Lokmat Sakhi >Health > गरोदरपणातल्या टेस्टमध्ये बाळाला 'डाऊन सिंड्रोम' आहे की नाही हे शंभर टक्के समजते का?

गरोदरपणातल्या टेस्टमध्ये बाळाला 'डाऊन सिंड्रोम' आहे की नाही हे शंभर टक्के समजते का?

गरोदरपणात डबल, ट्रिपल वा क्वाड्रुपल मार्कर टेस्ट करायच्या की नाही, करायलाच हव्यात का? या प्रश्नांची ही उत्तरं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 12:23 PM2021-07-07T12:23:09+5:302021-07-07T12:26:22+5:30

गरोदरपणात डबल, ट्रिपल वा क्वाड्रुपल मार्कर टेस्ट करायच्या की नाही, करायलाच हव्यात का? या प्रश्नांची ही उत्तरं..

testing for down syndrome during pregnancy? | गरोदरपणातल्या टेस्टमध्ये बाळाला 'डाऊन सिंड्रोम' आहे की नाही हे शंभर टक्के समजते का?

गरोदरपणातल्या टेस्टमध्ये बाळाला 'डाऊन सिंड्रोम' आहे की नाही हे शंभर टक्के समजते का?

Highlightsटेस्ट कराव्यात की नाही हा निर्णय डॉक्टरांशी चर्चा करून प्रत्येकीनी स्वतःच्या जबाबदारीवर, घ्यायचा आहे.

- डॉ. शंतनू अभ्यंकर

डबल, ट्रिपल वा क्वाड्रुपल मार्करचा रिपोर्ट हा शक्याशक्यतेच्या भाषेत येतो. असला ‘नरो वा कुंजरो वा’ रिपोर्ट आला की, पुढे नर का? कुंजर हे ठरवणं आलं. पण, नर का? कुंजर हे ठरवणं खर्चीक असतं. जरा धोक्याचंही असतं. म्हणून मग अधिक नेमक्या आणि महाग चाचणीची (Confirmatory test) गरज आहे का, हे सांगणारी अशी ‘चाचपणी’ (Screening Test) आधी केली जाते. ह्या चाचपणीत ज्यांना अवाजवी धोका असल्याचं लक्षात येतं अशांसाठी पुढील तपासणी केली जाते. ह्या चाचपणीतून बाळातील काही जनुकीय आजार आणि काही शारीरिक दोषांबद्दल इशारा मिळतो. बाळ सुपोषित असेल का? आईचे बीपी पुढे वाढेल का? अशा काही भविष्यातील धोक्यांचे इशारे मिळतात.
बाळाचा मणका उघडा असणे, डाऊन्स सिंड्रोम (एक प्रकारचे मतिमंदत्व) वगैरेच्या ९० ते ९५ % केसेस यातून ओळखता येतात. अल्फाफीटोप्रोटीन, इस्ट्रीओल, एचसीजी आणि इनहीबिन ए अशा भारदस्त नावाचे पदार्थ यात तपासले जातात. बाळ आणि वार याद्वारे निर्माण होणारी ही द्रव्ये, बाळाच्या आणि वारेच्या तब्येतीबद्दल आपल्याला काही सुचवू शकतात. उदाहरणार्थ अल्फाफीटोप्रोटीन अपेक्षेपेक्षा जास्त असेल तर बाळाचा मणका उघडा असण्याची शक्यता जास्त. अल्फाफीटोप्रोटीन कमी असेल तर बाळाला डाऊन्स सिंड्रोम असण्याची शक्यता जास्त. ह्याच सोबत इस्ट्रीओल कमी, पण एचसीजी आणि इनहीबिन ए वाढलेले, असा डाव पडला तर डाऊन्स सिंड्रोमची शक्यता आणखी जास्त.

जर रिपोर्ट नॉर्मल/निगेटिव्ह आला तर त्याचा अर्थ बाळाला आजार असण्याची शक्यता इतकी कमी आहे की अधिक तपासण्या करण्याची गरज नाही. ही शक्यता शून्य मात्र नाही. रिपोर्ट पॉझिटिव्ह, म्हणजे आजाराची ‘अवाजवी’ शक्यता दर्शवणारा आला तर अधिक तपासण्या करून आजार खरोखरच आहे की नाही याची खात्री करून घेणे उत्तम. या अधिकच्या तपासण्या म्हणजे, वर म्हटल्याप्रमाणे, गर्भजलपरीक्षा किंवा वारेचा तुकडा तपासणे (कोरिऑन व्हिलस सॅमप्लिंग). शंभरातल्या पाच एक जणींना अशा तपासण्या कराव्या लागतात आणि त्यातल्या एखाददुसरीच्याच बाळाचा मणका दुभंगलेला अथवा डाऊन्स निघतो.
आता दोन-तीन हजार रुपयांना पडणारा हा तपासणीचा खेळ खेळायचा का? ते तपासणे, रिपोर्टची वाट पाहणे, तो हातात पडल्यावरही विशेष उलगडा होणे, पुन्हा पुढील तपासण्या कराव्या लागणे, त्यांच्या रिपोर्टची वाट पाहणे.. हे सगळं सगळं खूप मानसिक द्वंद्व निर्माण करणारं असतं. ज्यांना परवडतं त्यांच्या दृष्टीनी उत्तर जरा सोप्पं असतं. ज्याना हे सारं आर्थिकदृष्ट्या तापदायक असतं, त्यांना कुठून या फंदात पडलो असंही वाटू शकतं. पण, शेवटी हा जिचा तिचा प्रश्न.
पस्तीशीच्या पुढे वय असेल, आधीची संतती सदोष असेल किंवा डायबेटीस असेल तर अशी तपासणी नक्की करावी. परवडत असेल तर वरील काही नसतानाही अशी तपासणी जरूर करावी.
कारण शेवटी पोरं होणार दोन नाही तर तीन; ती जितकी सुदृढ तितके चांगलेच की. पण, पेशंटची मानसिकता अशी नसते. रिपोर्ट नॉर्मल आला तर मुळात अनावश्यक टेस्ट करायला लावली, आम्हाला उगीचच घाबरवलं, असा आरोप केला जातो. टेस्ट केली नाही आणि काही बिघडलं तर गुगलज्ञानमंडित पंडित, टेस्ट का टाळली, असा सवाल करतात. डॉक्टरही बुचकळ्यात पडलेले असतात. समृद्ध समाजात या टेस्ट सर्रास केल्या जातात.
प्रश्न आपण पामरांनी त्यांच्या किती कच्छपी लागायचं हा आहे. म्हणूनच अशा टेस्ट कराव्यात की नाही हा निर्णय डॉक्टरांशी चर्चा करून प्रत्येकीनी स्वतःच्या जबाबदारीवर, घ्यायचा आहे. हा माहितीपर लेख म्हणजे ही जबाबदारी समजावून सांगण्याचा एक प्रयत्न आहे. हा लेख आता तुम्ही वाचला आहे, आता तुम्ही डॉक्टरांशी बोला आणि ठरवा.

(लेखक स्त्री आरोग्यतज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com

Web Title: testing for down syndrome during pregnancy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.