गोड पदार्थ हा अनेकांचा विक पॉईंट असतो. काहींना तर प्रत्येक जेवणात, जाता-येता गोड खायला लागतं. तुम्हीही त्यातलेच असाल आणि तुम्हालाही सारखं गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण गोड खाल्ल्याने आपल्याला त्या वेळापुरते एकदम छान-फ्रेश वाटते. विशेष म्हणजे एकदा गोड खाल्लं की अजून अजून गोड खाण्याची इच्छा होत राहते. अशावेळी आपला स्वत:वर ताबा राहत नाही आणि गोडावर आडवा हात मारला जातो (What are 5 easy ways to limit sugar intake).
गणपती, नवरात्री, दिवाळी यांसारख्या सणावाराच्या दिवसांत तर सतत गोड सुरूच असते. गोडामुळे वजन वाढते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. त्यामुळे सतत गोड खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते. पण गोडाचा पदार्थ पाहिल्यावर स्वत:वर कंट्रोल कसा ठेवायचा हा आपल्यापुढील मुख्य प्रश्न असतो. हा कंट्रोल ठेवणे अवघड असले तरी अशक्य नक्कीच नसते. त्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात घेतल्या तर काम सोपे होते. यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...
१. विकतच्या पदार्थांची लेबल वाचा
आपण बाजारातून जे पॅकेट फूड आणतो त्यावरची लेबल आवर्जून वाचायला हवीत. कारण या पदार्थांमध्ये कमी-अधिक प्रमाणात साखर असतेच. या पदार्थांना पर्यायी कमी साखर असलेले किंवा शुगर फ्री पर्याय शोधायला हवेत.
२. पेय घेताना काळजी घ्या
उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा आपण थंडगार पेय घेतो. या पेयांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त साखर असते. त्यापेक्षा साधे पाणी, ताक, सोलकढी यांसारखे पारंपरिक पर्याय केव्हाही जास्त चांगले. विकतच्या फळांच्या ज्यूसमध्येही जास्त प्रमाणात साखर असते, ते टाळायला हवेत.
३. नैसर्गिक गोडवा देणाऱ्या पदार्थांचा वापर
काहीवेळा आपल्याला गोड पदार्थ करताना मध, खजूर, खारीक पूड यांसारखे नैसर्गिक गोडवा असलेला घटक वापरणे शक्य असते. त्यामुळे शक्य त्या ठिकाणी साखर-गूळ न वापरता हे पर्याय वापरा त्यामुळे नकळत शरीरात जाणाऱ्या गोडावर नियंत्रण येईल.
४. फ्रूट ज्यूस
फ्रूट ज्यूस करताना त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर वापरली जाते. त्यामुळे ज्यूस घेण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे केव्हाही जास्त चांगले. फळांचा ज्यूस केल्याने त्यातील फायबर वाया जाते. तसेच फळांमध्ये जी नैसर्गिक साखर असते ती रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असते.
५. पोषक आहार घ्या
आपला नियमित आहार पोषक असेल तर आपोआपच आपल्याला गोड खाण्याची इच्छा होणार नाही. म्हणूनच आहारात प्रोटीन्स, हेल्दी फॅटस आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस यांचे प्रमाण चांगले असावे. यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि शरीराची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.