डॉ. शिल्पा चिटणीस जोशी
अगं साडेचार महिने झालेत प्रेग्नन्सीचे! इतके दिवस काय करत होतीस?
डॉक्टर अहो माझी पाळी अनियमितच आहे.. मला वाटलं येईल आज ना उद्या..
अगं पण एवढे महिने थांबलीस?..जाऊ दे आता पुढे काय ठरवलंयस?
डॉक्टर आम्ही दोघं एकत्र राहतोय गेले वर्षभर.. पण घरी कोणालाच माहीत नाहीये.. मी नोकरी करते.. त्याला अजून नोकरी मिळत नाहीये... अबॉर्शन तर करावंच लागेल.. तुम्ही मला खर्च सांगा.. मी पैशाची सोय करून येते..
- अवघी वीस वर्षांची ही मुलगी. गरोदर होती. आता म्हणत होती गर्भपाताशिवाय पर्याय नाही. तिच्याशी बोलून झाल्यावर ती आठवडाभरात परत आली. तिच्या अंगात रक्त कमी असल्यामुळे रक्तवाढीची २ इंजेक्शन पण मी तिला देऊन घेतली. सुदैवाने ही मुलगी आपण अडकलो म्हणत घाबरून गर्भपात करायला कुणा वैदूकडे गेली नाही. तिनं रीतसर डॉक्टरांकडे येणं स्वीकारलं. ॲडमिट झाल्यानंतर तिच्या आणि माझ्या सुदैवाने सगळं सुखरूप पार पडलं. सुखरूप म्हणजे काय की काहीही गुंतागुंत न होता.. पण रात्री बारापासून सकाळी दहापर्यंत तिला असह्य कळा सहन करायला लागल्या. त्या कमी करण्यासाठी आम्ही विशेष काही करू शकत नाही. बाळंतपणाच्या कळा सहन करताना स्त्रीला येणाऱ्या बाळाची चाहूल तरी सुखावत असते. या मुलीची प्रत्येक कळ केलेल्या चुकीच्या अवास्तव शिक्षेसारखी होती.
या सगळ्यामध्ये तिचा जोडीदार होता तिच्याबरोबर; पण त्याला कणभर तरी त्रास झाला का? अशावेळी क्षणभर राग येतो निसर्गाचा...
स्त्रीला निसर्गानं दिलेलं सृजनाचं देणं हे दुधारी शस्त्र आहे. एकीकडे ते गोजिरवाणं बाळ आणि मातृत्वाचा सुंदर आविष्कार स्त्रीच्या पदरात घालतं नाहीतर दुसरीकडे फक्त काळजावर उमटणाऱ्या वेदना देतं. या मुलीचं तसंच झालं होतं.
पण ती काही अपवाद नव्हे.
(Image : google)
आजकाल लग्नाआधीच लैंगिक संबंध ही अगदीच सामान्य गोष्ट झाली आहे. ७० ते ८० टक्के तरुणाई लग्नपूर्व लैंगिक संबंधांना सामोरी गेलेली असते. सिनिअर पिढीला कदाचित हे सत्य पचणार नाही; पण हेच सत्य आहे. आपल्या समाजातल्या ढोंगीपणामुळे पालकांना या गोष्टीची जाणीव नाहीये किंवा ते जाणूनबुजून दुर्लक्ष करताहेत.
मला इथे नैतिकतेच्या गोष्टी बिलकुल सांगायच्या नाहीयेत. सांगायचं ते एवढंच आहे, की मुलींनो स्वतःची जास्त काळजी घ्या. नको असताना राहिलेली प्रेग्नन्सी तुमचं आयुष्य बदलू शकते. अबॉॅर्शन करून मोकळं झालं की संपलं सगळं, असं होत नाही बऱ्याच वेळा. त्या जखमेच्या खुणा मनावर राहतात. पुढे त्रास देतात.
पुरुषांची वृत्ती अशा प्रसंगी बऱ्यापैकी स्वार्थी असते. झालं एकदाचं गर्लफ्रेंडचं अबॉर्शन असा सुटकेचा भाव मी खूप वेळा त्यांच्या चेहऱ्यावर बघते. अशावेळी वाटतं, की मुलींनी स्वतःच्या शरीराचा जास्त विचार करायला हवा. मुलामुलींचे लग्न ठरले असेल किंवा बऱ्याच वर्षांचे नाते असेल तर शारीरिक संबंध येणारच; पण थोड्याशा ओळखीतून लगेच नाते पुढे नेणे बरे नाही.
आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, की सर्व महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार आहे. २४ आठवड्यांपर्यंत अविवाहित महिलाही गर्भपात करू शकतात. पण हक्क मिळाला म्हणून हे सगळं सोपं नाहीये सयांनो! शरीर तुमचं, स्वतःची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा.
(Image : google)
नेमक्या चुका कुठे होतात?
१. पालकांना मुलांचं वागणं पटो ना पटो; पण त्यांनी तरुण मुलांनाही सांगितले पाहिजे की सगळी काळजी घेऊनही काही प्रॉब्लेम झालाच तर आधी आमच्याकडे या. आमच्याशी बोला. आम्हाला दुःख झालं तरी आम्ही तुम्हाला खंबीर पाठिंबा देऊ. आमच्यापासून लपवून परस्पर काही जीवावर बेतेल, असं करू नका.
२. अविवाहित आणि विवाहित जोडप्यांमध्ये ‘इमर्जन्सी पिल’ म्हणजे ‘असुरक्षित संभोगानंतर फक्त तोंडात टाकायची एक गोळी’ हा उपाय फारच सुरक्षित वाटतो आहे! पण याचे त्यांच्या मासिक पाळी व प्रजनन संस्थेवर होणारे दुष्परिणाम याचा विचार करायची त्यांची तयारी दिसत नाही. अविवाहित पुरुषही अशा संबंधानंतर आपल्या जोडीदाराला या गोळ्या देण्यास फारच उत्सुक (?) असतात! यातूनच एका महिन्यात ३-४ कधी कधी ८ (बापरे!) गोळ्या घेतलेल्या मी बघितल्या आहेत, यातील काही पेशंटना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून उपचार करावे लागले. काही वेळा तरीही प्रेग्नन्सी राहिली आणि त्यांची पुढे गुंतागुंत निर्माण झाली.
३. दुसऱ्या अजून एक प्रकारच्या गोळ्यांचा स्वैर गैरवापर चालू आहे, त्या म्हणजे गर्भपाताच्या गोळ्या! या गोळ्यांच्या पाकिटांवर ‘या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये,’ असे स्पष्ट शब्दात लिहिले आहे, तरीही कोणत्याही प्रकारच्या योग्य वैद्यकीय सल्ला न घेता महिलांना या गोळ्या राजरोसपणे दिल्या जात आहेत. हा मुलींच्या, महिलांच्या जीवाशी खेळला जात असलेला क्रूर खेळ आहे, हे अजून लोकांच्या लक्षात आलेले दिसत नाही! कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता, गरोदरपणाचे किती महिने झाले आहेत, सोनोग्राफीने ते पक्के केल्याशिवायच चुकीच्या डोसमध्ये या गोळ्या घेतल्याने अर्धवट गर्भपात होतो व प्रचंड रक्तस्त्राव होऊन या पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. त्यानंतर इमर्जन्सी क्युरेटिंग करावे लागते. तसेच जंतुसंसर्गाचा धोका हा या पेशंटसाठी खूप जास्त असतो. हा जंतुसंसर्ग नंतर येणाऱ्या वंध्यत्वाला जबाबदार असू शकतो. या सगळ्याची गोळ्या घेणाऱ्या बिचाऱ्या पेशंटला काहीच कल्पना नसते! विवाहपूर्व व अनैतिक संबंधांमध्ये पुरुषांकडून त्यांच्या जोडीदाराला या गोळ्या दिल्या जाण्याचे प्रमाण बरेच आहे.
४. काहीजण इंटरनेटवर माहिती वाचून हे उद्योग करतात; पण त्यामागे वैद्यकीय ज्ञान नसल्याने होणारे धोके त्यांच्या लक्षात येत नाहीत! ‘निमहकीम खतरेमे जान!’ याचे हे फारच ज्वलंत उदाहरण आहे.
अजूनही तरुण पिढी विवाहित अथवा अविवाहित मोकळेपणाने गर्भनिरोधनाविषयी बोलणे, योग्य सल्ला वेळेत घेणे या गोष्टी करू शकत नाहीये.
‘त्या गर्भनिरोधक गोळ्या वगैरे वापरू नका बरं का! नंतर दिवस राहणार नाहीत! मग बसा पश्चात्ताप करत,’ अशी वैद्यकीयदृष्ट्या पूर्ण चुकीची दहशत घातली जाते.
५. आजकालच्या तरुण पिढीचे करिअरचे, परदेशी जाण्याचे बरेच बेत असतात. त्यात नको तेव्हा दिवस राहण्याची भीती त्यांना या गोळ्या घ्यायला भाग पाडते तसेच शेवटी दिवस राहिले की मात्र सैरभैर होऊन ही तरुण जोडपी पुढचा मागचा विचार न करता जो भेटेल त्याच्या सल्ल्याने (बऱ्याच वेळा केमिस्टच्या) नको त्या गोळ्या घेतात आणि मग आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी त्यांची दारुण अवस्था होते!
६. या सगळ्या समस्यांमुळे तरुण, विवाहित, अविवाहित सर्व महिला व मुली यांना आमचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे कळकळीचे आवाहन आहे की वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गर्भपाताच्या गोळ्या घेऊ नका. पूर्ण आरोग्याचे नुकसान होण्याचा धोका त्यात आहे.
(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ आहेत.)
shilpachitnisjoshi@gmail.com