प्रेग्नन्सीचे नऊ महिने वेगवेगळे त्रास सहन करून, बाळांतपणाच्या कळा सोसून स्त्री जेव्हा एका जीवाला जन्म देते, तेव्हा ती शरीराने खरोखरच खूप क्षीण झालेली असते. आईच्या अंगात ताकद असली तरच ती बाळाचे योग्यप्रकारे संगोपन करू शकते. बाळ झाल्यावर बहुतांश आईला सतावणारी चिंता म्हणजे ब्रेस्ट फिडिंग. काही जणींना मुळातच भरपूर दूध असते, तर काही जणींना दूध वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
आई जेव्हा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असेल, तेव्हाच ती बाळाला पुरेसे दूध देऊ शकेल आणि तिच्या बाळाची भूक भागवू शकेल. आजकाल बाळाला दूध पुरत नाही, अशी तक्रार बऱ्याच नवमातांची असते. ही तक्रार दूर करण्यासाठी आणि बाळाला आईचे भरपूर दूध मिळावे यासाठी स्तनदा मातांनी काही पदार्थ आवर्जून खाल्लेच पाहिजेत.
स्तनदा मातांनी हे पदार्थ खाल्ल्यास त्यांचे दूध नक्कीच वाढू शकेल
१. दूध वाढविण्यासाठी आईने लोणी, तूप, दूध हे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजेत.
२. अळीव अशा दिवसांमध्ये अतिशय उपयुक्त ठरतात. अळीवामुळे कंबरेचे स्नायू तर मजबूत होतातच पण त्यासोबतच आईला भरपूर दूध येण्यास मदतही होते. अळीवाची खीर, अळीवाचा शीरा आपल्याकडे खूप जुन्या काळापासून बाळांतिणींना दिला जातो. त्यामुळे स्तनदा मातांनी दूध वाढविण्यासाठी अळीव अवश्य खावेत.
३. दूध कमी येत असेल तर स्तनदा मातांचे पाणी पिणे कमी होते आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे भरपूर पाणी पिणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आहारात लिक्वीड गोष्टी घेत जाव्यात. योग्य प्रमाणात सूप घ्यावे. तसेच वरण पोळी, पातळ भाजी आणि पोळी कुस्करून खाणे वाढवावे.
४. डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्याव्या.
५. पालेभाज्या तसेच कडधान्यांचा आहारातील समावेश वाढवावा.
६. दूध वाढविण्यासाठी बदाम आणि खारीक खाणेही खूप उपयुक्त ठरते.
७. शतावरी कल्प नियमितपणे घेतल्यासही दुधात वाढ होते, असा अनेक जणींचा अनुभव आहे.
८. डाळिंब, सफरचंद आणि टरबूज ही फळेही दूध वाढीसाठी गुणकारी ठरतात.