पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हरीयन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टीक ओव्हरीयन डीसिज ही सध्या अतिशय मोठ्या प्रमाणात आढळणारी समस्या आहे. इतकेच नाही तर विशेषत: तरुण मुलींमध्ये ही समस्या जास्त आढळते. पाळी सुरु झाल्यापासून ते मेनोपॉजपर्यंत हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ असतो. या काळात आढळणारी विविध लक्षणांचा समूह म्हणजे पीसीओडी. मूळात पाळीची अनियमितता, रक्तस्त्रावाचे प्रमाण कमी-अधिक होत राहणे, वेळेच्या आधी पाळी येणे आणि थोडं थोडं रक्त जाणं किंवा वेळेच्या खूप उशीरा पाळी येणे आणि प्रमाणाबाहेर रक्तस्त्राव होणं अशी लक्षणे दिसतात. या आजारात वजनाच्या समस्या प्रकर्षाने जाणवतात, वजन प्रमाणाबाहेर वाढते (Problem of PCOD or PCOS Expert opinion).
पीसीओएसमध्ये नेमकं काय होतं? स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन सांगतात...
जीवनशैली, ताणतणाव आणि वाढतं वजन ही पीसीओएस जास्त प्रमाणात होण्याची महत्त्वाची कारणं आहेत. हे दोन्ही एकमेकांशी निगडीत असतं, कधी वजन वाढल्याने पीसीओएसचा त्रास होतो तर कधी पीसीओएस झाल्याने वजन कमी करणं अवघड जातं. यामध्ये मासिक पाळीच्या आणि इतर वैद्यकीय समस्या निर्माण होतात त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्त्रियांच्या शरीरात असणारे २ हॉर्मोन्स. हे २ हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, या हॉर्मोन्सचे संतुलन बिघडल्याने विविध समस्या निर्माण होतात. मासिक पाळीची अनियमितता हे त्याचे एक दृश्य लक्षण आहे. इतर लक्षणांमध्ये चेहऱ्यावर अनावश्यक केसांचे प्रमाण वाढणे, पिंपल्स येणे ही आहेत. यामध्ये अँड्रोजन म्हणजेच सोप्या भाषेत पुरुषी हॉर्मोन्स वाढतात. बरेचदा पाळीच्या समस्येपेक्षा सौंदर्यात बाधा आणणाऱ्या या लक्षणांसाठी तरुणी डॉक्टरांकडे जाताना दिसतात.
उपाय काय?
अशाप्रकारच्या समस्या असलेल्या तरुणींना इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांचे कॉम्बिनेशन असलेल्या गोळ्या दिल्या जातात. या गोळ्या साधारणपणे गर्भनिरोधक म्हणूनही वापरल्या जातात. इस्ट्रोजन हा हॉर्मोन अँड्रोजन म्हणजेच पुरुषी हॉर्मोन कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे मासिक पाळी, आवाजातील बदल आणि चेहऱ्यावर येणारे अनावश्यक केस यांपासून सुटका होऊ शकते. पीसीओएसचे नेमके कारण सांगता येत नसले तरी अतिरिक्त वजन, ओव्हरीला सूज येणे ही यामागची महत्त्वाची कारणे असतात. नियमित आणि योग्य अशी जीवनशैली अवलंबणे म्हणजेच कमीत कमी तणाव, योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप याकडे नीट लक्ष दिल्यास पाळीशी निगडीत समस्या दूर राहण्यास मदत होते.
वंध्यत्व, काही प्रकारचे कर्करोग यांसारख्या समस्या भविष्यात उद्भवू नयेत यासाठी पाळी अनियमित असेल किंवा चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढत असतील तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. नाहीतर भविष्यात ही समस्या गंभीर रुप धारण करु शकते. पाळी येण्याच्या गोळ्या म्हणजेच शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन करणाऱ्या गोळ्या असल्याने पाळी नियमित होण्यासाठी या गोळ्यांचा वापर केला जातो. अनेकदा गोळ्या सुरु असेपर्यंत ही समस्या नियंत्रणात राहते. पण गोळ्या बंद केल्या की पुन्हा पाळी अनियमित होते. त्यामुळे गोळ्या घेऊन पाळीचे नियमन करण्यापेक्षा जीवनशैलीमध्ये बदल करणे आणि नैसर्गिकरित्या पाळी येण्यासाठी प्रयत्न करणे केव्हाही अधिक फायदेशीर असते. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार घेणे केव्हाही अधिक फायदेशीर असते.