गर्भधारणा, प्रसूती आणि त्यानंतरचा काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी कमी अधिक प्रमाणात आव्हानात्मक असतो. शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल आपल्याला अनेकअर्थाने बदलवून टाकतात. बाळंतपण ही आनंदाची, काहीशी काळजीची आणि काही प्रमाणात भितीची अशी संमिश्र गोष्ट असते. एकीकडे नवीन बाळामुळे आपण हरखून गेलेलो असतो. तर दुसरीकडे आपल्याला ही नव्याने आलेली जबाबदारी झेपेल की नाही अशी भिती असते. यात सध्याच्या मुलींना आणखी एक भिती असते ती म्हणजे आपल्या फिगरची. बाळ झाल्यानंतर मी जाड होईन, माझं पोट दिसायला लागेल आणि त्यात सिझेरीयन असेल तर कंबरदुखी मागे लागेल ती कायमचीच अशी भिती वाटते. हल्ली सिझेरीयन डिलिव्हरी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बहुतांश तरुणींना डिलिव्हरीनंतर वाढणाऱ्या वजनाचे टेन्शन येते. पण बाळंतपणाचा काळ ताण घेण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला तर आपण नक्कीच खूश राहू शकतो. असे असले तरी सिझेरीयननंतर २ ते ३ महिन्यांनी काही योगासने नियमित केल्यास त्याचा आपल्याला चांगलाच फायदा होऊ शकतो. यामुळे वाढलेले पोट, दुखणारी कंबर आणि शरीराला एकूण आलेला शीणवटा भरुन निघण्यास मदत होते. पाहूयात ही आसने कोणती....
१. चतुरंग दंडासन किंवा प्लँक पोज
चतुरंग ही सूर्यनमस्कारातील एक महत्त्वाची पोज आहे. हा व्यायामप्रकार योगामध्ये तर केला जातोच पण जीममध्येही प्लँक म्हणून हा व्यायाम केला जातो. ५० ते ६० सेकंदांपर्यंत हे आसन धरुन ठेवावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच पाठीच्या मणक्याच्या बाजूच्या स्नायू सक्षम होण्यास या आसनाची मदत होते. तसेच बाळंतपणानंतर वाढणाऱ्या ओटीपोटाचा आकार कमी होण्यासही या आसनाचा उपयोग होतो. हे आसन पाहायला सोपे वाटत असले तरी त्यासाठी हातात जास्त ताकद असावी लागते.
२. भुजंगासन
भुजंगासन ही पण सूर्यनमस्काराच्या १२ आकड्यांमधील एक पोझ आहे. यामध्ये आपण मागच्या बाजुला वाकत असल्याने ९ महिन्यांपासून मणक्यावर आलेला ताण मोकळा होण्यास मदत होते. हे आसन तुलनेने करायला सोपे आहे. दोन्ही हात आणि पाय जमिनीवर समांतर रेषेत ठेवून पाठीतून मागे वाकल्यामुळे मणक्याला एकप्रकारचा ताण मिळतो. ५ ते १० सेकंद या पोझमध्ये थांबण्याचा प्रयत्न केल्यास या आसनाचा उपयोग होतो. यामुळे पोटाच्या स्नायूंनाही व्यायाम होत असल्याने पोट वाढले असल्यास ते कमी होते. तसेच सर्वच शरीराचा व्यायाम होत असल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
३. ताडासन
करायला अतिशय सोपे आणि संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होईल असे हे आसन बाळंत स्त्रियांनी आवर्जून करायला हवे. ९ महिने बाळ पोटात असल्याने आपले स्नायू आखडलेले असतात. मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर हे स्नायू काही प्रमाणात शिथिल होतात. अशावेळी ताडासनात हात, पाय, पाठीचा मणका अशा सर्वच अवयवांना ताडासनात ताण पडतो. दिर्घ श्वास घेऊन पायाच्या टाचा उचलून चौड्यांवर उभे राहिल्यास शरीराचे स्नायू ताणले जातात. महिलांना मासिक पाळी नियमित सुरू होण्यासाठीही या आसनाचा चांगला उपयोग होतो. दंड आणि पाय यांची ताकद वाढण्यासाठी ताडासनाचा उपयोग होतो.