नव्या आईला सतत काळजी असते की आपल्या बाळाला दूध पुरेल ना? त्याचं पोट भरेल ना? त्याची वाढ नीट होईल ना? त्याला पचेल ना? आपण चुकीचं तर काही खात नाही, ज्याचा त्याला त्रास होऊ शकतो. हजार शंका, आणि हजार प्रश्न. पण नव्या आईला बाळाच्या भूकेपेक्षा जास्त दूध येत असेल तर? म्हणजे दूध जास्त असेल तर? त्याचाही काही आयांना त्रास होऊ शकतो. आणि त्यातून मग आरोग्याचेही काही प्रश्न निर्माण होतात. बालरोगतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना डॉ. पडळकर सांगतात नेमकं करायचं काय?
दूध जास्त येत असेल तर.. १. सुरुवातीच्या काही दिवसांत मागणी आणि पुरवठा यांचा मेळ बसत नाही. कुणाला कमी तर कोणाला जास्त दूध येतं दूध कमी आणि जास्त त्रासाचं आणि गैरसोयीचं तसंच दूध जास्त येणं पण. मात्र दूध जास्त येतं तेव्हा त्याचा त्रास आईलाच होतो. २. बाळाचं एकाच बाजूला पिऊन भागतं दुसरीकडचं दूध शिल्लक राहतं. कधी कधी ते गळतं आणि पिळून काढलं नाही तर तिथंच शिल्लक राहतं. याच्या गाठी होतात आणि पिळून काढताना स्तन जास्त जोरात हाताळले आणि दुखावले तर त्यांना इजा होते. हातावरचे आणि स्तनावरचे जंतू या दुधावर वाढू लागतात आणि गळू तयार होतं. जंतूंच्या वाढीसाठी दूध हे अतिशय उत्तम माध्यम असल्यामुळे या गाठींमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव लगेच होतो.
३. स्तनात गळू होऊ नये यासाठी वेदनाशामक औषध घेणं, बाळाला वारंवार पाजत राहणं, जास्तीचं दूध काढून साठवणं हे प्राथमिक उपचार झाले पण तरीही बरं वाटत नसेल तर डॉक्टरांना लवकर दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा हे बरं. ४. जेव्हा आईला थंडी वाजून ताप येतो, स्तनात फार दुखतं, काखेत गाठी येतात,अशा वेळेला तिला स्तनात गळू तर होत नाहीये ना यावर लक्ष ठेवावं. स्तनातलं दूध काढत राहिलं तर जास्ती येण्याची शक्यता असते म्हणून दोन्हीकडे थोडं थोडं दूध शिल्लक ठेवलं तर पुढच्या वेळेला येणं थोडं थोडं कमी होत जाऊन हवं तेवढं येत राहतं. म्हणून दोन्हीचा सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे साठलेल्या दुधाच्या गाठीही होणार नाहीत आणि दूध फार जास्तही येणार नाही. आणि लवकरच बाळाला हवं तेवढं दूध यायला लागतं.