Lokmat Sakhi >Health >Pregnancy > world breastfeeding week : बाळाला जगवणारं, सगळ्या आजारांपासून वाचवणारं ‘आईचं दूध!’ बाळाला त्यापासून वंचित का ठेवता?

world breastfeeding week : बाळाला जगवणारं, सगळ्या आजारांपासून वाचवणारं ‘आईचं दूध!’ बाळाला त्यापासून वंचित का ठेवता?

world breastfeeding week 2024 : बाळासाठी आईच्या दुधापेक्षा उत्तम आहार दुसरा कोणताच नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2024 04:45 PM2024-08-03T16:45:00+5:302024-08-03T16:47:23+5:30

world breastfeeding week 2024 : बाळासाठी आईच्या दुधापेक्षा उत्तम आहार दुसरा कोणताच नाही.

world breastfeeding week: 'Mother's milk' saves the baby from all diseases! protect the baby against diseases | world breastfeeding week : बाळाला जगवणारं, सगळ्या आजारांपासून वाचवणारं ‘आईचं दूध!’ बाळाला त्यापासून वंचित का ठेवता?

world breastfeeding week : बाळाला जगवणारं, सगळ्या आजारांपासून वाचवणारं ‘आईचं दूध!’ बाळाला त्यापासून वंचित का ठेवता?

Highlightsआईच्या दुधात पुढच्या पिढीला सुदृढ, आरोग्यवान, बुद्धिमान बनवण्याची शक्ती आहे. आणि ते दूध सन्मानाने पुढच्या पिढीला मिळावं ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे

ओजस सु. वि. (आंतरराष्ट्रीय बोर्ड प्रमाणित स्तनपान सल्लागार (IBCLC))

आईचं दूध हे निसर्गानी निर्मिलेलं एक जादुई रसायन आहे. जे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत पिल्लाला जगवतं, टिकवतं. आईचं दूध हे केवळ अन्न नाही तर बाळाचा रोगापासून बचाव करणारी लस आहे. ‘स्तनपान सल्लागार’ या नात्याने मी जेव्हा नवीन आई- बाबा- परिवार यांसोबत काम करते तेव्हा लक्षात येतं की ‘आईचं दूध’ नामक अमृत आपण समाज म्हणून पुरेसं समजूनच घेतलेलं नाही. अनेकांच्या मते तो दुर्लक्ष करण्याचा किंवा झाकून ठेवण्याचा किंवा ‘फक्त बायकांचा’ विषय असतो. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत आईच्या दुधाची भूमिका राहिली आहे.आईच्या दुधात पुढच्या पिढीला सुदृढ, आरोग्यवान, बुद्धिमान बनवण्याची शक्ती आहे. आणि ते दूध सन्मानाने पुढच्या पिढीला मिळावं ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यासाठी हा लेखन प्रपंच. 

समजा, एखाद्या कंपनीने जर असं प्रोडक्ट शोधलं की- ‘जे अतिशय कोवळ्या पचनसंस्थेला पौष्टिक आणि चविष्ट अन्न देतं; प्री बायोटिक, प्रो-बायोटिक मित्रजीवाणू देतं; रोगप्रतिकारक शक्ती देतं; अगदी बाळाच्या मागणीनुसार नेहमी ताज्या आणि योग्य तेवढ्याच पोषणाचा पुरवठा करतं आणि कायम ‘रेडी टू इट’ असतं.’ अशा कंपनीचे शेयर्स किती वाढतील! असं शोधणाऱ्या वैज्ञानिकाला नोबेल प्राईज नक्की! गेली दीडशे वर्ष असं प्रोडक्ट तयार करण्याचा प्रयत्न मोठमोठाल्या बहुराष्ट्रीय कंपन्या करत आहेत. पण आजपर्यंत असं प्रोडक्ट कोणीही बनवू शकलेलं नाही.

फक्त एक व्यक्ती वगळता, ती म्हणजे नवजात अर्भकाची आई!आईच्या चमचाभर दुधात पोषक अन्न, प्रतिजैविकं, संसर्गरोधक, दाहरोधक, प्री बायोटिक-प्रो बायोटिक, संप्रेरक, स्टेमसेल्स असलेल्या कोट्यवधी पेशी असतात. आईच्या दुधात कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि पाणी याचं बाळासाठीचं ‘बेस्ट पॅकेज’ असतं. बाळ जसजसं मोठं होतं तसं आईचं दूधही ‘मोठं’ होतं. प्रिमॅच्युअर बाळांच्या आईच्या दुधाचे घटक वेगळे असतात; पहिल्या पाच दिवसाच्या दुधाचे घटक वेगळे असतात; तर मूल मोठं झाल्यावर त्याच्या बदलत्या गरजांनुसार दुधाचे घटक बदलतात. बाळ आजारी असेल तर त्याच्यासाठी औषधी ठरणारे ‘दाहविरोधक’ दुधात तयार होतात. आई आजारी असेल तर तिच्यात तयार होणाऱ्या ‘ॲण्टीबॉडीज’ दुधात उतरतात आणि बाळाचं त्या आजारापासून रक्षण होतं. इतकंच नाही तर वातावरणात असणाऱ्या रोगजंतुंविरोधी ॲण्टीबॉडी ही आईच्या दुधात तयार होतात आणि बाळाला मिळतात. आईचं दूध हे बाळाचं संरक्षक कवच असतं.

आयुष्याचे किमान पहिले सहा महिने बाळ केवळ आईच्याच दुधावर वाढतं. दोन वर्ष वयाचं होईपर्यंत बाळाला लागणारी रोगप्रतिकार शक्ती आईच्या दुधातून मिळते. पहिली तीन वर्षे बाळाच्या मेंदूची वाढ सर्वात वेगाने होत असते. आईच्या दुधात taurine नावाचं प्रथिन असतं जे मेंदू विकासात महत्वाची भूमिका बजावतं.काही नवं संशोधन म्हणतात, वयाच्या दोन वर्षापर्यंत किंवा अधिक आईचं दूध प्यायलेल्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता विकास अधिक दिसून येतो. आहे की नाही खरोखर ‘जादुई रसायन’? आणि ते ही संपूर्ण मोफत!! आईचं दूध आजवर कोणत्याही फॉर्मुला कंपनीला बनवता आलेलं नाही. पण तरीही या कंपन्या एका वर्षात दशअब्ज डॉलर्सचा धंदा करतात. 

अलिकडेच बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी नवीन फॉर्मुलाच्या संशोधनासाठी ३५ लाख अमेरिकन डॉलर्स गुंतवले अशी बातमी वाचली. फॉर्मुलाच्या जाहिराती इतक्या चमकदारपणे आदळत असतात की अगदी गरीब घरातली माणसंही बाळासाठी हजारो रुपये खर्च करतात. फुकट मिळणाऱ्या गोष्टीचं मोल दुर्दैवानी आपल्याला कळत नाही. आईचं दूध फुकट मिळतं; परंतु ते अनमोल आहे. हे सर्व संस्कृतीतलं पारंपारिक ज्ञान तर आहेच पण आजचं विज्ञानही हेच सांगतं.हे झालं दुधाच्या रासायनिक विज्ञानाविषयी. याखेरीज स्तनपान करण्याच्या कृतीमध्येही खूप गहिरं सौंदर्य आणि विज्ञान लपलेलं आहे. एका जागतिक दर्जाच्या फोटोग्राफरनी म्हणलं आहे, “माझ्या मते जगातली सर्वात सुंदर फ्रेम म्हणजे आई आपल्या बाळाला दूध पाजत असते ती! त्या दोघांच्या अतूट बंधाची नाळ थेट निसर्गाशी जोडलेली असते.” स्तनपान करण्याचा बाळाच्या बौद्धिक, सामाजिक, मानसिक विकासावर खूप मोठा परिणाम होत असतो. 
 

Web Title: world breastfeeding week: 'Mother's milk' saves the baby from all diseases! protect the baby against diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.