Lokmat Sakhi >Health >Pregnancy > आईचं दूध बाळाला कमी पडत असेल तर काय करायचं? बाळाला स्तनपान नेमकं कधी थांबवायचं?

आईचं दूध बाळाला कमी पडत असेल तर काय करायचं? बाळाला स्तनपान नेमकं कधी थांबवायचं?

World Breast Feeding Week : १.बाळाला दूध पुरतंय हे कसं समजायचं? २.दूध जास्ती येतं तेव्हा काय करायचं? ३.दूध कमी येतं तेव्हा येणं वाढवण्यासाठी काय करायचं? ४.दूध पाजायचं कधी थांबवायचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 07:17 PM2023-08-07T19:17:19+5:302023-08-07T19:30:37+5:30

World Breast Feeding Week : १.बाळाला दूध पुरतंय हे कसं समजायचं? २.दूध जास्ती येतं तेव्हा काय करायचं? ३.दूध कमी येतं तेव्हा येणं वाढवण्यासाठी काय करायचं? ४.दूध पाजायचं कधी थांबवायचं?

World breast feeding week: 5 important questions about breast feeding,myths and facts | आईचं दूध बाळाला कमी पडत असेल तर काय करायचं? बाळाला स्तनपान नेमकं कधी थांबवायचं?

आईचं दूध बाळाला कमी पडत असेल तर काय करायचं? बाळाला स्तनपान नेमकं कधी थांबवायचं?

डॉ. ज्योत्स्ना पडळकर (बालरोग तज्ज्ञ पुणे, jyotsnapadalkar@gmail.com)

पूर्ण दिवस भरलेलं चांगल्या वजनाचं नॉर्मल बाळ दहा पंधरा मिनिटांत आपलं पिणं संपवतं. काही बाळांना याहूनही कमी वेळ लागतो. पण सुरुवातीच्या काही दिवसांत बाळ वजनानं कमी असलं किंवा अशक्त असलं तर त्याच्या पिण्यात फरक असतो. असं बाळ थांबून थांबून, मध्ये मध्ये विश्रांती घेत पितं. मग हा कार्यक्रम अर्धा तास पर्यंत सुद्धा चालतो. हळूहळू पण भरपूर दूध पिऊन त्याचं वजन वाढतं. मात्र पालकांना काही प्रश्न हमखास पडतात.

स्तनपानात येणारे नेहमीचे ४ प्रश्न

१.बाळाला दूध पुरतंय हे कसं समजायचं?

२.दूध जास्ती येतं तेव्हा काय करायचं?

३.दूध कमी येतं तेव्हा येणं वाढवण्यासाठी काय करायचं?

४.दूध पाजायचं कधी थांबवायचं?

१. चोखण्याची शक्ती वाढते तेव्हा तेही बाळ लवकरच पाच ते दहा मिनिटांत आपलं पिणं संपवू लागतं. मात्र ज्या बाळाचं वजन अपेक्षेप्रमाणं वाढत नाहीये त्या बाळाला असा वेळ लागतो याचा अर्थ आईला दूध कमी पडतंय. बाळाच्या अंगावरच्या पिण्याला वरच्या दुधाची जोड देऊन त्याचं वजन लवकर वाढण्यासाठी मदत करावी लागते. सगळीच मुलं दूध मिळालं नाही तर रडणारी नसतात. म्हणून खूप वेळ पिणाऱ्या बाळाचं वजन करून आईला दूध पुरेसं येतंय ना याची खात्री करावी. असं दूध कमी पडणाऱ्या बाळांना शी आणि शू कमी होते.

२. पहिल्या तीन महिन्यांत बाळाचं वजन झपाट्यानं‌ म्हणजे रोज जन्म वजनाच्या एक टक्का याप्रमाणे वाढत असतं. ते बरोबर वाढतंय ना ते दर आठवड्याला वजन करूनच खात्री करावी.  आईचं दूध कमी पडत असलं तरी आधी आईच्या अंगावर प्यायला देऊन मगच वरचं दूध देत राहावं. अशामुळं आईचं दूध वाढायला मदत होते.

३. एक भूक भागेल एवढं पुरेसं येत नसलं तर आई एका आड एकदा अंगावर आणि मग पुढच्या वेळेस वरचं दूध देऊन बाळाची भूक भागवते. हे बरोबर नाही. दर दोन तासांनी आईच्या अंगावर बाळानी चोखून दूध प्यायल्यामुळं आईचं दूध वाढतं. दोन पाजण्यामधलं अंतर जितकं वाढत जाईल तितकं दूध येण्याचं प्रमाण कमी होत जातं. म्हणून आधी आईचं आणि मग तयारच ठेवलेलं लागेल तेवढं वरचं असं प्रत्येक वेळेला करावं.

दूध वाढण्यासाठी काय करावं?

१. बाळ सारखं रडत राहतं, अंगावरचं दूध पिऊनही त्याचं समाधान होत नाही.  त्याचं पाहिजे तसं वजन वाढत नाही. शी आणि शूचं प्रमाण कमी असतं आणि मुख्य म्हणजे वरचं दूध देऊ केलं तर ते आधाशासारखं पितं आणि प्याल्यावरच शांत होतं. असं जेव्हा होतं तेव्हा अंगावरचं दूध कमी पडतंय असं अनुमान काढायला हरकत नाही. अशा वेळेला जोड म्हणून वरचं दूध द्यायला हवं पण लगेच आईनं हताश होऊ नये.

२. आईनं भरपूर जेवावं,भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ घ्यावेत. मन शांत ठेवावं. काही आजार असेल तर तो आटोक्यात ठेवायला किंवा बरा करायला औषधं घ्यावीत अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्यानं.

३. दूध वाढवण्यासाठी आयुर्वेदात आणि मॉडर्न मेडिसिनमध्ये औषधं आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्यानं अवश्य घ्यावीत.

४. काही आहारातील पदार्थ सर्वांनाच माहिती असतात डिंक, हळीव, मेथी इ. जरूर घ्यावेत.

५. सर्वात चांगला आणि सोपा उपाय म्हणजे अशा सोडून न देता बाळाला दोन दोन तासांनी थोडा वेळ तरी पाजायला घेत राहावं त्याचा नक्की उपयोग होतो.

जास्ती येणाऱ्या दुधाचं काय करायचं?  

१. सुरुवातीच्या काही दिवसांत मागणी आणि पुरवठा यांचा मेळ बसत नाही. कुणाला कमी तर कोणाला जास्त दूध येतं दूध कमी आणि जास्त त्रासाचं आणि गैरसोयीचं तसंच दूध जास्त येणं पण. मात्र दूध जास्त येतं तेव्हा त्याचा त्रास आईलाच होतो.

२. बाळाचं एकाच बाजूला पिऊन भागतं दुसरीकडचं दूध शिल्लक राहतं. कधी कधी ते गळतं आणि पिळून काढलं नाही तर तिथंच शिल्लक राहतं. याच्या गाठी होतात आणि पिळून काढताना स्तन जास्त जोरात हाताळले आणि दुखावले तर त्यांना इजा होते. हातावरचे आणि स्तनावरचे जंतू या दुधावर वाढू लागतात आणि गळू तयार होतं. जंतूंच्या वाढीसाठी दूध हे अतिशय उत्तम माध्यम असल्यामुळे या गाठींमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव लगेच होतो.

३. स्तनात गळू होऊ नये यासाठी वेदनाशामक औषध घेणं, बाळाला वारंवार पाजत राहणं, जास्तीचं दूध काढून साठवणं हे प्राथमिक उपचार झाले पण तरीही बरं वाटत नसेल तर डॉक्टरांना लवकर दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा हे बरं.

४. जेव्हा आईला थंडी वाजून ताप येतो, स्तनात फार दुखतं, काखेत गाठी येतात,अशा वेळेला तिला स्तनात गळू तर होत नाहीये ना यावर लक्ष ठेवावं. स्तनातलं दूध काढत राहिलं तर जास्ती येण्याची शक्यता असते म्हणून दोन्हीकडे थोडं थोडं दूध शिल्लक ठेवलं तर पुढच्या वेळेला येणं थोडं थोडं कमी होत जाऊन हवं तेवढं येत राहतं. म्हणून दोन्हीचा सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे साठलेल्या दुधाच्या गाठीही होणार नाहीत आणि दूध फार जास्तही येणार नाही.
आणि लवकरच बाळाला हवं तेवढं दूध यायला लागतं.

बाळाला किती दिवस पाजावं आणि स्तनपान कधी थांबवावं?

१. स्तनपानाचा आग्रह करताना ते कधी थांबवावं याबद्दल कोणी नीट ठामपणे सांगत नाही.   परदेशी पुस्तकांतून या विषयी लिहिण्याचं फारसं कारण पडत नाही कारण क्वचितच कुणाला 'बाई गं, आता थांब'! असा सल्ला देण्याची वेळ येते. पण आपल्या देशात स्तनपान करण्याची मर्यादा अशी संकल्पना नाहीये.

२. प्रत्येकीची बाळाला अंगावर पाजण्याच्या काळाची कल्पना वेगवेगळी असते. पूर्वी शेवटचं मूल आईच्या अंगावर दीर्घकाळ पीत असलेलं म्हणूनच लाडावून डोक्यावर बसलेलंही मागच्या पिढीनं पाहिलंय.

३. स्तनपानाचा सर्वाधिक फायदा पहिल्या शंभर दिवसात असतो. त्यानंतरही भरपूर येत असेल तर आईनं बाळाला अवश्य पाजावं. मात्र पाजणं हे त्याच्या करमणुकीसाठी, रडतोय म्हणून, झोपवण्यासाठी किंवा आपण नोकरीवर जातो तेव्हा पाजत नाही तर उरलेल्या वेळी तरी पाजलं पाहिजे म्हणून चोखायला देणार असेल तर यातून स्तनपानाचा आईच्या दुधाचा फायदा तर मिळत नाहीच पण मुलाला अंगावर पिण्याचं व्यसन लागतं आणि खरोखरीच ते सुटायला अवघड जातं. मग मूल दुसऱ्या कुणाकडून झोपत नाही, आईला सोडत नाही, कधी कधी आईला दूध येत नाही तेव्हा चिडून चावतो सुद्धा !

४. त्याला वेळीच वरच्या घन आहाराची ओळख झाली नसेल तर आता अंगावरचं मिळत नाही आणि वरचं आवडत नाही अशी अवस्था होते. मुलाचं वजन वाढणं थांबतं, ते किरकिर  करतं, त्याची आजारपणं वाढतात आणि ते हट्टी पण होतं.

५. हे टाळायचं असेल तर आईनी दूध येत असेल तर आपले स्तन मोकळे करण्यासाठी, त्याची भूक भागवण्यासाठी त्याला आपल्या अंदाजानुसार एक, दोन,तीन जशी गरज असेल त्याप्रमाणे पाजावं. जेव्हा आईला समजतं की आता दूध येत नाहीये तेव्हा तिनं थांबावं.

रात्री झोपेत चाळवतो म्हणून आणि परत झोप लागावी म्हणून बाळाला चोखत ठेवण्यामुळं थोडं दूध त्याच्या तोंडात शिल्लक राहतं. त्यावर जंतू वाढतात त्यामुळे बाळाचे दात किडतात. हे नक्कीच टाळायला हवं.

Web Title: World breast feeding week: 5 important questions about breast feeding,myths and facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.