सकाळी उठल्यावर मळमळणं, नकोसं वाटणं हे गरोदरपणाचं सर्वसामान्य लक्षण. शरीरात होणार्या होर्मोन्सच्या उलथापालथीमुळं पोटाची सतत तक्रार असणं, पोट साफ न होणं ही तक्रार या काळात प्रचंड वाढते. अपचन, पोट डब्ब वाटण्यातून अनुभवाला येणारा परिणाम म्हणजे उलटीची भावना. या समस्या एकमेकांच्या हातात हात घालूनच येतात.
पहिली तिमाही
नेहमीचं 28 ते 35 दिवसांनी येणारं पाळीचं चक्र लांबलं की गरोदरपणाविषयी पहिल्यांदा कळतं. दहाव्या आठवड्यात मळमळायला लागलं की त्यावर शिक्कामोर्तब होतं. अनेक स्त्रियांना चौदाव्या आठवड्यापर्यंत मळमळ नि उलटीचा त्रास जाणवतो. एचसीजी नावाच्या प्रेग्नन्सी हार्मोनमुळं शरीरात प्रचंड बदल होतात. त्याचाच परिणाम म्हणजे ही मळमळ.
मॉर्निंग सिकनेसची लक्षणं सकाळच्या वेळेस होणारी मळमळ वाढत जाऊन स्त्रीला समुद्रात हेलकावे घेणार्या जहाजावर असलेल्या प्रवाशासारखं वाटायला लागतं. भिरभिरतं आणि मळमळून उलट्या व्हायला लागतात. काहीही खाल्ल्यानंतर लगेचच उलटी होणार असं वाटतं, बरेचदा ती होतेही. काही अन्नपदार्थांबद्दल नकारात्मक भावना तयार होते.
अन्य कारणं कोणती? प्रेग्नंन्सी हार्मोन्सना मेंदूचा प्रतिसाद वाढतो. पोटाचं नाजूकपण वाढतं आणि त्यातून सतत भेलकांडल्यासारखं, गरगरल्यासारखं वाटत राहातं. भावनिक ताणाचा परिणाम होऊन पोटातलं डब्बपण वाढतं. जड वाटायला लागतं. मानसिक आणि शारीरिक दमणुकीतून सकाळच्यावेळी होणारी अस्वस्थता वाढते.
काही पदार्थ ‘नकोच’ का वाटतात? काही विशिष्ट पदार्थांबद्दल काही स्त्रियांमध्ये नकारात्मक भावना तयार होते. त्यामुळं त्या पदार्थाचा वासही आला तरी उलट्या सुरू होतात. गंमत म्हणजे काही पदार्थ गरोदरपणापूर्वी खूप प्रिय असतात, पण या काळात सगळं काही बदलतं. सतत मळमळ आणि उलट्यांमुळं अनेक स्त्रियांना पहिल्या तिमाहीत खूप अशक्तपणा जाणवतो. अन्नावरची वासना जाते.
मॉर्निंग सिकनेस कसा हाताळावा? - रात्रीची गाढ झोप पूर्ण झाल्यानंतर सकाळी जास्त वेळ पोट रिकामं न ठेवता ताबडतोब खाऊन घ्यावं. कधीकधी खूप अवकाशानंतर पोट फार काळ रिकामं राहाण्यातून मळमळ सुरू होते. मात्र रात्री लवकर झोपणं आणि झोपण्याआधी रात्रीचं जेवण सकस होणं महत्त्वाचं आहे. - दिवसभरातून सहा वेळा थोडं थोडं खावं, त्यामुळे पोट रिकामं राहाण्यातून येणारी अस्वस्थता टळतेच आणि जडत्वही जाणवत नाही. - पाणी, सरबतं, ताक अशी पेयं सातत्यानं पित राहावीत. - ताणतणाव टाळावेत. - शरीराला पोषक असे अन्नघटक जाणीवपूर्वक खावेत. गरोदर असाल तर मॉर्निंग सिकनेसपासून सुटका होणं कठीणच, पण ही स्थिती नियंत्रणात राखता येणं शक्य असतं. मात्र काळजी घेऊनही त्रास वाढला तर योग्य डॉक्टरांशी बोलावं हे चांगलं! ---