Lokmat Sakhi >Health >Pregnancy > world breastfeeding week 2024 : आईने तान्ह्या बाळाला ६ महिने पोटभर दूध पाजणे इतके अवघड का होते आहे?

world breastfeeding week 2024 : आईने तान्ह्या बाळाला ६ महिने पोटभर दूध पाजणे इतके अवघड का होते आहे?

world breastfeeding week 2024: भारतात ६ महिने स्तनपानाचे प्रमाणा फक्त ५५%, इतके कमी स्तनपानाचे कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 04:57 PM2024-08-02T16:57:58+5:302024-08-02T17:02:57+5:30

world breastfeeding week 2024: भारतात ६ महिने स्तनपानाचे प्रमाणा फक्त ५५%, इतके कमी स्तनपानाचे कारण काय?

world breastfeeding week 2024 : six month exclusive breastfeeding only 55% in India, why so? what are the problems? | world breastfeeding week 2024 : आईने तान्ह्या बाळाला ६ महिने पोटभर दूध पाजणे इतके अवघड का होते आहे?

world breastfeeding week 2024 : आईने तान्ह्या बाळाला ६ महिने पोटभर दूध पाजणे इतके अवघड का होते आहे?

Highlightsस्तनपान करताना येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर स्तनपान सल्लागारांची मदत घ्यावी.

ओजस सु. वि. (आंतरराष्ट्रीय बोर्ड प्रमाणित स्तनपान सल्लागार (IBCLC))


काही सरळ साध्या सोप्या गोष्टी आपण उगाचच अवघड करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे जे आपसूकच साध्य व्हायला पाहिजे ते अप्राप्य ध्येय होऊन बसतं! आता ‘आईने तान्ह्या बाळाला योग्यवेळी, पोटभर, बाळ पुरेसे मोठे होईपर्यंत दूध पाजणे’ - किती सहज, नैसर्गिक गोष्ट आहे. सगळ्या सस्तन प्राण्याच्या मादीला आपसूकच ही गोष्ट माहिती असते - माणूस वगळता!

भारतीय संस्कृती तर ‘मातृत्व‘ या संकल्पनेला फार महत्त्व देणारी आहे. स्तनपान हा आई आणि बाळाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. बाळाचं आरोग्य ठणठणीत राहील, वाढ चोख होईल याची खात्री देणारी नैसर्गिक प्रक्रिया! आपल्या देशात तर स्तनपानाची आकडेवारी उत्तमच असायला पाहिजे.
स्तनपान समस्या हे 'वेस्टर्न फॅड' आहे असा आपला समज असेल तर, भारताची आकडेवारी पाहू..
२०२१  च्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, भारतात - जन्मल्यानंतर पहिल्या तासात (गोल्डन अवर मध्ये) बाळाला स्तनपान देण्याचं प्रमाण केवळ ४१.६% आहे. सहा महिने केवळ आईचे दूधच बाळाला द्यावे (exclusive breastfeeding) असे परिमाण असताना त्याचे प्रमाण केवळ ५५% आहे. म्हणजे केवळ ५५% बाळंच सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध पितात. बाकी ४५% बाळांना आईच्या दुधासोबत किंवा दूधाखेरीज अन्य काहीतरी दिले जाते. परिणामतः. ३८% बाळांची वाढ खुंटली (stunting) आहे. भारतात इन्फण्ट फॉर्मुलाचे मार्केट प्रतिसाल ५.७ अब्ज अमेरिकन डॉलरचे आहे! WHO नुसार सहा महिने केवळ स्तनपानच देशातील प्रमाण किमान ७०% असायला हवं. म्हणजे आपल्याला अजुन किती मजल गाठायची आहे!

इतकी सहज सोपी गोष्ट साध्य का होत नाही?

 नक्की कुठे आपण कमी पडतोय? आता इथे ' आपण ' का म्हणलं? स्तनपान तर आई आणि बाळाचा प्रश्न आहे ना? इथेच तर गडबड होतीय! स्तनपान हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे. कसाकाय, तर बाळांच शारीरिक आरोग्य चांगलं राहावं, आईचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं त्यातूनच पुढचा सुदृढ, निरोगी, मानसिक दृष्ट्या शांतीपूर्ण समाज निर्माण होत राहणार - यासाठी सुयोग्य स्तनपानाला पर्याय नाही. पण स्तनपान करताना आईचं स्वतःचं शारीरिक, मानसिक आरोग्य बिघडलेलं असेल; तिच्यावर गृहकलहांपासून ते लवकरात लवकर करीअरमध्ये परतण्याचे कित्येक सारे ताण असतील; घरात - घराबाहेर स्तनपान करण्याची मोकळीक नसेल - अनेक निर्बंध असतील तर स्तनपान करण्यात खूप साऱ्या अडचणी येतात. त्यांना कंटाळून, अवघडून, कधी चुकीचे सल्ले मिळाले म्हणून या नवमाता दूध पाजणे लवकर सोडून देतात. स्तनपानाऐवजी फॉर्म्युला किंवा पावडरचे दूध द्यायला सुरुवात करतात. बाळाची पचनशक्ती तयार व्हायच्या आधी वरचा आहार द्यायला लागतात. त्याचा बाळांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
केवळ फॉर्म्युलाचे दूध पिणाऱ्या बाळासाठी महिन्याभरात पाच हजार ते वीसेक हजार रुपये खर्च होतात. गरज नसताना दिल्या जाणाऱ्या फॉर्म्युला किंवा पावडरच्या दुधाचे असंख्य दुष्परिणाम मुलांमध्ये दिसतात. आईचं खास बाळासाठी बनत असलेलं ‘टेलरमेड’ दूध तर चक्क फुकट असतं!


 
स्तनपान सुरळीत होण्यात गडबड कुठे होते?

१. आईचं दूध बाळाला पुरेल का याविषयी अविश्वास! हा घरच्यांकडून जास्त दर्शवला जातो. आईचाही आत्मविश्वास ढासळतो.
२. बाळ रडतंय म्हणजे दूध पुरत नाहीये हा गैरसमज! बाळ वेगवेगळ्या कारणांसाठी रडत असतं. कधी आई हवी म्हणून, कधी गॅसेस झाले म्हणून, कधी नुसतं कुशीत झोपायच म्हणून! पण ‘बाळ रडतंय म्हणजे आई दूध पाजण्यात कमी पडतीये’ असा चुकीचा शिक्का मारला जातो.
३. हॉस्पिटलमध्ये पहिल्या दिवसापासून सर्रास दिला जाणारा फॉर्म्युला! याची बहुतेक बाळांना काहीच गरज नसते. आईचं दूध पुरेसं असतं, बाळाची तहान भूक त्याने भागणार असते. तरीही हॉस्पिटल मध्ये डॉक्टर - नर्सेस 'उगाच भानगड नको !' या भीतीनं पाहिले दोन तीन दिवस फॉर्म्युला द्यायला लावतात. त्यातूनच आईचे दूध पुरेसे तयार होण्याचं चक्र गडबडतं!
४. आईला स्तनपान करताना स्तन दुखावतात, कधी त्यातून रक्त येतं, कधी त्यात जंतू संसर्ग होऊ शकतो. यामुळे स्तनपान करणं अवघड जातं. अशावेळी कुठल्या डॉक्टरकडे जायचं ते कळत नाही. आणि स्तनपान बंद केलं जातं.
५. फॉर्मुला कंपन्यांचे आक्रमक मार्केटिंग - ज्यामुळे आईला स्वतःच्या दुधापेक्षा फॉर्म्युला जास्त सोयीचा वाटतो. कधीकधी मैत्रिणीने तिच्या बाळाला फॉर्म्युला दिला तर आपण पण देऊया की! असा विचार होतो .


 

काय व्हायला हवं?

१. याची सुरुवात हॉस्पिटल पासून व्हायला हवी. हॉस्पिटलमध्ये WHO ने सांगितलेल्या बालक स्नेही हॉस्पिटल साठीच्या दहा पायऱ्या (10 स्टेप्स for baby friendly hospital initiative) अंगिकारल्या जाव्यात.
२. स्तनपान चे महत्व जाणून त्यासाठी स्वतंत्र, क्वालिफाइड स्तनपान सल्लागार प्रत्येक हॉस्पिटलशी जोडलेले असावेत. (आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा एक समाधान देणारा करिअर ऑप्शन आहे.)
३. स्तनपान करताना येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर स्तनपान सल्लागारांची मदत घ्यावी. बहुतेक मोठ्या शहरात आंतरराष्ट्रीय बोर्ड प्रमाणित स्तनपान सल्लागार (IBCLC) असतात. किंवा त्यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने अपॉइण्टमेण्ट घेता येते.

४. बाळाला किमान सहा महिने संपूर्ण व दोन वर्षापर्यंत अंशतः आईचे दूध मिळावे यासाठी कामाच्य्या ठिकाणी सामाजिक जाणिवेने पुरेशी पगारी सुट्टी (maternity leave) देण्यात यावी. तसेच ब्रेस्ट पंपिंगची, फीडिंग रुम, पाळणाघराची सोय सर्व कामाच्या व सार्वजनिक ठिकाणी करावी.
५. बाळाला दूध पुरते आहे याची एक सोपी चाचणी म्हणजे बाळाची शू! २४ तासात बाळाला सहापेक्षा जास्त वेळा शू होत असेल आणि बाळाची वाढ व विकास योग्य प्रमाणात होत असेल, तर बाळाला दूध व्यवस्थित पुरत आहे अशी शाबासकी आईने स्वतःला द्यावी आणि कुठल्याही अनाहुत सल्ल्यांना बळी न पडता फुल आत्मविश्वासाने बिनधास्त बाळासोबत वाढत जाणं एन्जॉय करावं!

meetojas@gmail.com
 

Web Title: world breastfeeding week 2024 : six month exclusive breastfeeding only 55% in India, why so? what are the problems?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.