तीन महिन्यांचं बाळ घरी ठेवून जीममध्ये व्यायाम करायला आलेली नेहा भेटली. बाळ अंगावर पीत असले तरी व्यायाम करायला काही हरकतच नाही. उत्तम आहार, ओल्या बाळंतिणीला साजेसा आहार आणि मेडिटेशन, झोप हे सारं जमलं तर आनंदाची गोष्ट. सव्वा महिन्यानंतरच पिझा, सॅण्डवीचेस, हॉटेलिंग सुरु केलं. असं नेहा म्हणाली त्यातही काही फार गैर नाही, कधीमधी खाल्लं आणि बाळाला काही पोटदुखीचा त्रास नाही झाला तर ब्रेड खाऊ नये असेही काही नाही. पण प्रश्न एवढाच होता की ते सारं खाऊनही आपलं वजन वाढू नये, फिगर खराब होवू नये, ऑफिस जॉइन केल्यावर कुणी आपल्याला जाड झालीस म्हणू नये याचं तिला टेंशन होतं. नेहासारखी तरुणी बॉडी शेमिंगच्या या ट्रॅपमध्ये का अडकली असेल? इन्स्टावर कुणी म्हंटलं की आता दिसतेस तू एका पोराची आई तर त्यात आपलं वय वाढलं, आपण तरुण दिसत नाही हे का डोक्यात यावं? मुळात बाळांतपणानंतर सहा-आठ महिने, काहींना वर्ष दोन वर्षेही वजनवाढीचा त्रास होवूच शकतो. त्यामुळे घाबरुन जायची गरज नसते.
(Image : google)
पण असं होतं खरं. बाळंतपणानंतर लगेच वजन घटवून अतीश्रम करण्याची घाई आरोग्याला बरी नाही हे पण अनेकजणी विसरुन जातात. त्याला कारण आपल्यापर्यंत माध्यमातून किंवा सोशल मीडियातून येतं ते. अमूक अभिनेत्रीने बाळांतपणानंतर चार महिन्यात इतकं वजन कमी केलं, तमूक तर दहाव्याच दिवशी कामावर रुजू झाली. आणि मग अनेकींना वाटतं की आपण डिलिव्हरीनंतर लठ्ठ झालो, शेप बिघडला तर? खरंतर ऐश्वर्या रायसारखी विश्वसुंदरीपण डिलिव्हरीनंतर काही काळ जाड झाली तर लोकांनी तिला ट्रोल केलं. पण तिने आपलं वजन लपवलं नाही. अगदी अलीकडे करीना कपूरनेही पोट सुटलेलं दिसलं तर दिसलं म्हणत आपलं जगणं बदललं नाही.
मग आपण तरी ते का करावं?
मुळात शास्त्रीय माहिती न घेता आपल्या शरीरावर केलेल्या प्रयोगाचा आपल्या बाळावर काय परिणाम होईल, आपल्या शरीरावर काय परिणाम होइल याचा विचार करायला हवा. मूल अंगावर पीत असताना किमान सहा महिने तरी आपल्या आणि बाळाच्याही पोषणाचा विचार करायला हवा. बाळांतपणानं झालेली शरीराची झीजही भरुन यायला हवी. वजन वाढेल या भितीनं अनेकजणी पौष्टिक अन्न खात नाहीत. दूध पित नाही. आराम करत नाहीत. पचन बिघडतं. हाडं कुरकुरकुरायला लागतात.
किमान करीना कपूर बाळंतपणात गुळ भाकरी, तीळाची, जवसाची चटणी खात होती हे ही लक्षात ठेवलं तर आपला आहार सांभाळून, वजन आणि पोषण दोन्ही उत्तम करता येईल. मंत्र एकच शास्त्रीय माहिती घेणं, आणि अतिरेक टाळणं.