Lokmat Sakhi >Health > कोरोना संसर्ग टाळायचा तर दारं-खिडक्या उघडा, हवा खेळती ठेवा !

कोरोना संसर्ग टाळायचा तर दारं-खिडक्या उघडा, हवा खेळती ठेवा !

माणसाकडून माणसाला झालेल्या संसर्गाबाबत प्रसिद्ध झालेल्या निबंधांमध्ये जगभर कोविड लागण झाल्याची नोंद झालेल्या व्यक्तींपैकी १०% व्यक्तींना बाहेर मोकळ्या जागेत संसर्ग झाला आहे तर बंद जागेत लागण झालेल्यांचं प्रमाण त्यांच्याहून १८.७ पटीने जास्त आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 02:42 PM2021-05-21T14:42:44+5:302021-05-21T14:49:59+5:30

माणसाकडून माणसाला झालेल्या संसर्गाबाबत प्रसिद्ध झालेल्या निबंधांमध्ये जगभर कोविड लागण झाल्याची नोंद झालेल्या व्यक्तींपैकी १०% व्यक्तींना बाहेर मोकळ्या जागेत संसर्ग झाला आहे तर बंद जागेत लागण झालेल्यांचं प्रमाण त्यांच्याहून १८.७ पटीने जास्त आहे

To prevent corona infection, keep doors and windows open, ventilation is important | कोरोना संसर्ग टाळायचा तर दारं-खिडक्या उघडा, हवा खेळती ठेवा !

कोरोना संसर्ग टाळायचा तर दारं-खिडक्या उघडा, हवा खेळती ठेवा !

- संयोगिता ढमढेरे

गेल्या एक वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या कोविड १९ साथीने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि
आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. गेल्या मार्च महिन्यात पुण्यात पहिला कोविड रुग्ण
सापडल्यानंतर पुणे, मुंबई करत राज्यातल्या सर्व मुख्य शहरात झपाट्याने कोविड पसरला आणि आज
देशात महाराष्ट्र हे सर्वाधिक कोविड संसर्ग झालेलं राज्य झालं आहे.
कोविड १९ ला कारणीभूत असणाऱ्या आजवर सर्वांनाच अनोळखी असलेल्या सार्स – सीओव्ही २ या
विषाणूवर गेल्या वर्षभरात बरंच संशोधन चालू आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर आलेली नैसर्गिक
अथवा लसीकरणानंतर प्राप्त झालेली प्रतिकारशक्ती निर्माण होण्याच्या कालावधीनुसार कोरोना
आटोक्यात येईल असं शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. कोविडची पुन्हा लागण होणं, इतरांना लागण होणं,
मोसमाचा आणि या इतर अनेक घटकांचा साथीवर होणारा परिणाम याबद्दल अजूनही संशोधन पूर्ण झालेलं
नाही.

कोविड संसर्गित व्यक्तीच्या श्वसनमार्गातून आलेल्या द्रवाचे थेंब आणि खोकला, शिंकणे, बोलणे आणि गाणे
यामुळे हवेत फेकले गेलेले तुषार (एरोसोल्स) असलेल्या हवेत संसर्ग न झालेल्या व्यक्तीने श्वसन करणे हे
सार्स – सी ओव्ही २ विषाणूची म्हणजेच कोविडची लागण होण्याचं प्रमुख कारण आहे.
कोविड विषाणू प्रामुख्याने हवेतून पसरतो याबाबत मोठ्या प्रमाणत पुरावे मिळू लागले आहेत. कमी
हवेशीर जागांमध्ये गर्दी असलेल्या कार्यक्रमात एकाच वेळी मोठ्या जनसमुदायाला कोविड विषाणूची
लागण झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. आयर्लंडमध्ये एकूण कोविड संसर्ग झालेल्या लोकांपैकी ०.१
%लोकांना बाहेर मोकळ्या हवेत कोविडची लागण झाली आहे तर ९९.९% लोकांना बंद जागेत संसर्ग झाला
आहे. माणसाकडून माणसाला झालेल्या संसर्गाबाबत प्रसिद्ध झालेल्या निबंधांमध्ये जगभर कोविड लागण
झाल्याची नोंद झालेल्या व्यक्तींपैकी १०% व्यक्तींना बाहेर मोकळ्या जागेत संसर्ग झाला आहे तर बंद
जागेत लागण झालेल्यांचं प्रमाण त्यांच्याहून १८.७ पटीने जास्त आहे असा निष्कर्ष निघाला आहे. भारतात
तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश इथे झालेल्या अभ्यासात कोणत्याही वयाची व्यक्ती त्याच्या नजीकच्या
संपर्कात असलेल्या व्यक्तीमुळे समुदायात संसर्ग होण्याची शक्यता २.६%तर एका घरात वास्तव्य करणाऱ्या
व्यक्तीना ९% असते असं निरीक्षण आहे.
हवेतून वाहणाऱ्या घटकामुळे कोविड झपाट्याने पसरत आहे हे काळजीचं कारण आहे. म्हणून कोंदट हवा
असलेल्या गर्दीच्या ठिकाणी कोविडचा वेगाने प्रसार होतो आहे. एकमेकांना चिकटून असलेल्या खोल्यांमध्ये
राहणारी पण एकमेकांत न मिसळणाऱ्या विलगीकरण सेवा देणाऱ्या हॉटेलमधल्या व्यक्तींनाही संसर्ग
झाल्याचं दिसून आलं आहे.
२५-५९% लागण ही प्रत्यक्ष लक्षण न दिसण्याच्या किंवा कोरोनापूर्व लक्षणांच्या काळात होत असल्याने
हवेतून संसर्ग होतो या विधानाला पुष्टी मिळते. त्याबरोबर १.१ तास ते ३ तास इतका काळ कोविड विषाणू
हवेत जिवंत राहतो असं निरीक्षण आहे.
शारीरिक अंतर राखणे, मुखपट्टी वापरणे, वेळोवेळी हात स्वच्छ करणे, लस घेणे या वर्तनाबरोबर हवेतून
येणाऱ्या घटकांमुळे होणारा कोविड संसर्ग टाळण्यासाठी हवा अधिक खेळती राहील यासाठी सुधारणा
करणं आवश्यक आहे. राहती घरं, शाळा, रुग्णालयं, कार्यालयं, उपहारगृहं, मॉल्स, दुकानं, मंडया,
बाजारपेठा, वाहनं, सभागृहं, तुरुंग आणि इतर बंदिस्त ठिकाणी हवा खेळती राहील हे पाहिलं पाहिजे. दारं,
खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत. रुग्णालयं आणि आरोग्य सेवा पुरवणारी इतर ठिकाणं हवेशीर असतील
आणि तिथे हवा शुद्धीकरण यंत्रणा असेल तर केवळ कोविडच नाही तर क्षयरोग आणि गोवर यासारखे
हवेतून पसरणारे आजारांचाही संसर्ग होणार नाही.

काय करता येईल ?


१.कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आणि कोरोनाकाळात जगताना प्रतिबंधाचा भाग म्हणून
सार्वजनिक इमारती, कामाची ठिकाणं,शाळा, रुग्णालयं,वृद्धाश्रम, घरात बाहेरची मोकळी हवा
येईल आणि आतली हवा आतच राहणार नाही इतकी पुरेशी हवा खेळती राहायला हवी.
२. वातानुकुलीत इमारतीत एम इ आर व्ही हवा शुद्धीकरण यंत्रणा किंवा एच ई पी ए फिल्टर
वापरावेत.
३. सार्वजनिक इमारती आणि वाहनात गर्दी टाळावी.
४. शारीरिक अन्तर, मुखपट्टी वापर आणि हाताची स्वच्छता हे कोविड सुसंगत वर्तन चालू ठेवावं.
५. तुम्ही पात्र असल्यास कोविड १९ ची लस घ्या.

(‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन
आणि युनिसेफचा संयुक्त उपक्रम)

Web Title: To prevent corona infection, keep doors and windows open, ventilation is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.