डॉ. प्रिया प्रभू
रोगप्रतिबंधक आणि साथरोग तज्ज्ञ
"आईच्या दुधाचे कर्ज" मानणाऱ्या भारतासारख्या देशातही स्तनपानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न करावे लागणे हे खरेतर दुर्दैवी आहे. स्तनपान महत्त्वाचे आहे, अत्यावश्यक आहे याबाबत कोणाचेही दुमत नसते. मात्र, बाळाला स्तनपान देताना प्रत्येक मातेला विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. त्या अडचणी सोडवण्यासाठी वेळेवर आणि योग्य साहाय्य मिळाले तर स्तनपानाचा प्रवास सोपा होतो. मात्र, बरेच गैरसमज आजही ती वाट अडवतात आणि स्तनपानात अडचणी येतात.
त्यामुळे स्तनपान सुरू ठेवण्यासाठी व आईच्या अडचणी सोडवण्यासाठी कुटुंबीय आणि समाज म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
स्तनपानाविषयी कोणते गैरसमज आहेत?
१. स्तनपान नैसर्गिक आहे. ते आपोआप जमते.
स्तनपान ही श्वासोच्छ्वासासारखी सहज व आपोआप जमणारी गोष्ट आहे असे सर्वांना वाटतं. मात्र, तसं नसतं. स्तनपान काही मातांना सहज जमतं, तर काहींना मदतीची गरज असते. आपल्याला सहज जमणारी गोष्ट जमत नाही म्हणून काही मातांना कमीपणा वाटतो.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब आणि अनेक मुले असण्याच्या काळात आईने तिच्या लहानपणापासून अनेकींना स्तनपान देताना प्रत्यक्ष बघितलेले असायचे. आज-काल असे घडत नाही. गरज भासल्यास स्तनपान तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य.
२. बाळाच्या जन्मानंतर पहिले काही दिवस स्तनांमध्ये दूध नसतं?
माणूस हा निसर्गातील इतर प्राण्यांपेक्षा वेगळा नाही. इतर प्राण्यांची पिल्लं जन्मतः आईच्या स्तनाला लुचू लागतात. तसंच आईच्या स्तनांमध्येही बाळासाठी चिक दूध उपलब्ध असतं. गरोदरपणाच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्येच या दुधाची निर्मिती सुरू होते. त्यामुळे बाळाचा जन्म अपुऱ्या दिवसांचा झाला तरीदेखील स्तनामध्ये चिक दूध असतं. बाळाच्या जठराचा आकार बाळाच्या मुठीएवढाच असतो व त्यामध्ये एका वेळेला एक-दोन चमचाहून अधिक दूध पिण्यासाठी जागा नसते. चिक दूध थोडे असले तरी घट्ट व भरपूर ऊर्जायुक्त असते. त्यामुळे बाळाला ते पुरते. तसेच त्यामधून बाळाला जंतूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यातील प्रतिपिंडामुळे प्राथमिक रोगप्रतिकारक शक्तीदेखील मिळते. "नवजात बाळाला दर दोन तासाने स्तनपान देणे" या एका कृतीमुळे पिवळे चिक दूध हे नियमित पांढऱ्या दुधात बदलते.
३. आईच्या दुधापेक्षा फॉर्म्युला दूध किंवा गायीचे दूध अधिक चांगले असते?
सुरुवातीचे दूध बाळाची तहान भागवण्यासाठी पातळसर आणि नंतरचे दूध हे बाळाची भूक भागवण्यासाठी दाटसर असते याची कल्पना नसल्याने आईचे दूध पातळच आहे असा गैरसमज होऊ शकतो आणि मग बाळाला फॉर्म्युला दूध किंवा गायीचे दूध काहीजण देतात.
मात्र आईचे दूध हे बाळाच्या बदलत्या गरजांनुसार बदलणारे, बाळाच्या सर्व गरजा पूर्ण करणारे असते. त्याची जागा इतर कोणतेही दूध पूर्णतः घेऊ शकत नाही.
मानवी मेंदू व्यवस्थित विकसित व्हावा यासाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटक हे केवळ आईच्या दुधामध्येच असतात. ते इतर कोणत्याही मार्गाने आपण देऊ शकत नाही. बाळाला जास्त वेळा दूध पाजले आणि स्तन वारंवार रिकामे केले की आईच्या दुधाचे प्रमाण वाढवता येते. मागणी वाढली की पुरवठा वाढणारच !
४. मालीश करणाऱ्या आजी किंवा बाळं सांभाळणाऱ्या मदतनीसला सगळं माहिती असतं?
मालीश करणाऱ्या आजीला बाळाच्या मालिशचा अनुभव नक्कीच असतो, पण स्तनपान संबंधित योग्य ज्ञान असेलच असं नाही.
एखाद्या आईचे निपल सपाट किंवा आत वळलेले असतील तर अशावेळी तिला स्तनपान देताना अडचण येऊ शकते. मालीशवाल्या आजीने स्तन जोरजोरात पिळून त्यातील दूध काढण्याचा प्रयत्न करणं योग्य नसतं. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
स्तनपानाचा पहिला नियम आहे की इतरांसोबत तुलना करायची नाही आणि स्वतःच्या दुधावर शंका घ्यायची नाही.
५. बाळाला दात आले की स्तनपान बंद करायला हवं?
सहाव्या महिन्यांनंतर बाळाला दात यायला सुरुवात होऊ लागते आणि नऊ महिन्यांनंतर सर्वसाधारणपणे बाळांना दोन ते चार दात तरी नक्की आलेले असतात. मात्र, दात येऊ लागले म्हणजे आईचे दूध बंद करायला हवं असं नाही. या दातांचे नावच दुधाचे दात आहे. जोपर्यंत हे दात असतात, तोपर्यंत आईची इच्छा असेल तर आई स्तनपान सुरू ठेवू शकते. अजूनही काही ग्रामीण भागांमध्ये बाळाला दोन वर्षांहून अधिक काळ स्तनपान केलं जातं. तेच योग्य आहे. कमीत कमी दोन वर्षे बाळाला स्तनपान मिळणे आवश्यक आहे. वाढत्या बाळाने सर्वांसमोर दुधासाठी हट्ट केला तरी याविषयी लाज वाटण्यासारखे काहीही नाही. उलट अभिमान वाटायला हवा की आपण बाळाच्या शारीरिक व बौद्धिक वाढीसाठी योग्य ते प्रयत्न करत आहोत.
६. आईचे दूध बंद केल्याखेरीज बाळ वरचे अन्न खाणार नाही?
स्तनपान हे वेळखाऊ आणि थकविणारे काम आहे. त्यामुळे सर्वांचे असे प्रयत्न असतात की लवकरात लवकर बाळाने वरचे अन्न खावे म्हणजे स्तनपान बंद करून आई इतर कामांची जबाबदारी घेण्यास मोकळी होईल. पण जर बाळाचा मेंदू पहिल्या दोन वर्षांमध्ये त्याच्या एकूण क्षमतेच्या ७५ टक्के एवढ्या प्रमाणात वाढतो, तर त्यासाठी आईचं दूध बाळाला मिळत राहणं हे आवश्यक असतं. तसेच वाढत्या वयातील आजारपणांमध्ये जेव्हा मुलं खाणं बंद करतात, तेव्हाही आईचं दूधच बाळाला पोषण देऊ शकतं. घाईगडबड न करता बाळाला व्यवस्थित संधी दिली तर हळूहळू बाळ आईच्या दुधासोबतच वरचं अन्नदेखील आवडीने खाऊ शकतं. बाळाच्या हक्काचं पोषण अवेळी बंद केल्यास बाळ कुपोषित होण्याचा धोका वाढतो.
७. आईला कामावर रुजू व्हायचे असेल तर स्तनपान सुरू ठेवता येणार नाही?
कायद्यानुसार बाळाच्या जन्मानंतर आईला सहा महिने बालसंगोपन रजा मिळते, ज्या काळामध्ये बाळाला निव्वळ आईचे दूध देणं आवश्यक असतं. त्यानंतर बाळाला हळूहळू वरचे अन्न सुरू करायचं. कामाच्या ठिकाणीदेखील यासाठी सोय उपलब्ध करून देणे कायद्यानं आवश्यक आहे.
drprdeshpande2@gmail.com