डॉ. गौरी करंदीकर
डॉक्टर, मला डिलिव्हरीच्या वेळी होणाऱ्या कळांची भीती वाटते…
मी कळा सहन करू शकेन का?
पूर्वी नाही का आम्ही कळा देऊन डिलिव्हरी केली, आजच्या मुली फारच नाजूक-एखाद्या सासूबाई म्हणतात.
असे अनेक प्रश्न, प्रसूतीबाबत शंका-कुशंका आम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ ऐकत असतो. एकीकडे गर्भवती मुलींची चिंता, त्यांच्यावर असलेली प्रसूतीची नैसर्गिक जबाबदारी, घरच्या मंडळींची ‘नॉर्मलच’ डिलिव्हरी व्हावी, ही अपेक्षा. त्यामुळे गरोदरमातेला येणारा ताण, तिला वाटणारी भीती दिसते. त्यात आताशा सोशल मीडियामुळे पसरत चाललेलं चुकीचं ज्ञान आणि त्यातून वाढत चाललेली अनिश्चितता असाही मोठा प्रश्न असतो.
प्रसूती ही नैसर्गिक बाब असून त्याच्यामागचे विज्ञान समजणे जरुरीचे आहे.
प्रसूतीवेळी येणाऱ्या कळा म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे.
गर्भाशयातील स्नायू म्हणजेच मायोमेट्रिम हे प्रसूती दरम्यान आकुंचन पावतात आणि शिथिल होतात.
या क्रियेमुळे गर्भ बाहेर येण्याच्या मार्गावर हळूहळू खाली सरकण्यास मदत होते.
शिवाय त्यानेच गर्भाशयाचे मुख उघडण्यास मदत होते.
(Image : google)
प्रसुूतीची प्रक्रिया सुरू होण्याआधी म्हणजे नवव्या महिन्यात हळूहळू ही क्रिया चालू असते.
मात्र त्यावेळेला आकुंचन आणि शिथील होणाऱ्या स्नायूनी गर्भाशयात काही प्रमाणत दाब तयार होतो.
जसा एक मऊ रबरी चेंडू हळूहळू दबला जावा इतपतच!
तोच दाब जेव्हा साधारण २५ मिलिमिटर एचजी यापुढे वाढतो तेव्हा स्त्रीला तो दाब वेदना म्हणून जाणवू लागतो.
त्यामुळे वेदना म्हणजे मूळतः गर्भाशयात तयार होणारा दाब आहे आणि तो प्रसूतीच्या वेळी वाढत जात जात, ही प्रक्रिया पूर्ण होण्याकडे वाटचाल होते.
गर्भाची, गर्भिणीची आणि एकूणच गर्भावस्थेवर अवलंबून असते की ही प्रगती कशी आणि कधी होईल.
तर प्रसूती कळा या अत्यंत जास्त दाब गर्भाशयात तयार झाल्यामुळे होतात. शिवाय गर्भाशयाचे मुख उघडत असल्याने त्या वेदना जाणवतात.
आता प्रसूती सुलभ आणि वेदना सहन करता याव्या यासाठी अनेक प्रकाराने उपाय उपलब्ध असतात.
मात्र तरीही प्रसूतीची तयारी ही शारिरीक- मानसिक आणि आता कौटुंबिक पण असते.
नऊ महिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम, प्राणायाम केल्याने प्रसूती मार्गात असलेले स्नायू बळकट आणि लवचिक होतात. काही जणींना असे करणे शक्य नसल्यास त्यांनी खंत करू नये. कारण प्रसूती सुखरूप व्हायची तर त्याचा मूळ मंत्र आहे, आई आणि बाळ सुखरूप असणे.
(Image : google)
मात्र होतं काय?
१. आपल्याला कळा सहन करता येतील आणि त्याबाबत असलेली भीती आणि गैरसमज आपल्या डॉक्टरांशी बोलून दूर केले पाहिजे. घाबरतातच अनेकजणी.
२. प्रसूती अशी घटना आहे की सर्व सुरळीत चालू असताना पण काही अडचणी येणे शक्य आहे, हे कुटुंबातील मंडळींनी ध्यानात ठेवणे जरूरी आहे.
३. प्रसूती सुसह्य करण्यासाठी काही पर्याय आहेत का? असा प्रश्न अनेकींना छळतो.
प्रसूतीपूर्वी करायचं काय?
१. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे समजायलाच हवं की प्रसूती ही एक नैसर्गिक बाब आहे आणि आपले प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी संवाद साधून विश्वास ठेवणं की सारं उत्तम होईल. ही पहिली पायरी आहे.
२. काही वैद्यकीय विकार जसे गर्भवती स्त्रीला उच्च रक्तदाब असणे, हृदयाचे कही आजार असणे, मानसिक आजार असणे, त्यामुळे प्रसूती वेदना आईच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. यावेळी वेदना कमी करण्यासाठी काही उपचार असणे हे उपयुक्त ठरते.
३. वेदना सहन करता याव्या यासाठी अनेक उपाय आहेत. प्रत्येक उपाय हा वेगळ्या प्रमाणात वेदना कमी करतात.
प्रसूती दरम्यान केलेला मसाज आणि व्यायाम हा ही प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करते.
५. त्याचबरोबर, नसांमधून येणाऱ्या वेदनांची तीव्रता कमी करणारे यंत्र असते. त्यासारखेच, हायप्नो बर्थिंग म्हणजे परत वेदना सहन करण्यासाठी आपल्या मनावरचा ताबा नियंत्रित केला जातो. ॲक्युपंक्चर ही पद्धतपण काही ठिकाणी वेदना कमी करण्यासाठी वापरली जाते.
६. वॉटर बर्थ किंवा पाण्यात बसल्याने प्रसूतीवेदना सहन करण्यास मदत होते. कोमट पाण्यात बसल्याने, पाठीच्या आणि प्रसूतीच्या मार्गातील स्नायू हे शिथिल होतात आणि त्याने कळा सहन करण्यास मदत होते.
७. सर्वात कमी वेदना जाणवतील यासाठी असलेले Epidural analgesia म्हणजे एक प्रकारचे वरदान आहे. पाठीच्या कण्यातून निघणाऱ्या नसा बधीर केल्या जातात आणि त्यामुळे फक्त संवेदना कमी किंवा बंद करता येतात. हे केल्याने प्रसूती कळा आणि गर्भवती स्त्रीची हालचाल आणि व्यायाम तसाच चालू राहतो.
८. विज्ञान प्रगत झाल्यामुळे ही सुखकर प्रसूती शक्य झाली आहे. प्रसूती करताना वेदना सहन होतील इतकीच तीव्रता ठेवणे या शास्त्रामध्ये शक्य झाले आहे. गप्पा मारता मारता आणि सहजतेने प्रसूती हा अनुभव घेता येतो.
८. गर्भावर आणि प्रसूतीच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम न होता हे शक्य आहे. मात्र अनेकांना नंतर कायमची पाठ दुखेल अशी शंका असते मात्र तसे काही होत नाही. प्रसूतीनंतर केलेला व्यायाम आणि योग्य आहार हे पाठदुखी कंबरदुखी होऊ नये या साठी प्रत्येक स्त्रीचा प्रयत्न असायला हवा.
९. विज्ञान प्रगत होत चालले आहे, त्याचा वापर आणि फायदा दोन्ही गर्भवती स्त्रियांना उपलब्ध करता येणे शक्य आहे.
१०. प्रसूती दरम्यान वाढणारा गर्भाशयातील दाब हा जरूरीचा आहे, पण स्त्रियांच्या शरीरावर आणि मनावर दाब येऊ नये, यासाठी असलेले पर्याय वापरण्याचाही विचार झाला पाहिजे. प्रसूतीबाबत भीती, क्लिष्ट अशी समज जी पूर्वीपासून चालत आली आहे, ती बदलून एक सुंदर प्रवास आणि अनुभव यासाठी पाऊल उचलणे ही काळाची आणि कळांची गरज आहे.
(स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि नाशिक स्त्री आरोग्य तज्ज्ञ संघटनेच्या माजी अध्यक्ष.)
khrc@hotmail.com