डॉ. किशोर अतनूरकर (स्त्री रोग, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि समुपदेशक)
प्रसूतीशास्त्राच्या पुस्तकात एक अतिशय समर्पक वाक्य लिहिलेलं आहे. Ideally, a child should be born because it is wanted and not because it cannot be prevented. अर्थात, बाळाचा जन्म आपल्याला अपत्य हवं असतानाच व्हावा अन्यथा नाही. गर्भधारणेवर प्रतिबंध घालता येत नाही म्हणून अपत्यजन्म होत राहावीत हा जमाना गेला. आता पती-पत्नी, शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि पुरेसं मनुष्यबळाच्या दृष्टीने सक्षम आहेत किंवा नाहीत याची खात्री करूनच गर्भधारणेचे नियोजन झाले पाहिजे. ही काळाची गरज आहे.
वैद्यकीय दृष्टिकोनातूनही गर्भवती महिलेचे आरोग्य संपूर्णपणे स्थिर रहावं, ९ महिन्यात शक्यतो कुठली गुंतागुंत होऊ नये, झालीच तर वेळीच त्यावर उपचार करता यावा, तिच्या जीवावर बेतू नये, बाळंतपण सुखरूप होऊन धडधाकट बाळ जन्माला यावं, नऊ महिन्याच्या तपश्चर्येचा शेवट गोडंच व्हावा यासाठी प्रत्येक गर्भधारणा ही पूर्वनियोजित असायलाच हवी.
आपल्या देशात पती-पत्नी गर्भधारणेच्या पूर्वी डॉक्टरकडे जाऊन, 'आम्हाला आता गर्भधारणा हवी आहे, तत्पूर्वी आम्ही सर्व दृष्टिकोनातून सक्षम आहोत किंवा कसे, याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा ' या हेतूने चर्चा करून मगच गर्भधारणेचा निर्णय घेणाऱ्या जोडप्यांची संख्या खूप कमी आहे. ते प्रमाण वाढलं पाहिजे. कारण त्याचा थेट संबंध माता मृत्यू दर आणि नवजात बालक मृत्यू दराशी आहे. आपल्या देशाचा माता मृत्यू दर, १०३ पर्यंत आला आहे. या तुलनेत विकसित देशांमध्ये हा दर १० पेक्षाही कमी आहे. आपल्या आणि इतर पुढारलेल्या देशातील ही तफावत असण्यामागे अनेक कारणं असली तरी, तिथे जवळपास प्रत्येक गर्भधारणा ही पूर्वनियोजित असते आणि आपल्याकडे गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्याची पद्धत आहे. या पद्धतीत बदल होऊन गर्भधारणेसाठी आपण सर्वार्थाने ' फिट ' आहोत का नाही याची चिकित्सा करून मगच गर्भ राहू द्यावा हा नियम समाजात रुळायला हवा.
गर्भधारणा आणि बाळंतपण या स्त्री जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना आहेत. गर्भवती महिलेच्या शरीरातच नव्हे तर मनात खूप बदल होत असतात. तिच्या कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्यावर देखील परिणाम होत असतो.जीवनात मोठा बदल घडवून आणणाऱ्या या प्रसंगाला सामोरं जाणं ही एक परीक्षाच असते. परीक्षेची तयारी जर नीट केली तर परीक्षा सोपी जाईल आणि परीक्षेचा रिझल्टही चांगला लागेल. गर्भधारणा आणि अपत्यजन्माचं देखील असंच असतं.
गर्भधारणेपूर्व समुपदेशनाचा उद्देश असा आहे की, महिलेने आपल्या आरोग्याच्या चांगल्या किंवा इष्टतम अवस्थेत असताना गर्भ राहू द्यावा जेणे करून संपूर्ण ९ महिने तिची प्रकृती उत्तम राहील आणि फलनिष्पत्ती पण चांगल्या दर्जाची होईल.
गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या बाबतीत आवश्यक ते ज्ञान जोडप्यांना मिळावं, जीवनातल्या या महत्वाच्या प्रसंगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सुधारणा व्हावी, गर्भधारणेसाठी अयोग्य असणाऱ्या काही बाबींचं निराकरण व्हावं आणि पूर्वीच्या गर्भधारणेत आलेल्या काही कटू अनुभवांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेणे हे सर्व गर्भधारणेपूर्वीच्या समुपदेशनाचे फायदे आहेत.
(लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. MD OBGY, Ph D. Social Sciences, MS counseling & Psychotherapy)
atnurkarkishore@gmail.com
Mob : 9823125637