Join us   

गरोदरपणात भरपूर प्रोटीन्स खा असे सल्ले मिळतात, पण प्रोटीन्स आणि फॅट्स नेमके किती खावेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:28 PM

नऊ महिन्यांनंतर बाळंतपणाच्या वेळी आईच्या अंगात ताकद असणं आणि पूर्ण वाढ झालेलं सुदृढ बाळ जन्माला येणं खूप गरजेचं असतं. हीच प्रत्येक आईची इच्छा असते. त्यामुळे या काळात आपण काय खातोय, ते पौष्टिक आहे का याकडे बारकाईनं बघितलं पाहिजे.

ठळक मुद्दे  गर्भाची वाढ जसजशी होत जाते तशी शरीराची प्रथिनांची गरज वाढत जाते. उसळी हे अन्नातील प्रमुख घटक आहेत.गर्भावस्थेत दीर्घकाळ अन्नात यांचा वापर सहज शक्य आहे.प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांच्या बरोबरीनं शरीराला कर्बोदकांचीही गरज असते. कर्बोदकं शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी गरजेची असतात.

गरोदरपणाच्या काळात सकस आणि पोषक आहार असणं अतिशय गरजेचं आहे. मूल आणि आईच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी तर सकस आहार महत्वाचा असतोच पण याकाळात आई आणि बाळाची पोषक मूल्यांची गरजही पुष्कळ वाढलेली असते. गर्भाची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठीही शरीराला अधिक पोषणाची गरज असते. त्यामुळे आहार पोषकच असला पाहिजे. अन्नात प्रोटिन्स आणि फॅट्स असलेले पदार्थ असले पाहिजेत. जसे की, अंडी,  डाळी, उसळी आणि मर्यादित प्रमाणात स्निग्ध पदार्थ आणि साखर हा पदार्थांची आवश्यकता असते. गर्भाची वाढ जसजशी होत जाते तशी शरीराची प्रथिनांची गरज वाढत जाते. कारण गर्भाबरोबर, गर्भाशय, गर्भवेष्टण, नाळ, स्तन आणि मॅटर्नल रक्ताचे प्रमाणही वाढायला लागते.

प्रथिनं कुठून मिळू शकतात? प्रथिनं किंवा प्रोटिन्स वनस्पती आणि प्राणी या दोन्ही माध्यमातून मिळू शकतात. त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थातूनही प्रथिनं मिळतात.

प्राणिजन्य प्रथिनं मांस, दूध, अंडी, चीज, फिश इत्यादी. यात इएए  म्हणजे इसेन्शिअल अमिनो अँसिड असतं. योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. अंड्यातील प्रथिनं हे सर्वोत्कृष्ठ मानलं जातं. कारण ते एकतर पचायला सोपं असतं आणि भरपूर प्रथिनयुक्त असतं.

वनस्पतीजन्य प्रथिनं डाळी उसळी, शेंगा, धान्य, सोयाबीन, शेंगदाणे, किंवा इतर तेलबिया यात इएए  मोठ्या प्रमाणावर नसले तरीही आपल्या देशात डाळी, उसळी हे अन्नातील प्रमुख घटक आहेत. आणि त्यामानानं स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. त्यामुळे गर्भावस्थेत दीर्घकाळ अन्नात यांचा वापर सहज शक्य आहे.

कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांच्या बरोबरीनं शरीराला कर्बोदकांचीही गरज असते. कर्बोदकं शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी गरजेची असतात. सेल्युलोज हे एक प्रकारचं कर्बोदक आहे, ज्याचं योग्य प्रमाणात सेवन झालं आणि पाणी व्यवस्थित प्यायलं गेलं तर पोट साफ राहायला मदत मिळते.

आई जे जे अन्न खाते त्यावरच गर्भाचं पालन पोषण होत असतं. त्यामुळे आईचं अन्न सकस आणि परिपूर्ण किंवा पूर्णान्न असलं पाहिजे. पोषक आहारामुळे बाळाची सर्वांगीण वाढ योग्यरितीनं होते. त्याचप्रमाणे गरोदरपणाच्या काळात घेतल्या जाणाऱ्या अन्नातून शरीराला आवश्यक ती ऊर्जाही मिळालीच पाहिजे. कारण नऊ महिन्यांनंतर बाळंतपणाच्या वेळी आईच्या अंगात ताकद असणं आणि पूर्ण वाढ झालेलं सुदृढ बाळ जन्माला येणं खूप गरजेचं असतं. हीच प्रत्येक आईची इच्छा असते. त्यामुळे या काळात आपण काय खातोय, ते पौष्टिक आहे का याकडे बारकाईनं बघितलं पाहिजे.

विशेष आभार: डॉ. अतुल गणात्रा  (MD, DGO, FICOG)