डाॅ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ)
आजही स्तनपानाविषयी जनजागृती करावी लागते याचे एक बालरोगतज्ज्ञ म्हणून मला आश्चर्य वाटते. आई आपल्या बाळाला अंगावरचे पाजते व त्याला जगवते, याहून दुसरं उदात्त काही असेल, असे वाटत नाही. वैद्यकीय शिक्षण घेताना स्तनपानाचं महत्त्व माझ्या मनावर कायमचं बिंबवलं गेलं. त्याची प्रचिती मला एम. डी. करताना पहिल्या वर्षात आली. ‘लॅक्टेशन फेल्युअर’ (स्तनपान न देता कृत्रिम पावडर वा गायी-म्हशीचे दूध देणे) झालेल्या व सेप्सिसच्या शिकार झालेल्या बाळावर इलाज करणे हे महाकठीण काम असते हे मला तेव्हा कळले. त्यामुळे जन्मानंतर एकदा का बाळ नीट दूध प्यायला लागले की आम्हाला हायसे वाटत असे.
बाळाला पहिले सहा महिने केवळ स्तनपान करणे म्हणजे हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आईच्या दुधाखेरीज अन्य काहीही म्हणजे गायी-म्हशीचे दूध, घुटी, वरचे पाणी किंवा कृत्रिम पावडर (फाॅर्मुला मिल्क) देऊ नये. मात्र तरीही बाळाला वरचे दूध, घुटी सर्रास देण्याचं प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक असल्याचे दिसते. खेड्यातल्या आईला एकदा सांगितले की, ती केवळ स्तनपान करताना जणू लष्करशिस्त पाळते. शहरी भागातल्या मातांचे मतपरिवर्तन करणे अवघड जाते. त्या माहितीसाठी गुगल सर्च करतात; पण शेकडो संदर्भ असलेली‘पहिले सहा महिने स्तनपान’ याकडे दुर्लक्ष करतात.
‘मला दूध येत नाही कारण बाळ रडते’ या एका सबबीखाली अनेकदा बाळाला वरचे सुरू केल्याचे रोज पाहण्यात येते. पण ‘बाळ रडते’ याचा अर्थ दूध पुरत नाही, असा होत नाही. बाळाचे वजन नीट वाढत असेल, त्याचे लघवीचे प्रमाण नीट असेल तर त्याला आईचे दूध पुरते असे समजावे. स्तनपान करण्यात दुसरी एक अडचण नोकरीची असते. नोकरीवर लवकर रुजू व्हायचं म्हणून अनेक माता वरचे अन्न लवकर सुरू करतात. प्रसंगी बिनपगारी रजा घ्यावी पण सहा महिने बाळाला स्तनपानच करावे हे उत्तम.
पहिले सहा महिने केवळ स्तनपान केलेल्या आणि सहा महिन्याआधी वरचे सुरू केलेल्या बाळांच्या आरोग्याचा मी गेली २५ वर्षे बारकाईने अभ्यास केला. ‘निव्वळ स्तनपान’ केलेल्या बाळांचे आरोग्य व मेंदूचा विकास दुसऱ्या बाळांपेक्षा कितीतरी पटीत जास्त असल्याचे दिसून आले. पहिले सहा महिने स्तनपान केले तर आपण मुलांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा करू शकतो. dr.sanjayjanwale@icloud.com