रंजिता शर्मा चौबे, (आहारतज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक)
स्तनपान हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आई आणि बाळ दोन्हींसाठी स्तनपानाचे महत्त्व मोठे आहे. स्तनपान काळात आईच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी पोषक आहाराची गरज असते. स्तनपान दरम्यान संतुलित आहाराचे महत्त्व फार मोठे आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे.
आहार योग्य असेल तर..
१. दुधाचा पुरेसा पुरवठा: योग्य आहारामुळे बाळासाठी पुरेसे दूध उत्पादन होण्यास मदत होते. आईच्या आहारात पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास दुधाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
२. .दुधातील पोषक तत्त्वांची गुणवत्ता: आईच्या आहाराचा दुधातील पोषक तत्त्वांवर थेट परिणाम होतो, ज्यामुळे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
३. आईचे आरोग्य: योग्य पोषणामुळे आईला प्रसूतीनंतर लवकर सावरण्यास मदत होते आणि तिचे आरोग्य चांगले राहते. आहारात योग्य प्रमाणात पोषक तत्त्वे नसल्यास आईच्या शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.
स्तनपानासाठी सुपरफूड्स कोणते?
१.डिंकात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात, जे आईच्या शरीराला ताकद देतात आणि दुधाचे उत्पादन वाढवतात. डिंकाचा लाडू हा गोंद खाण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
२. हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे एस-सी-के यांचा समावेश असतो. या पोषक तत्त्वांनी भरपूर आहारामुळे दुधाचे उत्पादन चांगले होते आणि बाळाला आवश्यक पोषण मिळते. पालक, मेथी, शेवगा यांसारख्या भाज्या आहारात समाविष्ट कराव्यात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे आईच्या आणि बाळाच्या दोघांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लोहामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. कॅल्शियम हाडांना मजबूती देते. जीवनसत्त्वे बाळाच्या संपूर्ण विकासासाठी आवश्यक असतात.
३. मेथीमध्ये फायटोएस्ट्रोजेन्स असतात, जे दुधाचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. मेथीचे लाडू किंवा मेथी पाणी हे प्रभावी उपाय आहेत.
४. तूपात आवश्यक फॅटी ॲसिड्स असतात, जे आईच्या दुधातून बाळाला मिळतात आणि त्याच्या मेंदूच्या विकासाला मदत करतात. तुपाचे नियमित सेवन आईच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
५. विविध धान्ये, शेंगदाणे, सुकामेवा इत्यादींच्या मिश्रणाचा आहारात समावेश केल्याने पोषक तत्त्वांची विविधता मिळते आणि दुधाचे उत्पादन वाढते. खजूर, बदाम, अक्रोड यांचा आहारात समावेश करावा.
स्तनपानाचे फायदे
स्तनपान केल्याने केवळ बाळालाच नव्हे तर आईलाही अनेक फायदे होतात. हे फायदे शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वरूपाचे असतात.
१. स्तनपान केल्याने आईच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी खर्च होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
२. स्तनपान केल्यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन स्रवतो, ज्यामुळे गर्भाशय लवकर संकुचित होऊन मूळ आकारात येण्यास मदत होते.
३. प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव लवकर थांबण्यास स्तनपान मदत करते.
४. नियमित स्तनपान केल्याने आईला स्तनाचा आणि अंडाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
५. स्तनपानामुळे आईच्या हाडांची घनता सुधारते आणि भविष्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
६. स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये भावनिक नाते निर्माण होते, ज्यामुळे दोघांचेही मानसिक आरोग्य चांगले राहते.
७. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्त्वे असतात.
८. प्रतिजैविके बाळाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे संसर्ग आणि आजार होण्याची शक्यता कमी होते.
९. आईचे दूध बाळाच्या पचनासाठी सोपे असते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा इतर पचनसंस्थेच्या तक्रारी कमी होतात.
१०. आवश्यक फॅटी ॲसिड्स बाळाच्या मेंदूच्या विकासाला मदत करतात, ज्यामुळे बौद्धिक विकास होतो.
११. बाळाचे भावनिक आरोग्य चांगले राहते.