समीरा रेड्डी ही बॉलिवूड अभिनेत्री. सध्या ती आपल्याला चित्रपटातून दिसत नाही. पण ती सतत चर्चेत मात्र असते. ही चर्चा असते तिच्या समाज माध्यमांवरील पोस्टची. नुकताच तिनं फेसबुकवर एक फोटो शेअर करुन त्याखाली एक पोस्ट लिहिली आहे. फोटोत तिच्या हातावरचे स्ट्रेच मार्क्स सहज दिसतात. यातून तिला काय सांगायचंय? हा प्रश्नाचं उत्तर तिच्या पोस्टमधे आहे.
सध्याचा काळ आहे ते लपवून नाही जे नाही आहे ते दाखवण्याचा आहे. बाळंतपणानंतर शरीरात बदल होतात. शरीरात एवढी मोठी घडामोड घडून गेल्यानंतर शरीर पूर्वीसारखं कसं दिसेल? पण स्त्रिया बाळांतपणानंतर जास्तीत जास्त मेकअप करुन बदललेल्या शरीराला झाकून सुंदर दिसण्याचा अट्टाहास करत असतात. पण बदल हे फोटोतून डोकावतातच. पण मग हे बदल का नाकारले जातात? का लाज वाटते आपल्याला आपल्याच शरीराची?
छायाचित्र- गुगल
समीरा रेड्डी नेमक्या याच भावनेवर बोट ठेवून बॉडी पॉझिटीव्हिटीच विचार मांडते. हा केवळ तिचा विचार नसून तिनं स्वत:शी केलेल्या झगड्यातून स्वत:पुरती , स्वत:च्या आनंदासाठी मिळवलेल उत्तर आहे.
तिचा हा झगडा, संघर्ष होता तो स्वत:च्या बदललेल्या शरीराला स्वीकारण्याचा. या संदर्भातच तिनं पोस्टमधे लिहिलं आहे आणि याद्वारे महिलांना वयाप्रमाणे आपल्या शरीरात होणारे बदल स्वीकारण्याचं आवाहन तिनं केलं आहे.
समीरा म्हणते की, आपण जर आपल्या शरीराबद्दल सकारात्मक विचार केला नाही, त्याला आहे तसं स्वीकारलं नाही तर मग मात्र आपल्या शरीरावर, मनावर त्याचा वाईट परिणाम होईल. आपल्या पोस्टमधे समीरा लिहिते की, ‘प्रिय स्ट्रेच मार्क्स आधी मी तुम्हाला घाबरत होते, मला तुमची लाज वाटायची. पण ज्या दिवशी मी तुम्हाला प्रेमानं कुरवाळलं, तुम्ही म्हणजे माझ्या शरीराचा भाग आहे असं म्हणत स्वीकारलं तेव्हा सगळं स्वरुपच बदललं. वाघाच्या शरीरावरील पट्यांप्रमाणे मला तुमच्याबद्दल प्रेम वाटू लागलं. मला माझ्यात पहिल्यापेक्षा जास्त ताकद आल्यासारखी वाटली. मी एक संकल्प केला आहे, 2021 मधे मी माझं आरोग्य सुदृढ करणार आहे. माझा सध्या याच दिशेनं प्रवास सुरु आहे. त्यामुळे या प्रवासात शरीरावर ज्या ज्या खुणा मला भेटतील त्यांचा मी उत्सव साजरा करणार आहे!’
छायाचित्र- गुगल
बॉडी पॉझिटीव्हिटीच्या आधीच्या एका पोस्टमधे समीरा विचारते की, ‘तुम्हाला तुमच्या शरीरातला कोणता भाग अस्वस्थ करतो? स्ट्रेच मार्क्स, ढीली झालेली त्वचा, सुटलेलं पोट, चेहेर्यावरचे मुरुम, पातळ केस की पांढरे केस? मला माझी जाडजूड पाठ आणि मांसल हात अस्वस्थ करतात. मी रोज त्यांना स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे स्वीकारण्यासाठी मला खूप वेळ लागला. या प्रवासात मला एक कळलं की प्रत्येक दिवस एक मंत्रासारखा काम करतो. त्याने काम क्लं आणि मी माझ्या शरीराला आहे तसं स्वीकारण्याचं काम करते आहे!’
समीरा म्हणते की, ‘मला पहिलं मूल झालं तेव्हा मी ठरवलं की मासिकाच्या मुखपृष्ठासाठे फोटोशूट करायचं. पण नऊ महिन्यानंतर माझं वजन 105 झालं होतं. खूप ताण आला होता मनावर. इतकं छान गुटगुटीत बाळ होऊनही मी आनंदी नव्हती. बाळाची काळजी नवराच घेत होता. एकदा सासूनं विचारलंच, ‘ बाळ इतकं गोंडस आणि सुदृढ आहे, नवरा इतका मदत करणारा, सांभाळून घेणारा आहे, मग कसलं टेन्शन आलंय तुला?’ सासूच्या या प्रश्नावर समीराकडे काहीच उत्तर नव्हतं. तिच्यावर ताण होता बाळंतपणानंतर बदललेल्या तिच्या शरीराचा, वाढलेल्या वजनाचा, शरीरावरील स्ट्रेच मार्क्सचा. या सर्व कारणांमुळे या फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर फेकलं जाण्याचा. पण हा तिचा ताण तिनं स्वत: दूर केला. हा प्रश्न तिनं स्वत:साठी सोपा केला. बदलेल्या शरीराला स्वीकारण्याचा, त्याच्यावर प्रेम करण्याचा प्रवास तिनं सुरु केला तिला सर्व गोष्टीतला आनंद आणि मोकळेपणा पुन्हा अनुभवायला मिळू लागला.
इतर महिलांच्या आयुष्यातला हा असा स्वत:ला , स्वत:च्या शरीरातल्या बदलाला स्वीकारण्याचा झगड संपावा म्हणून तिनं बॉडी पॉझिटीव्हिटीचा तिचा झगडा आणि विचार आपल्या पोस्टमधून शेअर केला.