डॉ. शंतनू अभ्यंकर
आय.व्ही.एफ. म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे शरीराबाहेर फलन घडवून, तयार गर्भ, गर्भपिशवीत सोडायचा असे उपचार. असाच एक शब्द आहे, ए.आर.टी. हे ए.आर.टी. म्हणजे असिस्टेड रीप्रॉडक्टिव्ह टेक्निक्स. हा जास्त व्यापक अर्थाने वापरला जातो. पण, उगीच शब्दच्छल कशाला, इथे बोली भाषेतला ‘टेस्ट ट्युब बेबी’ हा शब्द पुरेसा आहे आणि पुरेसा बोलकाही आहे. गंमत म्हणजे, जरी अनेक सेंटरच्या लोगोमध्ये टेस्ट ट्युबमधून रांगत येणारं बाळ दाखवलेलं असलं तरी टेस्ट ट्युब बेबीच्या प्रक्रियेत प्रत्यक्षात टेस्ट ट्युब कुठेच वापरली जात नाही! टेस्ट ट्युब इथे प्रतीकमात्र आहे विज्ञान, तंत्रज्ञान, प्रयोगशाळा या साऱ्याचं. टेस्ट ट्युब बेबी करा, असं सांगितलं की पेशंटच्या मनात पहिला विचार येतो, ‘बापरे, टेस्ट ट्युब बेबी करून पाहण्यापेक्षा हा डॉक्टरच बदलून पाहू!’ बरेचदा यामागील अवाढव्य खर्च, त्यातील अनिश्चितता भंडावत असते. टेस्ट ट्युब बेबी करणे अवघड खरेच. डॉक्टर लोकांत एक म्हण आहे, ‘इट इज मोअर ऑफ मॅजिक दॅन लॉजिक’.
डॉक्टरसारखीच पेशंटलाही यासाठी प्रचंड आर्थिक, शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक करावी लागते. खूप काही सोसावं लागतं. इतकं करून सारं काही गोड गोड घडेल असं नाही. तेंव्हा अपयश, हताशा, नैराश्य झेलण्याची ताकद असावी लागते. कुटुंबीयांची भरभक्कम साथ असावी लागते. हे सगळं जुळवण्यास वेळ लागतो.
या जुळवाजुळवीत पेशंटकडून घडणारी घोडचूक म्हणजे निर्णय उशिरा घेणे. जितके वय वाढेल तितके यश मिळण्याची शक्यता कमी कमी होत जाते. पस्तिशीच्या पुढे तर गर्भसंभवाची शक्यता निम्म्याने घटते.
प्रत्येक स्त्रीत, ती गर्भावस्थेत असतानाच, काही कोटी स्त्रीबीजे तयार होतात आणि नंतर लगेचच त्यातील काही वाळायला सुरुवात होते. ही क्रिया आयुष्यभर चालू राहाते. त्या मुलीचा जन्म होतो, ती लहानाची मोठी होते, तिला पाळी येते. तिच्या पुनरुत्पादक वयापावेतो उरलेल्या ३००,००० बिजांपैकी सुमारे ४०० बीजे प्रत्यक्षात वापरण्यायोग्य अशी पिकतात. यातील काहींचे फलन होते आणि मुले होतात. बाकीची वाळत राहतात. ठरावीक वयानंतर बीजे संपतात आणि पाळी जाते.
या वाळण्यात आणि वाढण्यातही काही संगती आहे. उत्तमोत्तम बीजे असतात ती विशी-तिशीच्या दरम्यान वाढतात. नंतर उरतो तो कमअस्सल माल. त्यामुळे उशिरा दिवस राहिले, मग ते नैसर्गिकरीत्या असोत वा टेस्ट ट्युब बेबी तंत्राने, त्यात लोच्या होण्याची शक्यता बरीच असते. या उरल्यासुरल्या बीजांमध्ये सदोष गुणसूत्रे फार. इथे बीज-विभाजन होताना समसमान वाटा होत नाही आणि असमान वाटणी सुदृढ बीजास धार्जिणी नाही. म्हणून अशी बीजे जनुकीय दोष बाळगून असतात. त्यामुळे मुळात राहायलाच वेळ लागणे, गर्भपात होणे, सव्यंग संतती होणे असले प्रकार फार. म्हणूनच वेळेत निर्णय महत्त्वाचा.
पण, आजकाल अनेक कारणाने लग्नच उशिरा होतात, पुढे जोडपी जननोत्सुक व्हायला आणखी वेळ घेतात आणि मग ह्या स्टेशनवर गाडी पोहोचायला वेळ लागतोच.
अशावेळी बीजांचा शिल्लक स्टॉक किती आहे हे सांगणारी, रक्तातील ए.एम.एच. नामेकरून एक तपासणी केली जाते. मासिक पाळीच्या चक्रानुसार या ए.एम.एच.मध्ये बदल होत नाहीत. त्यामुळे महिन्याच्या कोणत्याही दिवशी ही तपासणी करता येते. अगदी गर्भनिरोधक गोळ्या चालू असतील तरीही करता येते. अर्थात ही तपासणी म्हणजे मूल होईल की नाही हे सांगणारी भविष्यवाणी नव्हे. उरलेल्या बीजांची प्रत अथवा जनुकीय पत वगैरे यातून कळत नाही. मात्र उपचाराला कितपत प्रतिसाद मिळेल, किती घाई करायला हवी, हे सांगणारी एक दिशादर्शक तपासणी आहे.
याउलट पुरुषांच्या बीजसंख्येत अथवा गुणवत्तेत पंचेचाळीशीनंतर अगदी जेमतेम फरक पडतो.
टेस्ट ट्युब बेबी म्हणजे काही जादू नाही. दर वेळी यश मिळेलच असे नाही. यशपयशाच्या हिंदोळ्यावर आपला तोल कसा सावरायचा ते पुढील भागात पाहू या.
(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com