गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफी करणं अतिशय आवश्यक असतं आणि या काळात घ्यावयाच्या काळजीचा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सोनोग्राफी केल्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होतेय ना हेही समजतं आणि बाळ आणि पालक यांच्यात भावनिक धागा तयार होतो. शिवाय सोनोग्राफीमध्ये गर्भाच्या हृदयाचे ठोके समजून शकतात, बाळाच्या शरीराची वाढ व्यवस्थित होत आहे ना आणि बाळाचं एकूण आरोग्य चांगलं आहे ना हे समजू शकतं.
गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यातील सोनोग्राफी
डेटिंग स्कॅन गरोदरपणातील पहिल्या सहा ते दहा आठवड्यातील सोनोग्राफी हा रुटीन चेकअपचा अपरिहार्य भाग आहे. या पहिल्या काही आठवड्यात केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीला डेटिंग स्कॅन असंही म्हटलं जातं. यात गर्भाच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित चालू आहेत की नाही हेही तपासलं जातं पण त्याचबरोबर गर्भातल्या बाळाला बघण्याची पहिली संधी याच काळात आईबाबांना मिळते.
पहिल्या तीन महिन्यात होणाऱ्या सोनोग्राफीचे फायदे : १) बाळंतपणाची तारीख: गर्भाचं आकारमान मोजणं पहिल्या तीन महिन्यानंतर अवघड होत जातं. त्यामुळे पहिल्या तिमाहीत होणाऱ्या सोनोग्राफीतून बाळंतपण कधी होईल याची निश्चित तारीख काढता येते. २) हृदयाचे ठोके समजतात. ३) गर्भ एकच आहे की जास्त आहेत हेही समजू शकतं. म्हणजेच जुळं, तिळं किंवा तीनपेक्षा अधिक गर्भ आहेत का हे समजतं. जेणेकरून गर्भाची क्षमता आणि आरोग्य यांचाही विचार डॉक्टरांना करता येतो. ४) गर्भाची वाढ व्यवस्थित होतेय ना, काही ऍबनॉर्मल नाहीये ना, गर्भाशयाचे आरोग्य अशा सगळ्यांचीच तपासणी होते. ५) जर गर्भात काही असामान्य बाब असेल आणि कुठल्याही कारणानं गर्भपाताची शक्यता असेल तर त्याची लक्षणंही दिसून येतात आणि तसे होऊ नये यासाठी काय करता येईल याचे मार्गदर्शन करू शकतात आणि काळजी डॉक्टर्स घेऊ शकतात. अनेकदा पहिल्या तिमाहीत डॉक्टर ओटीपोटापेक्षा ट्रान्सव्हजिनल सोनोग्राफी करायला सांगतात.
ट्रान्सव्हजिनल सोनोग्राफी
यात डॉक्टर किंवा त्यांचे सहकारी प्रोब किंवा तपासणी यंत्र योनीमार्गातून आत सरकवतात आणि गर्भलिंग पिशवी, हृदयाचे ठोके आणि गर्भाची भिंत या गोष्टी तपासतात. ओटीपोटाच्या स्कॅनमध्ये मूत्राशय पूर्ण भरलेलं असणं आवश्यक असतं. मूत्राशय पूर्ण भरल्यावर ओटीपोटावर एक जेल लावून मग वेगवेगळ्या कोनातून गर्भाची तपासणी केली जाते.
एनटी स्कॅन
बाळाच्या मानेच्या पाठीमागून गोळा केलेल्या द्रव पदार्थाची तपासणी यात केली जाते. यालाच न्यूकल ट्रान्सल्युसांसी म्हटलं जातं. जर बाळामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल जसं की, डाऊन सिन्ड्रोम , एडवर्ड्स सिंड्रोम, पॅन्टो सिंड्रोम. एनटी स्कॅन ओटीपोट, योनीमार्ग किंवा दोन्ही ठिकाणाहून केला जातो. सहा आठवड्याचा गर्भ असताना कुठल्या ॲबनॉर्मलिटीज नाहीयेत ना हे तपासण्यासाठी हा स्कॅन केला जातो. जर पहिल्या स्कॅननंतर नक्की गर्भात काय प्रॉब्लेम आहे हे नीटसं समजलं नाही तर परत काही दिवसांच्या किंवा आठवड्याच्या अंतरानं सोनोग्राफी करायला सांगितली जाते. विशेष आभार: डॉ. शरद एस. शिंदे
(MBBS, DNB, FCPS, DGO, DGO)