एखाद्या स्त्रीला जर उशिरा मूल हवं असेल तर बीजांडाचं जतन करून ठेवण्याचा पर्याय तिच्याकडे आज उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षात ‘एग फ्रिझिंग तंत्रज्ञान’ विकसित झाल्यामुळे खरंतर हे शक्य आहे. बीजांड जतन करून ठेवणं आज प्रायोगिक मानलं जात नाही. हे तंत्रज्ञान आता कुणालाही उपलब्ध आहे आणि वैद्यकीय क्षेत्राच्या मुख्य प्रवाहाचं लक्ष त्यानं वेधलं आहे.
बीजांडाचं जतन म्हणजे काय? स्त्रीचं वय वाढत जाते तसतसं गर्भधारणेची शक्यता धूसर होत जाते. त्याचप्रमाणे बीजांडांची निर्मिती आणि त्यांचा दर्जा यावरही वयाचा परिणाम होतो. सोशल एग फ्रीझिंग मध्ये हेल्दी स्त्रीबीज साठवलं जातं. वयाच्या ३५ वर्षांच्या खालील महिला प्रामुख्यानं स्वतःचं बीज साठवून ठेवू शकतात. आणि नंतर गर्भधारणेसाठी वापरू शकतात. यामुळे वय वाढल्यानंतरही स्त्री गर्भवती होऊ शकते. मुळात तिचेच स्त्रीबीज असल्याने अनुवांशिक दुवाही जपला जातो.
स्त्रीबीज साठवणुकीच्या अनेक पद्धती आहेत. निरनिरळ्या कारणांसाठी स्त्रियांना गर्भधारणा पुढे ढकलावी लागते. अशावेळी स्त्रीबीज साठवून ठेवणं हा एक चांगला पर्याय असतो.
गर्भधारणा का लांबवली जाते?
जर, महिलेला कर्करोग झालेला असेल तर. एका कारण कर्करोगाचे उपचार पूर्ण होईपर्यंत महिला गर्भवती होऊ शकत नाही. आणि या उपचारांचे परिणाम म्हणून काही वेळा गर्भधारणेची स्त्री ची क्षमता नष्ट होऊ शकते. त्यामुळे स्त्रीबीज जर साठवून जपलेलं असेल तर त्याचा नंतर वापर करता येऊ शकतो. नैतिक आणि धार्मिक कारणांमुळे अनेक जण एम्ब्रयो फ्रिजिंगपेक्षा एग फ्रिजिंग करणं पसंत करतात.
प्रजननासाठी आवश्यक असणारी औषधं आणि इंजेक्शन्स दिली जातात. ज्यामुळे अंडाशयातून अधिक स्त्रीबीजं बाहेर पडतात. ही बीजं नंतर वापरता यावी यासाठी फ्रिज केली जातात. एम्ब्रयो फ्रीझिंगमध्ये स्त्रीबीजाबरोबरच शुक्राणूही लागतो. मात्र यात शुक्राणूंची गरज नसते. ज्यावेळी स्त्रीला गर्भधारणा हवी असते त्यावेळी तिचं बीज आणि शुक्राणू मिलन प्रयोगशाळेत करून मग ते आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भाशयात रोपण केलं जातं
किती स्त्रीबीजं साठवता येतात? एका स्त्रीची किती बीजं साठवता येतील हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. - स्त्रीचं मानसिक आणि शारीरिक वय - ओव्हरीन रिझर्व्ह - मूल कधी हवं आहे - जोडप्याच्ं आरोग्य बऱ्याच क्लिनिक्स मध्ये २० स्त्री बीजं साठवण्याबाबत सांगितलं जातं. पण त्यासाठी एका पेक्षा जास्त वेळा संपूर्ण प्रक्रिया करावी लागते.
यातले धोके काय? १) काहीवेळा थकवा, मळमळ, डोकेदुखी, पोटदुखी, स्तन दुखणे याचा त्रास होऊ शकतो. २) क्वचित केसेसमध्ये रक्ताच्या गाठी, पोट दुखी आणि उलट्या होऊन दवाखान्यात दाखल व्हावं लागतं. मात्र याचं प्रमाण अत्यल्प असतं. ३) साठवून ठेवलेली स्त्री बीजं पुढे जाऊन फलित होतील आणि गर्भधारणा होईल याची काहीही खात्री देता येत नाही. ४) साठवणुकीच्या प्रक्रियेत सगळीच स्त्री बीजं टिकाव धरू शकतात असं नाही. ५) साठवलेली बीजं फलित न होणं ६) फलित झालेल्या बीजांमध्ये दोष असणं ७) एकदा स्त्री बीजाची साठवणूक झाली की भविष्यात आपण आई होऊ शकतो ही खात्री मनाची होते आणि पुढे गर्भधारणा यशस्वी झाली नाही तर त्याचा मानसिक धक्का बसण्याची शक्यता असते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्त्रीला तिचं बीज आज साठवून ठेवता येतं. आणि गर्भधारणा तिला हवी तेव्हा करता येऊ शकते. हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असला तरीही डॉक्टरांशी बोलूनच हा निर्णय घेतला पाहिजे म्हणजे त्यात असणारे धोके, अडचणी या सगळ्याची सविस्तर चर्चा होऊ शकते. योग्य माहिती आणि व्यक्तिपरत्वे गरजेचं मार्गदर्शन मिळू शकतं. कारण प्रत्येकाचं शरीर जसं वेगळं असतं तशीच प्रत्येक स्त्रीची आणि तिच्या कुटुंबाची मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीही भिन्न असते.
विशेष आभार: डॉ. परीक्षित टंक (MD DNB FCPS DGO DFP FICOG FRCOG)