Lokmat Sakhi >Health >Pregnancy > प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत?

प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे बाळ सरोगसीद्वारे जन्माला आले आहे. ख्यातनाम (आणि ग्लॅमरस ) स्त्रिया स्वतःच्या शरीराला आणि करिअरला जराही तोशीस न लागू देता पैशाच्या ताकदीवर ‘आयती बाळे’ उक्ती घेतात, या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्यानिमित्ताने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 03:22 PM2022-02-05T15:22:47+5:302022-02-05T15:33:45+5:30

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे बाळ सरोगसीद्वारे जन्माला आले आहे. ख्यातनाम (आणि ग्लॅमरस ) स्त्रिया स्वतःच्या शरीराला आणि करिअरला जराही तोशीस न लागू देता पैशाच्या ताकदीवर ‘आयती बाळे’ उक्ती घेतात, या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्यानिमित्ताने...

Priyanka Chopra- Nick's baby, surrogacy and trolling; Why are people blaming Priyanka Chopra for 'surrogacy'? | प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत?

प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत?

Highlightsसेलिब्रिटी असलेल्या बाईनं आई होणं याची सार्वजनिक बाजू हाताळणं वाटतं तितकं सोपं नाही.

गौरी पटवर्धन

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने सरोगसीने बाळ जन्माला घातल्याचं जाहीर केलं आणि समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्या दोघांच्या चाहत्यांनी आणि इतर सेलिब्रिटिजनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या खऱ्या; पण त्याचबरोबर अत्यंत टोकाचा तिरस्कार दाखविणाऱ्या प्रतिक्रिया देत अनेकांनी त्या दोघांना, विशेषतः प्रियांका चोप्राला ट्रोलही केलं.
‘सरोगसीने बाळ जन्माला घालण्यापेक्षा आई न झालेलं काय वाईट?’
‘अशा सरोगसीने जन्माला घातलेल्या बाळांबद्दल तिला काय प्रेम वाटणार आहे? जे बाळ तुम्ही नऊ महिने पोटात वाढवू शकत नाही, त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही.’
‘एखाद्या मेडिकल कंडिशनमुळे जेन्युइन पालकांना सरोगसीचा आधार घ्यावा लागतो ते समजण्यासारखं असतं; पण हे मूर्ख बॉलिवूडवाले ज्या पद्धतीने त्याचा उपयोग करतात त्याला काही अर्थ नाही.’
या त्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया झाल्या. काहींची मतं इतकी विखारी नसतील. काहींनी त्यांची मतं मांडलेली नसतील; पण ही बातमी वाचलेल्या ऑलमोस्ट प्रत्येकाचं त्याबद्दल काहीतरी मत आहेच. फार थोडे जण असं म्हणताहेत की, तिचं शरीर आहे, तिचं आयुष्य आहे, तर त्याचं काय करायचं ते तिचं ती ठरवील.

(Image : google)

काही जणांची अशीही भूमिका आहे की, स्वतःचीच गुणसूत्र घेऊन मूल जन्माला घालणं हा अट्टहास चुकीचा आहे. त्या दोघांना जर स्वतःला मूल जन्माला घालायचं नव्हतं तर त्यांनी ते दत्तक घ्यायला काय हरकत होती? किती झालं तरी प्रियांका चोप्रा ही युनिसेफची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तिने जर मूल दत्तक घेतलं असतं तर त्यातून समाजात एक उत्तम संदेश गेला असता. तस्लिमा नसरीन या स्त्रीवादी बांगलादेशी लेखिकेने असंही म्हटलं की, जगात सरोगसी होते कारण तुमच्याकडे पैसे असतात आणि जगात पैशांसाठी गर्भाशय वापरायला द्यावं लागेल अशा परिस्थितीतल्या गरीब स्त्रिया असतात, त्यांचा सर्रास वापर केला जातो.
ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून या विषयावर अनेक जण सतत काही ना काही म्हणताहेत, आणि खरा प्रॉब्लेम तोच आहे!
सेलिब्रिटी असलेल्या बाईनं आई होणं याची सार्वजनिक बाजू हाताळणं वाटतं तितकं सोपं नाही. लोक म्हणताहेत की प्रियांका चोप्राने मूल दत्तक घ्यायला हवं होतं. सुश्मिता सेनने दोन मुली दत्तक घेतल्या. तिला त्याहीवेळी लोकांनी ट्रोल केलं होतं. कारण तिने लग्न न करता मुली दत्तक घेतल्या. आता सनी लिओनीने लग्न करून मूल दत्तक घेतलं तरी लोक तिच्याबद्दल वाईट बोलतात, कारण ती एके काळी पॉर्न स्टार होती, तिला मातृत्व वगैरे कळू शकत नाही याबद्दल लोकांना अगदी खात्री आहे. बरं ज्या सेलिब्रिटींनी अगदी लग्न करून स्वतःची मुलं जन्माला घातली त्यांचं काय झालं? माधुरी दीक्षितने मुलांच्या जन्मानंतर मोठी गॅप घेतली आणि मग नच बलिये हा डान्स शो केला तेव्हा लोकांचं म्हणणं होतं, की तिने कशाला परत सिनेमात यायचं? आता ती काही परत हिट होऊ शकत नाही. ऐश्वर्या रायचं वजन डिलिव्हरीनंतर खूप वाढलं, ते आधीसारखं कमी व्हायला जास्त वेळ लागला आणि तिला तिच्या करिअरमध्ये कॉम्प्रमाइज करायला लागलं. तर लोक म्हणाले की, यांना तर सगळं हाताशी असतं. वाटेल तेवढे नोकर, म्हणाल तेवढा पैसा… तरी यांचे नखरेच फार. करिना कपूरने डिलिव्हरीनंतर पटकन वजन उतरवलं तरी पब्लिकला प्रॉब्लेम. लोक म्हणाले मुलाला अंगावर पाजलं की नाही हिने? आणि वजन कमी न व्हायला काय झालं, यांना तर हाताशी सगळं असतं. वाटेल तेवढे नोकर, म्हणाल तेवढा पैसा, म्हणाल ती डायटिशियन… झालंय काय वजन न उतरायला? मुलांची उस्तवारी करून, सासरच्यांचं करून, चारीठाव स्वयंपाक करून मग केलं असतंस तर तू खरी! त्यात जर एखादी म्हणाली की, मला काही मुलं आवडत नाहीत, त्यामुळे मला मुलं नको आहेत, मग तर विचारायलाच नको. तिच्यासारखी व्हॅम्प तीच! बरं या सेलिब्रिटींनी बेबी बम्प दाखवावा की नाही हे पण लोक ठरवणार. त्यावरही त्यांना मत असणार.

(Image : google)

आतासुद्धा प्रियांका चोप्राच्या बाबतीत लोक तिला ट्रोल करताहेत, कारण तिने तिचं करिअर, तिची फिगर जपण्यासाठी सरोगसीचा आधार घेतलाय, असं लोकांचं गृहीतक आहे. हे कशावरून? कशावरून तिला काही वैद्यकीय प्रश्न नसतील? तिने सरोगसीचा मार्ग का निवडला याची सफाई द्यायची का? बरं असं काही असेल आणि तिने जाहीर केलं तर लोक ट्रोल करायचे थांबतील का?
लोक म्हणतायत तिने मूल दत्तक घ्यायला पाहिजे होतं. मूल दत्तक घेणं हा अतिशय उत्तम पर्याय असू शकतो आणि मूल दत्तक घेतल्यामुळे आजवर जगात लाखो लोक पालक झाले आहेत आणि लाखो मुलांना घर आणि प्रेमाची माणसं मिळाली आहेत हेही खरं आहे. पण तरी प्रियांका चोप्राला असं म्हणणाऱ्यांना मूल दत्तक घेण्याबद्दल काय माहिती आहे? सोपं असतं का ते? ज्यांनी दत्तक घेतलं आहे त्यांना विचारा केव्हातरी. तुमच्या जडणघडणीपेक्षा अत्यंत वेगळे गुणदोष असलेल्या मुलाशी जुळवून घेणं सल्ला देण्याइतकं सोपं नसतं. तिला ते सगळं इमोशनली करायचं नसेल, तर तो तिचा चॉईस आहे की नाही? तिच्याकडे पैसे आहेत म्हणून ती सरोगसीचा पर्याय स्वीकारू शकते. कारण त्या व्यवहाराची गरज असलेल्या गरीब स्त्रिया आहेत हेही असंच एक दुधारी आर्ग्युमेंट आहे. कारण त्या गरीब स्त्रिया एरवी काय करत असतात? याची कोणालाही चिंता नसते. थोडक्यात काय तर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने घेतलेला सरोगसीचा निर्णय हे हिमनगाचं केवळ टोक आहे. पण बाईच्या शरीरावर तिचा अधिकार नसणं, तिच्या शरीराबद्दल समाजाला मतं असणं, या घरोघरी असलेल्या समस्येचा मोठा हिमनग त्याखाली आहे. पण त्याकडे कोणाला बघायचं नाही आणि राहता राहिली सोशल मीडियावरच्या रिॲक्शन्सची बाब, तर ते आता इतकं गढूळ झालं आहे, की कोणीही काहीही बोललं तरी कोणीतरी ट्रोल करतंच.

(Image : google)

एवढ्याशाने काय होतंय?


प्रियांका चोप्रा ज्या युनिसेफची ब्रँड अँबेसेडर आहे, त्याच युनिसेफच्या आकडेवारीनुसार भारतात २०१८ साली २६,४३७ स्त्रियांचे गरोदरपण किंवा बाळंतपण याच्याशी संबंधित कारणांनी मृत्यू झालेले आहेत आणि या सर्व स्त्रियांपैकी थोड्या काही नशीबवान स्त्रिया सोडल्या तर इतरांचं बाळंतपणदेखील त्यांच्या आजूबाजूच्यांनी असंच ट्रोल केलेलं असणार. “एवढ्याशाने काय होतंय? आजकालच्या मुलींची नाटकंच फार!” “सारख्या कशाला तपासण्या करायच्या? तू काय जगातली पहिली बाई आहेस का बाळंतीण होणारी?” असली वाक्यं बहुतेक सगळ्या जणींना ऐकायला लागतात. 


(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
patwardhan.gauri@gmail.com

Web Title: Priyanka Chopra- Nick's baby, surrogacy and trolling; Why are people blaming Priyanka Chopra for 'surrogacy'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.