स्त्री गरोदर झाली की तिला सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो, ‘तुला काय खाण्याचे डोहाळे लागले आहेत? मग पुढचे नऊ महिने घरातील मंडळी, नातेवाईक, जवळच्या मैत्रिणी त्या गरोदर स्त्रीला लागलेले डोहाळे पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि ती स्त्रीही तिचे डोहाळे आपल्या हक्काच्या माणसांकडून पुरवून घेते.
गरोदर स्त्रीला डोहाळे लागणं हे जणू एक समीकरण झालं आहे? काय असतात हे डोहाळे, ते लागतात म्हणजे काय होतं? ही परंपरा आहे? की यामागे काही शास्त्रीय कारण आहे? , हे शोधण्याचा प्रयत्न केल्यास काय आढळतं?
डोहाळे म्हणजे नक्की काय?
खरंतर डोहाळे लागणं म्हणजे एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होणं इतकंच नसून कोणतीही इच्छा तीव्र होणं .गरोदर स्त्रीला एखादा पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा झाली की तिला अमक्या तमक्याचे डोहाळे लागले असं म्हणतात. आणि ते डोहाळे पूरवण्याचा मग सगळेजण कसोशीने प्रयत्न करतात. एका चालत्या बोलत्या शरीरात नवीन जीवाची उत्पत्ती होणं ही अत्यंत गूंतागूंतीची आणि क्लिष्ट अशी आणि शरीरात अनेक अंतर्गत बदल घडवणारी प्रक्रिया असते. या एकंदर गरोदरपणाच्या स्थितीमधे स्रीच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल घडतात. हार्मोन्सच्या पातळीमधेही प्रचंड बदल होतात. गरोदर स्त्रीची दिनचर्या बदलते. तिच्या शारीरिक क्षमता, सामाजिक जीवन यावर अनेक मर्यादा येतात. या मर्यांदाचा, गरोदरपणामूळे तिच्यावर आलेल्या अनेक बंधनांचा नकळत एक कोष विणला जाऊ लागतो. तिला अनेक नवीन जबाबदाऱ्यांची जाणीव होऊ लागते. तिच्यात होणाऱ्या वेगवेगळ्या हार्मोनल बदलांमूळे ती अतिसंवेदनशील होते. अशा गरोदर स्त्रीच्या मनात खाण्यापिण्याविषयीचा किंवा कृती विषयीचा एक विचार येतो आणि तो पक्का होतो आणि त्याची तल्लफ लागते. बऱ्याचदा डोहाळे लागणाऱ्या पदार्थांमधे चटकदार, चटपटीत आणि कमी पोषण मूल्य असणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो.आणि जाणकार लोक, स्वत: डॉक्टर हे गर्भवती स्त्रीला ताजं, घरी शिजवलेलं, जास्तीत जास्त पोषण मूल्यं असलेले पदार्थ, भाज्या, फळं खाण्याचा सल्ला देतात. आणि या पार्श्वभूमीवर त्या स्त्रीला चाट, पाणीपुरी, सामोसा असे चटकदार, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे. अशा वेळी त्या गरोदर स्त्रीच्या मनात एखादा हवाहवासा पदार्थ खावासा वाटतो, तो विचार मनात रुजायला लागतो, पक्का होतो आणि त्याची तल्लफ मनात फेर धरायला लागते आणि तो पदार्थ खाण्याची इच्छा होते. हे झालं डोहाळे लागण्याचं साधंसं स्पष्टीकरण.
का लागतात डोहाळे?
वैद्यकदृष्ट्या या डोहाळ्यांकडे मात्र वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. गरोदर स्त्रीमधे एखादं पोषक तत्त्वं कमी असेल तर ते पोषक तत्त्वं असलेला पदार्थ खाण्याची इच्छाही दिसून येते. जसं की खूपशा गरोदर स्त्रियांना भाजकी माती खावीशी वाटते. गर्भावस्थेतत जर त्या स्त्रीच्या शरीरात तांबं आणि लोह यांची कमतरता असेल तर माती खाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न होऊ शकते. पण या माती खाण्याचे डोहाळे पुरवताना त्या स्रीच्या शरीरात घातक विषाणू प्रवेश करतात आणि त्याचे दीर्घकालीन दूष्परिणामही दिसतात. ब जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर मग बोरं,चिंचा, कैरी असे आंबंट चिंबट पदार्थ खाण्याची इच्छा होते. मॅग्नेशिअमची कमतरता असल्यास डार्क चॉकलेट, नटस, बिन्स असं खाण्याची इच्छा होते. गरोदर स्त्रीला लागणारे प्रत्येक डोहाळे हे तिच्यासाठी लाभदायक असतातच असं नाही. तेव्हा तिच्याशी बोलून , तिला मार्गदर्शन करणं गरजेचं असतं.
हटके डोहाळे
खूपशा स्त्रियांना जरा वेगळेच आणि आरोग्यदृष्ट्या हानिकारक डोहाळे लागतात. जसे अति थंड पदार्थ, आईस्क्रिम खाणे, खडू खाणे, माती, कोळसा खाणे अशाही इच्छा निर्माण होतात. अनेकींना सिगरेटचा वास हवाहवासा वाटतो. आपल्यापेक्षा पाश्चिमात्य देशात तर गरोदर स्त्रियांना सिगारेट ओढण्याचेही डोहाळे लागतात. वेळी अवेळी खावंसं वाटतं, मध्यरात्री उठूनही स्त्रीला खावंसं वाटतं. या काळात स्त्री ही अत्यंत संवेदनशील झालेली असते. गरोदर स्त्री नाजूक परिस्थितीतून चाललेली असते तेव्हा तिला एक मानसिक आधार हवा असतो. हा आधार ती बरेचदा हे डोहाळे पुरवून घेऊन शोधत असते. हा आधार मिळवण्याचा प्रयत्न करते. तिला होत असलेली इच्छा कोणी पुरवली की तिला खूप बरं वाटतं. हे एक मानसिक कारण आहे.
अनेकदा स्त्रीच्या डोहाळ्याचा संबंध बाळाशी जोडला जातो. पोटातल्या बाळाला हे हवं असतं म्हणून स्त्रीला खाण्याची इच्छा होते असा समज असतो. पण हा एक समज आहे. जिव्हाळे आणि डोहाळे. आईचा जीव बाळात गूंतलेला असतो. आणि बाळाकडून ते मागितले जाते असा त्यामागचा समज असतो.
डोहाळे कधी लागतात?
गरोदर स्रीला डोहाळे हे कधीही लागू शकतात. काहींना पहिल्या तीन महिन्यातच लागतात, काहींना तीन महिन्यानंतर लागतात, काहींना उशीराही लागू शकतात. अनेजणींमधे तर पाळी चुकते तेव्हाही त्या स्त्रीला आंबट वगैरे खाण्याची इच्छा होते. या डोहाळ्यांमागे एक सूरक्षेची भावना असते. आपल्याकडे सर्व लक्ष देत आहेत, आधार देत आहेत, लाडकोड करता आहेत यातून तिच्यात सूरक्षिततेची भावन निर्माण होत असते. या टप्प्यात स्त्री खूप हट्टी झालेली असते, जे हवं ते मिळायल हवं असंही तिला वाटतं. गरोदरावस्थेत हार्मोन्समधे जे बदल होतात त्याचा परिणाम टेस्ट बडसवर म्हणजे चवीच्या गंथ्रीवरही होतो. वासांच्या ग्रंथीवरही होतो. त्यामूळेही गरोदर स्त्रीला अमूक तमूक किंवा विशिष्ट पदार्थ खाण्याच्या भावना होतात. तर कधी कधी उलटंही होतं. आधी तिला जो पदार्थ खूप आवडत असतो तो गरोदरपणात अगदी नकोसाही होतो. ही देखील एक सामान्य बाब आहे. यामागेही हार्मोनल बदल हेच कारण आहे. गरोदर अवस्थेत शरीरात बदलत असणाऱ्या हार्मोन्सचा परिणाम ग्रंथींवर, शरीरातल्या रसायनांवर होत असतो. आणि त्यामूळे खाण्या पिण्याच्या सवयीही बदलतात. अर्थात हे बदल तात्पुरते असतात. गरोदर अवस्थेतले हे हामोन्स काही तसेच राहात नाही. ते परत सामान्य होतातच. असं या डोहाळ्यांमागे शास्त्रीय , सामाजिक आणि मानसिक अशी तीनही प्रकारची कारणंअसतात.
बहुतांश गरोदर स्त्रियांना डोहाळे लागत असले तरी प्रत्येकच गरोदर स्त्रीला ते लागतात असंही नाही. थोडी फार इच्छा ही प्रत्येक गरोदर स्त्रीमधे निर्माण होते. पण काहीजणी ती इच्छा मनाशी धरुन ठेवत नाही. त्यामूळे तिचं तलफेत रुपांतर होत नाही. आणि त्यामुळे तिला डोहाळे लागत नाही. स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा संपूर्ण घरातली ती एक केंद्रीय व्यक्ती बनते. सगळ्यांचं तिच्याकडे लक्ष असतं. सगळेच तिचं कौतुक आणि लाड करत असतात. तेव्हा तिच्याकडे हे हक्काचं साधन होतं.
सवयींचेही डोहाळे
डोहाळे हे फक्त खाण्याचेच लागतात असं नाही तर ते सवयींचेही लागू शकतात. अनेक गरोदर स्त्रियांमधे या काळात काही सवयी बदलतात. एखाद्या स्त्रीला आळशीपणाचेही डोहाळे लागतात. जी स्त्री पूर्वी स्वच्छतेची असते ती या काळात व्यवस्थितपणाबद्दल चालढकल करायला लागते. हे असं वागण्यामागेही अनेक कारणं आहेत. त्या स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात.त्याचं कळत नकळत दडपण त्या स्त्रीच्या मनावर येत असतंच. अनेक गरोदर स्त्रियांचं हिमोग्लोबिन कमी असतं, त्यावेळेस तिला ऑक्सिजन लेव्हल कमी मिळत असते, त्यामूळेही गरोदर स्त्रिया ( एरवी उत्साही असणारीही )सुस्त होते. त्यामूळे अनेकींना असे पडून राहाण्याचेही डोहाळे लागतात. अनेकींची झोप या काळात खूप अनावर होते. मेंदूतील झोपेचं केंद्र या अवस्थेत खूप क्रियाशील झाल्यास गरोदर स्त्रीला सतत झोप येते. म्हणून तिला मग झोपेचे डोहाळे लागले असं म्हणतात. एखादीला सारखं बाहेर फिरण्याचे डोहाळे लागतात. कारण तिला या काळात ताज्या हवेची गरज असू शकते. असे हे डोहाळे केवळ गरोदर स्त्रीमधे झालेल्या शारिरिक , हार्मोनल बदलांमूळे तात्पुरत्या इच्छांच्या स्वरुपात समोर येतात.
तज्ज्ञ मार्गदर्शन
- डॉ. गीता वडनप ( स्त्री रोग तज्ज्ञ)