Lokmat Sakhi >Health >Pregnancy > आईने बाळाला लवकरात लवकर कधी दूध पाजायला हवं?  नव्या आईला चटकन ते कसं जमावं?

आईने बाळाला लवकरात लवकर कधी दूध पाजायला हवं?  नव्या आईला चटकन ते कसं जमावं?

World Breastfeeding Week : सिनेमा-कादंबऱ्यात पाहून -वाचून स्तनपानाविषयी काही भलत्या कल्पना आईच्या असतात, प्रत्यक्षात मात्र त्या कल्पनांना तडे जाऊ शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2023 04:32 PM2023-08-03T16:32:05+5:302023-08-03T17:12:40+5:30

World Breastfeeding Week : सिनेमा-कादंबऱ्यात पाहून -वाचून स्तनपानाविषयी काही भलत्या कल्पना आईच्या असतात, प्रत्यक्षात मात्र त्या कल्पनांना तडे जाऊ शकतात.

World Breastfeeding Week :when should mother feed newborn baby, benefits of breastfeeding, crawling. | आईने बाळाला लवकरात लवकर कधी दूध पाजायला हवं?  नव्या आईला चटकन ते कसं जमावं?

आईने बाळाला लवकरात लवकर कधी दूध पाजायला हवं?  नव्या आईला चटकन ते कसं जमावं?

Highlightsउदास न होता, न कंटाळता बाळाला वरचेवर आत्मविश्वासानं पाजत रहा आणि पहा काय जादू होते ती!

डॉ.ज्योत्स्ना पडळकर ( बालरोगतज्ज्ञ, पुणे, jyotsnapadalkar@gmail.com)

   बाळ जन्माला येतं तेव्हा स्तनांची नैसर्गिक तयारी आणि आईची शारीरिक - मानसिक तयारी पूर्ण झालेली असावी. या तयारी बरोबरच बाळाच्या पहिल्या पिण्याला आईला दूध येण्याच्या क्रियेत महत्त्व असतं. नऊ महिन्याच्या वाट पाहण्यानंतर बऱ्याच स्त्रियांना बाळ जन्मल्याबरोबर सुटका झाल्यासारखं वाटतं. बाळ जन्माला आल्याचा आनंद अवर्णनीय असतो. त्याच्यापुढे शारीरिक थकव्याचं काही वाटेनासं होतं आणि थोड्या विश्रांतीनंतर ही नवी आई बाळाला जवळ घ्यायला उत्सुक होते. या पहिल्या क्षणांमध्येच एकमेकांचं आकर्षण सर्वात जास्त असतं. आईला बाळाला कधी जवळ घेईन असं झालेलं असतं तर बाळाला आईच्या अंगावर कधी पिऊ असं झालेलं असतं. त्यांना जितकं लवकर निकट येऊ दिलं जाईल तेवढं ते एकमेकांना स्वीकारण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ या जोडीला स्तनपानामध्ये अडचणी कमी येतात. 
     बाळाला लवकरात लवकर कधी पाजायला घ्यावं? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, बाळ जन्माला आल्या आल्या लगेच वार बाहेर पडण्याच्याही आधीच. याचं कारण शरीर रचनेच्या आणि कार्यपद्धतीच्या आधारावर पडताळून पाहण्याजोगं आहे. बाळाच्या नाळेची लांबी पन्नास सेंटीमीटर किंवा जास्त इतकी मोठी असते. खरंतर नाळेच्या इतक्या मोठ्या लांबीमुळं बाळ पोटात असताना बरेच गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत असतात. कधी कधी तर नाळेचे वेढे गळ्याभोवती पडून बाळाचं बाहेर येणं म्हणजे डिलिव्हरीच अडचणीची किंवा अशक्य होते. असं असताना ही नाळ इतकी मोठी का असावी याचं उत्तर म्हणून असं म्हणतात, बाळ जन्माला आल्याबरोबर आईला बाळाला पाजायला घ्यावसं वाटतं. तिला तसं करू दिलं तर वार पडण्याआधी सुद्धा बाळाला छातीपर्यंत पोहोचता यावं यासाठी त्याची एवढी लांबी असावी म्हणून निसर्गानं तशी व्यवस्था केली आहे!

(Image : google)

बाळांनं चोखल्यामुळें आईला दूध यायला सुरुवात होते आणि दुसरं म्हणजे तिचं गर्भाशय आकुंचन पावून वारही बाहेर टाकली जाते.  
हा चांगलं दूध देण्याचा संवेदनशील काळ आणखी बारा तासापर्यंत टिकतो नंतर मात्र संवेदनक्षमता कमी कमी होत जाते म्हणून लवकरात लवकर बाळाला अंगावर पाजायला घ्यावं. जितकं लवकर स्तनपान सुरू होईल तितकं दूध जास्त येतं आणि जास्त दिवस पर्यंत येणं चालू राहतं. पूर्वी आपण तिसऱ्या दिवशी पर्यंत दूध येण्याची वाट पहात असू. पण या माहितीच्या आधाराने लवकर पाजण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.  
    मानसिक तयारी ठेवली तर ऑपरेशन नंतरही पुष्कळजणी यशस्वी रीतीनं बाळाला दीर्घकाळ अंगावर पाजतात. यासाठी बाळाला आईजवळ ठेवणं आवश्यक आहे. बाळ जितकं आईजवळ नजरेसमोर असेल, त्याचे आवाज, स्पर्श, दर्शन जेवढ्या जास्त वेळा आईला मिळेल तेवढी दूध यायला मदत होईल. ज्या बाळांना अशक्तपणामुळे कमी वजनामुळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागतं त्यांच्या यांना दूध यायला आणि टिकवायला त्रास होतो. दूध बंद पडण्याची शक्यता बरीच वाढते. अशासाठी या नाजूक बाळाजवळ आईचीही व्यवस्था करायला हवी. 
      सगळ्यांनाच बाळाच्या पहिल्या चोखण्याबरोबर भरपूर दूध येतं असं नाही, किंबहुना भरपूर दूध हे लगेच येत नसतंच. पण जेवढं येतं तेवढं बाळाला बरेचदा पुरतं. पण जेव्हा काही वेळा काही बाळांना तेवढं पुरत नाही तेव्हा तात्पुरतं थोडं वरचं दूध पोट भरण्यासाठी देऊ करावं पण दर दोन तासांनी प्रथम अंगावर जरूर जरूर पाजावं.


 

एक-दोन दिवसांतच बाळाला पूर्णपणे अंगावर पिता येऊ लागतं आणि वरून दुसरं दूध देण्याची गरज पडत नाही. बाळाला प्यायला घेताना बाळाने स्तनावर चांगलं चिकटलं पाहिजे. त्यामुळे दूध यायला मदत होते. बाळानं संपूर्ण निपल आणि त्या भोवतीचा काळा भाग हे सर्व तोंडात धरावं यासाठी त्याचे गाल थोडेसे आत दाबून त्याच्या तोंडाचा मोठा ऑ करावा आणि बाळांना स्वतःहून निपलची पकड घेण्यासाठी बाळाच्या गालाला किंवा ओठाला निपलचा स्पर्श करावा. म्हणजे बाळ लगेच स्तनाचा ताबा घेईल.
 बाळाच्या पहिल्या पिण्याबद्दल अनेक ठिकाणी वाचून सिनेमात पाहून ऐकून मनात एक विशिष्ट कल्पना तयार झालेली असते.
एक छान सुंदर बाळ जन्माला येणार, ते रडणार, मग आपण त्या बाळाला जवळ घेणार, त्याला चोखायला देणार आणि आपल्याला लग्गेच दूध यायला लागणार आणि आपण जगातल्या सर्वोच्च आनंदाच्या शिखरावर पोहोचणार! आई झाल्याचं सार्थक होणार! असं चित्र मनात ठसलेलं असतं. पण बऱ्याचदा मनातल्या कल्पनेप्रमाणं सगळं काही घडताना दिसत नाही. कधी कधी सगळंच इतकं अवघडलेलं आणि दुखरं असतं की मनातल्या कल्पनेला साफ तडे जातात आणि मन उदास होतं.

हे बऱ्याच जणींच्या बाबतीत होतं, क्वचितच एखादीला पहिल्याच पाजण्याला सर्वस्वी यश मिळतं. हे माहिती हवं म्हणजे फारसा अपेक्षा भंग होणार नाही. बाळाच्या पहिल्या चोखण्यामुळं अगदी दुधाच्या धारा येऊ लागल्या नाहीत तरी त्याचा चांगलाच उपयोग होतो आणि कल्पनेतलं स्तनपान लवकरच वास्तवात येतं.  म्हणून उदास न होता, न कंटाळता बाळाला वरचेवर आत्मविश्वासानं पाजत रहा आणि पहा काय जादू होते ती!

(स्तनपानाविषयी विशेष मालिका : भाग ३)

Web Title: World Breastfeeding Week :when should mother feed newborn baby, benefits of breastfeeding, crawling.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.