोनवर आणि तेही पुन्हा पुन्हा २ दिवसांनी. मला स्वतःला समोर प्रत्यक्ष समोर समजावून सांगायला आवडते. तसेच मी ज्या रुग्णालयात काम करते, तेथील रुग्णाला माझा जास्तीजास्त वेळ देणे हे मी माझे कर्तव्य समजते. जेव्हा कोणी अशा ठिकाणी असते, कि जिथे डॉक्टरच नाहीत, तेव्हा मी फोनवरूनही सल्ला सांगते, परंतु असे फार दुर्मिळ उदाहरण आहे. आजकाल सर्वत्र बेसिक गर्भपाताची सोय उपलब्ध आहे आणि ज्या ठिकाणी ती नसेल, तेव्हा मी त्या स्त्रीला तेथून थोडा प्रवास करून, जो दवाखाना जवळ आहे, तिथे जायला सांगते.
आपल्याकडे सोय असुनही ग्रामीण भागात, शहरी भागात सर्वत्र असे अनेक रुग्ण भेटतात जे डॉक्टरकडे न जाता, डायरेक्ट फार्मसीमध्ये जाऊन गर्भपाताच्या गोळ्या खातात. काहींचा प्रयत्न यशस्वी होतो. अनेकजण मात्र चुकीच्या पद्धतीने गोळ्या खाऊन, महिनाभर रक्तस्त्राव अंगावर काढून, मग डॉक्टरकडे जातात. अनेकदा खोटेच सांगतात कि आपोआप गर्भ पडला. कारण गोळ्या खाल्ल्या हे सांगितले तर डॉक्टर चिडेल.

असे का होत असावे बरे ?


१. पहिली गोष्ट, स्त्री आरोग्याकडे दुर्लक्ष. पुरुषाला साधी सुई जरी टोचली तरी पुरुष रुग्णालयात पोहोचतो. परंतु स्त्रीच्या आरोग्याची मात्र ती स्वतः पण आणि तिचे कुटुंबीय पण हेळसांड करतात. “गर्भ राहिला काय? त्यात काय? एवढे, खा गोळ्या,” इतके सोपे वाटते सर्वाना.
त्यात तिला काय काय शारीरिक आणि मानसिक त्रास होतो याची कुणालाही पर्वा नसते.
२. अनेकदा स्त्री आरोग्यावर खर्च करायची कुटुंबियांची मानसिकता नसते. डॉक्टरला भेटून खर्च होईल, त्यापेक्षा मनानेच दुकानात जाऊन गोळया खाणे हा स्वस्त तात्पुरता पर्याय निवडला जातो. खरेतर फार्मसीच्या दुकानात, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणे बेकायदेशीर आहे, परंतु त्या सर्रास विकल्या जातात आणि लोकही त्याला बळी पडतात..
३. दुसरे, स्त्रीच्या लैंगिकतेविषयी आपल्या समाजाची दांभिकता. अविवाहित मुलीला किंवा घटस्पोटीत किंवा विधवा स्त्रीला गर्भधारणा झाली तर आपला समाज लगेच अशा स्त्रीला चारित्र्यहीन ठरवून रिकामा होतो. आपली रुग्णालये ही यातून सुटलेली नाहीत. काही डॉक्टर , नर्सेस अशा रुग्णाबद्दल तिरकस जोक करतात किंवा स्त्रीवर ओरडतात. तिचे खाजगीपण जपले जात नाही. अशावेळी स्वतःची “सो कॉल्ड इज्जत “ जपण्यासाठी स्त्री असे पाउल उचलते.
४. अनेक अविवाहित जोडप्यांना भीती वाटते, लाज वाटते, मग कोणी ओळखीचा डॉक्टर मित्र असेल तर फोन करून सल्ला विचारला जातो. 
५. सर्वच पातळीवर प्रयत्न झाले तर हे चित्र बदलेल. 

त्यासाठी काही बदल व्हावे लागतील..

१. सुरुवात स्त्रीला स्वतःपासून करावी लागेल. मी लैंगिक संबंध हे माझ्या मर्जीने ठेवले, त्यात शरम वाटण्यासारखे काही नाही आणि दुसऱ्या कोणालाही त्याचा संबंध माझ्या चारित्र्याशी जोडण्याचा हक्क नाही, हे स्त्रीने स्वतःशी ठामपणे समजून घ्यायला हवे.

२. दुसरा बदल, कुटुंबाच्या पातळीवर व्हावा कि स्त्रीच्या आरोग्याला महत्व, वेळ दिला जावा आणि त्यावरही पैसे खर्च करण्याची मानसिकता निर्माण व्हावी.
३. तिसरा बदल, सरकारी रुग्णालयांत (व इतरत्रही) स्त्रीचा आदर व खाजगीपणा दोन्ही जपले जावे. तिला हवी ती आरोग्य सुविधा कोणतेही पुर्वदुषित ग्रह न बाळगता आणि स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक टीका टिप्पणी न करता, उपलब्ध करून दिली जावी. तिला मानसिक आधार दिला जावा. भविष्यासाठी योग्य ते समुपदेशन केले जावे.
४. चौथा व मुख्य बदल, समाजाच्या मानसिकतेत व्हावा. स्त्रीचे योनिपलीकडे अस्तित्व आहे.
तसेच तिचे लैंगिक आचरण हे तिच्या मर्जीप्रमाणे हवे, त्यात इतरांची ढवळाढवळ नको. तिच्या लैंगिक स्वातंत्र्याचा संबंध विनाकारण तिच्या चारित्र्याशी जोडला जाऊ नये.
बरीच लांबची मजल गाठायची आहे, प्रवास सुरु तरी व्हायला हवा, आत्ता या क्षणी.

 

(मुळच्या महाराष्ट्रातील असलेल्या डॉ. ऐश्वर्या रेवडकर स्त्रीरोग तज्ज्ञ असून सध्या छत्तीसगड येथील दुर्गम भागात रुग्णसेवा बजावत आहेत. फेमिनिस्ट, ट्रॅव्हलर, लेखिकाही त्या आहेत.  त्यांच्या ‘बिजापूर डायरी’ या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे.)

Web Title: pregnant women abortion pills, dangerous for health, take medical help narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.