Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळाला दूधच पाजता येत नाही, स्तनाला जखमा होतात, बसण्याच्या जागी वेदना? आईने करायचं काय?

बाळाला दूधच पाजता येत नाही, स्तनाला जखमा होतात, बसण्याच्या जागी वेदना? आईने करायचं काय?

World Breastfeeding Week : सुरुवातीचे काही दिवस अत्यंत अवघड असतात, नव्या आईसाठी सगळंच नवीन असतं अशावेळी काही गोष्टी शांतपणे शिकून घ्याव्या लागतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 05:57 PM2023-08-04T17:57:21+5:302023-08-05T16:49:49+5:30

World Breastfeeding Week : सुरुवातीचे काही दिवस अत्यंत अवघड असतात, नव्या आईसाठी सगळंच नवीन असतं अशावेळी काही गोष्टी शांतपणे शिकून घ्याव्या लागतात.

World Breastfeeding Week : how to overcome sore or cracked nipples, breast engorgement | बाळाला दूधच पाजता येत नाही, स्तनाला जखमा होतात, बसण्याच्या जागी वेदना? आईने करायचं काय?

बाळाला दूधच पाजता येत नाही, स्तनाला जखमा होतात, बसण्याच्या जागी वेदना? आईने करायचं काय?

Highlights चुकत माकत एकमेकांना सांभाळून घेत पुढे गेलं तर आई आणि बाळाची लवकरच गट्टी जमते

डॉ.ज्योत्स्ना पडळकर ( बालरोगतज्ज्ञ, पुणे, jyotsnapadalkar@gmail.com)

कितीही शारीरिक आणि मानसिक तयारी केली तरी प्रत्यक्ष अनुभव हा निराळाच आणि नवाच असतो. एका संपूर्ण परावलंबी जिवाशी आपल्या अवघडलेल्या जिवानिशी जमवायचं म्हणजे थोडं अवघड जातंच. अगदी पाच सात टक्के स्त्रियांचंच सगळं काही हसत खेळत आणि सुरळीत चालतं. एरवी 'सुरुवातीचे दिवस' सर्वांसाठी 'अवघडच' असतात. प्रत्यक्ष बाळ येण्याच्या क्षणी सर्वात जास्त दुखतं. मात्र तेव्हा आईची सहनशक्ती सर्वात जास्त असते. नंतर ही स्थिती संपते आणि छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा असह्य दुखऱ्या होतात.  

सुरुवातीचे अवघड दिवस कसे सोपे होतील?

१. बाळाची डिलिव्हरी सोपी व्हावी म्हणून आईची खालची जागा मोठी केलेली असते. बसताना ती जागा आणि टाके दुखतात तसेच सिझेरियनच्या ऑपरेशन नंतर पोटावरचे टाके बाळाला पाजताना दुखतात. या दोन्ही गोष्टींसाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे बसलं तर टाक्यांवर ताण येत नाही आणि दुखणं कमी होतं.

२. आणखी एक कॉमन दुखणं म्हणजे स्तनामध्ये दूध साठल्यामुळं आणि त्याचा निचरा न झाल्यामुळं होणारं दुखणं. जेव्हा मागणी आणि पुरवठा यांचं गणित बसलेलं नसतं तेव्हा ही समस्या येऊ शकते. स्वच्छ हातांनी दाब देऊन आईचे स्तन अनुभवी स्त्रीकडून मोकळे करून घेणं हा त्यावरचा उपाय. बाळानी पिऊन असं मोकळं केलं तर उत्तमच.
३. अजून एक खूप दुखरी समस्या म्हणजे निपलला  झालेली जखम. सुरुवातीला बाळ अतिशय उत्साहानी जोरानं चोखत राहतं. याचा दूध घेण्यासाठी उपयोग होतो, पण जर आईला हे चोखणंच दुखलं आणि तिनं बाळाला जोरानं उपटून बाजूला केलं तर निपलला जखम होते आणि पुढचं पाजणं अतिशय दुखरं होतं.अशावेळी बाळाची स्तनावरची पकड सोडवण्यासाठी आईनी तिची स्वच्छ करंगळी बाळाच्या तोंडात देऊन त्याची ग्रीप सोडवावी. म्हणजे त्याला सहज स्तनापासून बाजूला करता येईल..

४. सर्वात महत्त्वाची अवघड जागंची समस्या म्हणजे शी च्य जागी होणारं दुखणं किंवा फिशर. डिलिव्हरी नंतर एक दोन दिवस किंवा जास्त दिवस शौचाला होत नाही. तेव्हा मळ कडक होतो आणि त्याची डिलिव्हरी होताना त्या जागेला इजा होते,चीर पडते, कधी रक्तही येतं आणि खूप दुखतं. नंतर प्रत्येक वेळी शौचाला होताना ती जागा प्रचंड दुखते. नुसतं बसणं देखील दुखरं होतं. यासाठी होईल ते शौच मऊ होण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि औषधं जरूर घ्यावीत.
५. डिलिव्हरी नंतर नव्या आईची मनस्थिती हळवी असते. त्यात शारीरिक परावलंबित्व तिला आणखी हळवं बनवतं. मदतीला कोणी जाणकार असलं तर प्रश्न सोपे होऊ शकतात.

६.  इतरांना कसं जमलं? मलाच का जमत नाहीये ?असे विचार करून स्वतःचं मनोबल घालवू नये. शांतपणानं, संयमानं आपले प्रश्न, शंका गोळा करून डॉक्टरांना भेटावं. काही प्रश्नांना सुटायला वेळ द्यावा लागतो, सबुरीनं घेणं महत्त्वाचं.
७. सुरुवातीचे दिवस फक्त आईलाच अवघड नसतात तिला मदत करणाऱ्यांना आई, आजी यांनाही अनेक वर्षांनी मदत करायची वेळ आलेली असते. नव्यानं अनेक गोष्टींना सामोरं जावे लागतं. कित्येकांना वयामुळे धाडस कमी होते आणि थकायलाही होतं.
८. शिवाय बाळाला तर विसरून कसं चालेल? त्यालाही नव्या जगामध्ये नव्या आईबरोबर सगळंच नवीन असतं. त्यालाही डिलिव्हरीचा भरपूर त्रास झालेला असतो. त्याला समजून घ्यायला नको का? त्याच्या रडण्याचे वेगवेगळे अर्थ समजून घेत काम करावं लागतं.  चुकत माकत एकमेकांना सांभाळून घेत पुढे गेलं तर आई आणि बाळाची लवकरच गट्टी जमते आणि "अच्छे दिन" लवकरच सुरू होतात.

Web Title: World Breastfeeding Week : how to overcome sore or cracked nipples, breast engorgement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.