‘वाऱ्याची एक झुळूक आली आणि मी प्रेगनन्ट झाले. पुढच्या एका तासात मला बाळही झालं.’ २५ वर्षाच्या सिटी झानियाह या इंडोनेशियातील महिलेनं तेथील पत्रकारांना हे काही दिवसांपूर्वी सांगितलं तेव्हा किती गहजब झाला होता. इंडोनेशियातले पोलिसही या घटनेनं बुचकळ्यात पडले, त्यांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली. आणि आता नुकतीच समोर आलेली नागपूरमधली घटना. लग्नानंतर १७ वर्षांनी झाले मूल, पण आपण गरोदर आहोत हे त्या महिलेच्या नऊ महिने लक्षातही आलं नाही. मात्र गेल्या महिन्यात या ४७ वर्षाच्या महिलेने एका गोड मुलीला जन्म दिला. मात्र आपल्याला दिवस गेलेत, हे त्या महिलेला कळलंंही नाही. ओटीपोटात दुखतं आहे असं सांगून दवाखान्यात ती दाखल झाली आणि डॉक्टरांनी सोनीग्राफी केल्यावर कळलं की ९ महिने भरत आलेले आहेत. त्यानंतर यशस्वी प्रसूती झाली आणि तीन किलोचे बाळही जन्माला आले. आता या अशा घटना वाचून कुणालाही प्रश्न पडेल की हे कसं शक्य आहे? आपण गरोदर आहोत हेच महिलेला कळत नाही, काही त्रासच होत नाही हे कसं शक्य आहे? पण अशा घटनात घडतात. आजवर जगात घडलेल्या आहेत. त्याला म्हणतात क्रिप्टिक प्रेगनन्सी.
(Image : Google)
अलिकडेच इंडोनेशियातील पश्चिम जावातील सिआंजूर या शहरात राहणाऱ्या सिटीने सांगितले की, ती त्या दिवशी तिच्या बैठकीच्या खोलीत आराम करत होती. तितक्यात एक वाऱ्याची झुळूक आली. १५ मीनिटानंतर पोटात वेदना होऊ लागल्या. पोट मोठं होऊ लागलं. ती घाबरली आणि जवळच असलेल्या सामुहिक आरोग्य केंद्रात गेली. तिथे तिला बाळ झालं. तिच्या या विचित्र बाळांतपणाची गोष्ट क्षणात शहरभर पसरली. सोशल मीडियामुळे ही बातमी जगभर झाली. सामुहिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिटीची तपासणी केली असता सिटी आणि तिचं बाळ दोघेही सुखरुप असल्याचं, सिटीची सामान्य प्रसूती झाल्याचं आणि बाळही चांगल्या वजनाचं असलेलं आढळलं. या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराचं वर्णन ‘क्रिप्टिक प्रेगनन्सी’ अर्थात गुप्त गर्भधारणा असं केलं आहे. या प्रकारच्या गर्भधारणोत जोर्पयत प्रसूती वेदना होत नाही तोर्पयत महिलेला कळतंच नाही असं या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. इंग्लडमधेही अशी एक घटना घडली होती. वेस्ट ससेक्स येथील एका महिलेचीही अचानक प्रसूती झाली होती. ३२ वर्षाची ग्रेस मीचिम या महिलेला आधीची दोन मुलं होती. पण तिसऱ्या गर्भधारणोचा तिला पत्ताच लागला नाही. २७ आठवडे उलटून गेले तरीही नाही. शिवाय पोटही दिसत नव्हतं. तिने सांगितलेल्या माहितीनुसार ती गर्भनिरोधक गोळ्या नियमित घेत होती. तिला पाळीही नियमित येत होती आणि तरीही ती अचानक एका सकाळी प्रसूत झाली. प्रसूतीच्या काही महिने आधी तिला पोटात काहीतरी ढेकळासारखं जाणवलं. तिला संशय आला म्हणून तिने गर्भधारणोची घरच्याघरी चाचणी केली पण ती नकारात्मक निघाली. ती पाच महिन्यांची गरोदर असेल तेव्हा ती डॉक्टरांकडेही गेली होती. तेव्हाही तिची चाचणी केली गेली पण तीही नकारात्मक आली. काही काळानं डॉक्टरांनी तिला तिच्या गर्भाशयात गाठ असल्याचं सांगितलं. पुढील महिन्यात तिची अल्ट्रासाउंड तपासणी करावी लागेल असं म्हटलं. पण ती तपासणी करण्याआधीच ती प्रसूत झाली. या अशा प्रकारच्या घटना सामान्यांसाठी चमत्कारिक असल्या तरी वैद्यकीय क्षेत्रतल्यांना मात्र त्याचं अप्रूप नाही. या अशा घटना होतात / होऊ शकतात असंच ते म्हणतात.
(Image : Google)
पण का होत असेल असं? सांगतात, स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. गीता वडनप
एखाद्या महिलेला आपण प्रेग्नंट आहोत हे बाळंतकळा सुरू होऊन बाळ जन्माला येईपर्यंत लक्षात न येणे हे खरोखर शक्य आहे. हे असं घडलेलं मीही पाहिलेलं आहे. अर्थात यामागे चमत्कार नसून शास्त्रीय कारणं आहेत. एका संशोधनाच्या आधारे हे सांगितलं गेलं आहे, की ४०० गरोदर बायकांमधील एका बाईला गरोदरपणातील जवळजवळ पाच महिने संपले असतानाही आपली गरोदरावस्था लक्षात आलेली नाही. तर २५०० गरोदर बायकांमधील एखादी केस , प्रसूतीकळा येऊन बाळाचा जन्म होईपर्यंत लक्षात न आलेली प्रेग्नन्सी असू शकते.
गर्भधारणेदरम्यान होणारे अनेक बदल लक्षात का येत नसावेत?
१. काही स्त्रियांमधे आई होण्याची मनाची तयारी नसेल तर ती स्त्री तीव्र नकाराच्या भावनेतून शरीरामधे घडणाऱ्या बदलांचा संबंध इतर गोष्टींशी जोडून सत्य स्वीकारण्यास नकार देते. २. जसं की माझ्यात अशक्तपणा असल्यानं माझी मासिकपाळी नियमित नाही. पित्त झालंय म्हणून उलट्या होत आहेत. अपचन झालंय , पोटात गॅसेस झालेत म्हणून पोटाचा घेर वाढलाय आणि गॅसेमुळे पोटात हालचाल जाणवते असं वाटतं. ३. काही केसेसमधे गरोदरकाळातील लक्षणं ( मळमळ , उलटी , थकवा , लघवीला वारंवार जावं लागणं ) अजिबात दिसून येत नाहीत. ४. काही जात्याच स्थूल बांधणीच्या स्त्रियांमधे वजन वाढलेलं पटकन निदर्शनास येत नाही. ५. ताणतणाव , गर्भनिरोधक औषधांचं सेवन , स्थुलता , अनियत्रित मधुमेह , पीसीओएस , चुकीची आहारशैली अशा अनेक कारणांनी मासिकपाळी अनिय्मित राहून गरोदरावस्था लक्षात येत नाही.
(Image : Google)
६. सामान्य गरोदरपणात २० टक्के केसेसमधे गर्भ-रोपण प्रक्रियेदरम्यान योनीमार्गातून थोड्याप्रमाणात रक्तस्त्राव दिसून येतो आणि अशा केसमधे महिलेला आपली मासिकपाळी सुरू आहे असं वाटून गरोदरावस्था लक्षात येत नाही. ७. किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक संबंध आल्यानंतर घरच्यांना कळू नये या साठी मासिकपाळी चुकलीय हे सत्य लपवून नियमित पाळी येतेय असं दर्शविलं जातं. विवाहबाह्य संबंधांमधे सुध्दा प्रेग्नन्सी लपवली जाते. हे तरुण मुलींच्या संदर्भात शक्य आहे. ८. चाळिशीच्या पुढील स्त्रियांमधे मासिकपाळी अनियमित असताना असुरक्षित शारीरिक संबंधामधून राहिलेली प्रेग्नन्सी दीर्घकाळापर्यंत दूर्लक्षित राहाते. ९. बाळाच्या १८ ते २० आठवड्यांच्या वाढीनंतर आईला बाळाच्या हालचाली जाणवतात . पण प्लासेंटा जर गर्भाशयाच्या समोरील बाजूस असेल तर गर्भवतीला या हालचाली अतिशय मंद जाणवतात अथवा अजिबात जाणवत नाहीत. १०. काही मानसिक आजारांमधे उदा. बायपोलर डिसऑर्डर , सिझोफ्रेनिया यात गरोदरावस्था कळून येत नाही, अशाही घटना आहेत.