रात्रीची शांत झोप लागणं ही एकप्रकारची देणगीच असते. ती सगळ्यांना सहजासहजी येतेच असं नाही. अनेकांना कोणत्याही वेळेला, कोणत्याही ठिकाणी पडलं तरी झोप लागते. पण काही जणांना मात्र कित्येक तास या कुशीवरुन त्या कुशीवर होत राहिलं तरी काही केल्या झोप येत नाही. झोपण्यासाठी पाठ टेकली की डोक्यात विचारांचं काहूर माजतं आणि मग डोक्यात येणारे असंख्य विचार व्यक्तीला भंडावून सोडतात. हे विचारांचं चक्र एकामागे एक चालूच राहते. मग झोप येणं तर लांबच पण डोकं शांत करण्यासाठीही प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. हे विचार एकदा यायला सुरुवात झाली की प्रचंड प्रयत्न करुनही ते काही केल्या थांबत नाहीत आणि उलट जास्तच वाढतात (Unable To Sleep Easily, 3 Easy Remedies).
मग कधी आपण हे विचार थांबण्यासाठी देवाची स्तोत्र म्हणतो तर कधी एखादा जप करतो. कधी श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो तर कधी कूस बदलून पाहतो. कित्येक जण तर झोप यावी म्हणून मोबाइल पाहत राहतात. पण तरीही झोप येत नसेल तर काय करावं याविषयी आज आपण पाहणार आहोत. कारण झोप पूर्ण झाली नाही तर पुढचा पूर्ण दिवस खराब जातो आणि मग त्याचा नकळत मानसिक-शारीरिक तब्येतीवर परीणाम होतो. प्रसिद्ध योग अभ्यासक स्मृती यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याविषयी माहिती दिली आहे. पाहूया हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा...
१. ओमकार हा अतिशय सोपा आणि सगळ्यांना सहज जमणारा प्रकार आहे. रात्री झोपण्याच्या आधी किमान ११ वेळा ओमकार म्हणावा. ओमकार म्हटल्याने मन आपोआप शांत होते आणि झोप लागण्यास त्याची चांगली मदत होते.
२. भ्रामरी हा प्राणायमातील आणखी एक महत्त्वाचा प्रकार असून झोपण्याच्या आधी आपल्या झोपायच्या जागेवरच पाठीवर आडवे पडावे. दोन्ही कानाचे पडदे बोटांनी बंद करुन भ्रामरी प्राणायाम करावे.
३. याबरोबरच शांत, गाढ झोप लागावी यासाठी निद्रा जप करणेही अतिशय आवश्यक आहे. “शुद्धे शुद्धे महायोगिनी महानिद्रे स्वाहा” हा जप झोपताना आवर्जून करावा. त्यामुळे तुम्हाला असलेला ताण कमी होण्यास मदत होईल. डोक्यातले विचार थांबण्यासही याचा चांगला उपयोग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचे झोप लागण्यासाठी हा जप अतिशय उपयुक्त ठरतो.