प्रेगन्सीमध्ये काही जणींचे वजन वाढत नाही. वाढले तरी ते खूप जाणवेल इतपत नसतेे. पण जसे बाळांतपण होते, तसा वजनाचा काटा झरझर पुढे पळत जातो. बाळांतपणापुर्वी आणि बाळांतपणानंतर यातला फरक जर पाहिला तर फक्त गरोदरपणामुळे आलेले पोट कमी झालेले असते आणि बाकी शरीर मात्र पुरते फुलून गेलेले असते. अनेकजणी याच धसका घेतात आणि वाढलेले वजन कमी होईल का, या चिंतेने त्रस्त झालेल्या असतात.
पण बाळांतपणानंतर झपाट्याने वाढलेले वजन तेवढ्याच वेगात कमीदेखील करता येते, हे अनेक जणींनी स्वत: अनुभवले आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री करिना कपूर खान, अभिनेत्री ऐेश्वर्या राय बच्चन, शिल्पा शेट्टी आणि अशा बऱ्याच जणी. त्यामुळे वाढलेल्या वजनाचं टेन्शन अजिबात घेऊ नका. या सेलिब्रिटींप्रमाणेच तुमच्या अवतीभोवतीही अशा अनेक जणी असतील, ज्यांनी बाळांपणानंतरचे वजन योग्य पद्धतीचा डाएट फॉलो करून आणि व्यायाम करून घटविले असेल.
करिना कपूर हिच्या संदर्भातली एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये करिना लाल रंगाच्या ड्रेसमध्ये असून ती अतिशय ग्लॅमरस दिसते आहे. तिची दुसरी डिलेव्हरी होऊन नुकतेच सहा महिने झाले आहेत. पण तरीही या ६ महिन्यांच्या काळात करिनाने करिनाचा झालेला वेटलॉस खरोखरच अनेकजणींना प्रेरणादायी ठरणारा आहे.
या पोस्टमध्ये करिना कपूर म्हणतेय की, “माझ्या दोन्ही बाळांतपणात माझे वजन खूप जास्त वाढले होते. पण वाढलेल्या वजनामुळे मी कशी दिसते आहे याचे टेन्शन मी कधीच घेतले नाही. मला मुळातच वर्कआऊट आणि नियमित व्यायाम करणे खूप आवडते. मला याेगा आणि वेगवेगळे व्यायाम प्रकार करायला आवडते. नियमित योगा आणि व्यायाम करून मी माझे १० किलो वजन घटवले आहे आणि मला आणखी १० किलो वजन कमी करायचे आहे.
करिनाची एक दुसरी पोस्ट देखील इन्स्टाग्रामवर दिसते. यामध्ये ती म्हणते की कोणी सांगतंय म्हणून किंवा मला कोणते चित्रपट साईन करायचे आहेत, म्हणून मला फिट रहायचे नाही. तर फिट राहणं आणि व्यायाम करणं ही माझी स्वत:ची आवड आहे. मला खरोखरच एक फिट आणि हेल्दी आई व्हायचं आहे, असंही करिनाने या पोस्टमध्ये शेअर केलं आहे.
बाळांतपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी......
- करिनासारखा व्यायाम किंवा वर्कआऊट करून डाएट फॉलो करणं प्रत्येकीला शक्य नाही. पण तरीही दिवसातला अर्धा तास तरी स्वत:साठी काढा आणि व्यायाम करा.
- अमूक व्यायामच केला पाहिजे असं काही नाही. सुर्यनमस्कार, वॉकिंग किंवा रनिंग, सायकलिंग, योगासने, स्ट्रूेचिंग, झुंबा यापैकी कोणताही तुमच्या आवडीचा व्यायामप्रकार निवडा आणि व्यायाम करा.
- सुरूवातीला एकदमच अति व्यायाम करायला जाऊ नका. थोडा थोडा करत व्यायामाचा वेळ वाढवा. जेणेकरून थकवा आणि व्यायामाचा कंटाळा येणार नाही.
- खाण्यापिण्याची काही पथ्ये आवर्जून पाळा.
- चहा, कॉफी वारंवार घेण्याऐवजी लिंबू पाणी, ताक, ज्यूस पिण्यावर आणि फळे खाण्यावर भर द्या.
- सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करण्याआधी वाढत्या वजनाची चिंता करणं सोडून द्या. चिंतामुक्त मनाने व्यायाम करा.