कोणत्याही आजार आणि उपचाराचा विचार करताना मुलं आणि महिला यांचा वेगळा गट म्हणून विचार
होतो. मुलांची प्रतिकारक्षमता, वय आणि वजन यानुसार उपचाराची पद्धत आणि मात्रा ठरत असते. तसंच
गरोदर आणि स्तनदा मातांचा वेगळा विचार करावा लागतो. कोविडची लस आणि उपचार याबाबत समाज
माध्यमातून परस्परविरोधी मतांचा मारा होत असताना नक्की काय खरं हे कळेनासं होतं. त्यापैकी काही
प्रश्नांची जागतिक आरोग्य संघटना ‘WHO’ च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिलेली उत्तरं..
स्तनदा मातांनी लस घ्यावी का?
हो, लस घ्यावी हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या महिलांनी मुलांना जन्म दिला
आहे आणि ज्या आपल्या बाळांना स्तनपान करत आहेत त्या लस घेऊ शकतात. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा या
महिलांनी लस घ्यावी. ही लस घेतल्यास त्यांना कोणताच धोका नाही. सध्या वापरात असलेल्या एकाही
लसीमध्ये जिवंत विषाणू नसल्याने बाळाला दुधातून कोविडची लागण होण्याची कोणतीही शक्यता नाही.
उलट आईच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीज आईच्या दुधातून बाळाला मिळतील आणि त्यामुळे बाळालाच
थोडं संरक्षण मिळेल. पण लसीमुळे कोणतीही हानी पोहोचणार नाही. लस खूपच सुरक्षित आहे. त्यामुळे
बाळांना दूध पाजणाऱ्या स्त्रिया सध्या उपलब्ध असलेल्या सर्व लसी निर्धास्तपणे घेऊ शकतात.
ज्या स्त्रिया गरोदर आहेत किंवा मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचं काय?
गरोदरपणात आई आणि गर्भ, जन्माला येणारं मूल दोघांच्या आरोग्याची
आपल्याला काळजी असते. आपण त्यांना विशेष जपतो. म्हणून गरोदरपणात कोणतंही औषध किंवा लस
घेण्यापूर्वी त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही ना किंवा पूर्ण सुरक्षित आहे ना याची आपण खात्री
करून घेतो. कोविडच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की गरोदर महिलांना तीव्र कोविड होण्याचा धोका
जास्त असतो आणि मुदतपूर्व प्रसूती होण्याचा धोका असतो. सध्या देशभरात कोविड संसर्गाचं प्रमाण जास्त
आहे अशा या काळात तिचा इतरांशी जास्त संपर्क येत असेल किंवा ती आरोग्य कर्मचारी किंवा तिला
लागण होण्याची शक्यता जास्त आहे असं काम करत असेल तर त्या स्त्रीला लागण होण्याचा धोका खूप
जास्त आहे लस घेतल्यामुळे हा धोका नक्की कमी होईल. सध्या उपलब्ध असलेल्या लसीमध्ये आर एन ए
म्हणजे निष्क्रिय विषाणू किंवा त्यातल्या प्रोटीनचा वापर केला आहे. यापैकी कशातही जिवंत विषाणू
नसल्याने त्याची शरीरात पैदास होऊ शकत नाही त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होण्याची शक्यता
नाही. त्यामुळे अशा स्त्रियांना लस घ्यायची असेल तर त्यांना लस घेतल्यामुळे होणारे फायदे आणि धोके
समजावून सांगितले पाहिजेत. बहुतांश वेळा लस घेणं हा योग्य निर्णय असू शकतो. मी म्हणाले तसं स्त्रीला
कोविड होण्याचा धोका जास्त असेल तर लस घेतल्यामुळे तिला फायदाच जास्त होईल.
पाळीच्या काळात स्त्रियांनी लस घ्यावी का?
पाळी आलेल्या मुलीने अथवा स्त्रीने लस न घेण्याचं काहीच कारण नाही. पाळीत
तिला थोडा थकवा जाणवू शकतो हे आपल्या सर्वाना माहीत आहे. पण लस घेण्यासाठी वेळ मिळाली असेल
तेव्हाच पाळी आली असेल तर संकोच न ठेवता लस घ्यावी. कसलाही विपरीत परिणाम होणार नाही.
लस आणि प्रजननक्षमता आणि नपुसंकत्व याबद्दल बरीच चुकीची माहिती कानावर पडते, याबाबत विज्ञान
काय म्हणतं?
हो, हा गैरसमज खूप प्रचलित आहे. लस आणि प्रजननक्षमता याचा दूर दूरवर
एकमेकांशी काही संबंध नाही. लसीमुळे पुरुष किंवा स्त्री यांच्या प्रजननक्षमतेत काही बाधा आली असे
कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत कारण लस ही विषाणूच्या विशिष्ट प्रोटीन अथवा अन्टीजेनवर
हल्ला करते. लस कोविड विषाणूच्या यंत्रणेवर हल्ला करते त्याचा स्त्री किंवा पुरुष यांच्या प्रजनन अवयवांशी
काहीही संबंध येत नाही त्यामुळे लोकांनी निश्चिंत मनाने लस घ्यावी.
जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरून (‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’
डीएलए फाउंडेशन आणि युनिसेफचा संयुक्त उपक्रम)