Lokmat Sakhi >Health > कमी दिवसांची कच्ची बच्ची.. प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी होण्याची कारणं काय?ती टाळता येतात का?

कमी दिवसांची कच्ची बच्ची.. प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी होण्याची कारणं काय?ती टाळता येतात का?

प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण ते का होतं, मुदतपूर्व प्रसूती टाळता येते का? त्याची लक्षणं काय, उपाय कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 01:12 PM2021-07-14T13:12:14+5:302021-07-14T13:37:02+5:30

प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण ते का होतं, मुदतपूर्व प्रसूती टाळता येते का? त्याची लक्षणं काय, उपाय कोणते?

What is the reason for premature birth? symptoms and causes, Can it be avoided? | कमी दिवसांची कच्ची बच्ची.. प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी होण्याची कारणं काय?ती टाळता येतात का?

कमी दिवसांची कच्ची बच्ची.. प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी होण्याची कारणं काय?ती टाळता येतात का?

Highlightsमाझ्या मनोनिग्रहाने, माझ्या मनःशक्तीने निव्वळ डाएट करून, निव्वळ व्यायाम करून, निव्वळ योगासनांनी ब्लडप्रेशर आणि/किंवा डायबिटीस आणि/किंवा थायरॉईड वगैरे आटोक्यात आणून दाखवतेच,’ असली भीष्मप्रतिज्ञा करू नका.(छायाचित्रं सौजन्य-गुगल)

डॉ. शंतनू अभ्यंकर

अकाली मृत्यू इतकाच अकाली जन्मदेखील अपार दु:ख आणि अनिश्चितता घेऊन येतो. या अशक्त चिमण्या बाळांचे सगळेच अवयव कच्चे असतात. बाळ कमी दिवसांचं असलं, की पुढे बरेच दिवस त्याचं काय काय करावं लागतं. त्याला ताबडतोबीनी जसा काही ना काही धोका असतो, तसा तो पुढील आयुष्यातही असतो. जवळपास १० ते १५ % बाळं कमी दिवसांची निपजतात. कमी दिवसांची म्हणजे सदतीस आठवड्यांच्या आतली. डिलिव्हरीची तारीख दिलेली असते ती, शेवटच्या पाळीपासून चाळीस आठवडे मोजून. सदतीस आठवड्याला बहुतेक बाळांची, बहुतेक वाढ पूर्ण होते. फुप्फुसे पिकायला तर सदतीस आठवडे पूर्ण होणे अत्यंत गरजेचे. त्यामुळे सदतीसच्या आतली ती सगळी, अकाली जन्मलेली, प्री-मॅच्युअर, ‘कच्ची बच्ची’ अशी व्याख्या आहे. इतकी सारी प्रगती आणि इतके सारे संशोधन होऊनही प्रसूती कळांची सुरुवात कशी होते? आणि ती पूर्ण दिवस भरल्यावरच का होते? ही कोडी सुटलेली नाहीत. कळारंभ अजून निर्गुणच आहे. अकाल प्रसूती घडण्याची शक्यता वर्तवणारी काही कारणे ज्ञात आहेत. बस्स, इतकंच.

(छायाचित्रं सौजन्य -गुगल)

अकाल प्रसूती होणार असल्याची लक्षणंही गोलमाल आहेत. गोलमाल अशासाठी की ही सगळी लक्षणं गरोदरपणात बहुतेक सर्व स्त्रियांमधे कमी-अधिक प्रमाणात उद्भवतच असतात. अंगावरून चिकट/पांढरा/लाल स्राव जाणे, खाली जड जड वाटणे, सतत पाठ/कंबर दुखणे, पोटात कळा येणे किंवा पोट न दुखता नुसतेच कड लागणे अशी सगळी भयसूचक लक्षणे आहेत. पण, निव्वळ लक्षणांवरून अंदाज करणं हे खूप-खूप अवघड असतं. म्हणूनच मग इतर कुठल्यातरी उपयुक्त तपासणीचा शोध काही दशके, खरंतर काही शतके चालू आहे. पण, अजून तरी काही विशेष हाती आलेलं नाही. सोनोग्राफी करून गर्भपिशवीचे तोंड आखूड झालंय का हे तपासता येतं. काही अंदाज बांधता येतो. पण, आज मूग गिळून मिटलेलं तोंड, हे पुढे काही दिवसांनी आ वासेल का, हा प्रश्न अजूनही आ वासून उभा आहे. अकाल प्रसूतीसाठी जोखमीचे घटक तेवढे आपल्याला माहीत आहेत. पहिल्या वेळी जर कमी दिवसाची प्रसूती झाली असेल तर अधिक सावध असायला हवं. कारण आधीची अकाल प्रसूती, ही आताही तसेच होऊ शकेल, याची निदर्शक आहे. जुळी, तिळी वगैरे असतील तर गर्भपिशवीच्या तोंडावर इतका ताण येतो की पूर्ण दिवस भरण्याची शक्यता दुरावते. काही महिलांमध्ये गर्भपिशवीला मध्ये पडदा असतो किंवा गर्भपिशवी तयार होताना दोन भागांत तयार झालेली असते. असे काही जन्मजात रचना-दोष असतील तरीदेखील दिवस पूर्ण जाण्याऐवजी कमी दिवसाची प्रसूती होते. एखादी स्त्री अतिशय काटकुळी असेल किंवा खूप जाडगुली असेल; तिचा स्वतःचा जन्म कमी दिवसाचा असेल किंवा रक्ताच्या नात्यातील स्त्रियांना कमी दिवसाची प्रसूती झाली असेल; तर हेदेखील सगळे धोक्याचे इशारे आहेत.
पाठोपाठ बाळंतपणेही वाईट. सरकारने जागोजागी पाट्या लावल्याप्रमाणे, ‘दुसरे मूल केव्हा? पहिले शाळेत जाईल तेव्हा!’ हेच खरं. आईमधील काही आजारसुद्धा कमी दिवसाची प्रसूती सोबतीला घेऊन येतात. डायबेटीस, बाळंतवात (Pregnancy Induced Hypertension), वारंवार होणारे गुप्तरोग, लघवीचे इन्फेक्शन वगैरेंमुळे कमी दिवसाच्या प्रसूतीची शक्यता वाढते. गरोदरपणामध्ये यकृतामध्ये कधीकधी पित्त साठून राहते (Intrahepatic Cholestasis Of Pregnancy), कधीकधी रक्ताच्या गुठळ्या बनतात, अशा स्त्रियांना किंवा बाळाचं वजन पुरेसं वाढत नसणाऱ्या स्त्रिया, मधूनच अंगावरून थोडा थोडा रक्तस्राव होणाऱ्या स्त्रियांनादेखील ही जोखीम आहे. काही महिलांमध्ये दिवस भरण्यापूर्वीच पाणमोट फुटते. अशा परिस्थितीमध्येदेखील कमी दिवसांची प्रसूती जवळपास अटळ आहे. बाळामध्ये काही व्यंग असेल तर बरेचदा कमी दिवसांची प्रसूती होते. ताण-तणाव, प्रदूषण हे नेहमीचे व्हिलन आहेतच. नवोढा आणि प्रौढा (अठराच्या आत आणि पस्तिशीच्या पुढे) अशा टोकाच्या वयातील स्त्रियांमध्ये कमी दिवसांच्या प्रसूतीची शक्यता वाढते. गरीब, वंचित, कोणत्याही वैद्यकीय सेवेपर्यंत न पोहोचलेल्या स्त्रियाही जोखमीच्या गटात येतात. याशिवाय घरात होणारी मारहाण आणि भावनिक कुचंबणा हेही घटक लक्षात घ्यायला हवेत. वरीलपैकी काही घटक टाळता येण्यासारखे आहेत, काही नाहीत.
इतकं सगळं करूनही जर कमी दिवसांच्या कळा यायला लागल्या तर काय करायचं त्याविषयी पुढील भागात...

(छायाचित्रं सौजन्य -गुगल)

 

कमी दिवसांची प्रसूती टाळण्यासाठी काय करावं वा करू नये?

1. दिवस राहण्यापूर्वी आपलं वजन प्रमाणात आहे ना हे पाहावं.
2. तंबाखू, मशेरी, दारू आणि अमलीपदार्थ यांपासून चारच काय चांगलं आठ हात लांब राहावं आणि नवऱ्यालाही तसंच करायला भाग पाडावं. नवऱ्याने ओढलेल्या विडी-सिगरेटचा धूर खाल्यानेदेखील आई-गर्भाला इजा होत असते. आईच्या दारूचा तर गर्भावर थेट परिणाम होतो. नवऱ्याच्या दारूचा जरी बाळावर थेट परिणाम होत नसला तरी अप्रत्यक्ष परिणाम बाळाला भोगावेच लागतात. व्यसनांनी जर्जर झालेल्या बापापेक्षा सुदृढ बाप असेल तर बाळाचं शैशव सुखात जाईल, नाही का?
3. ब्लडप्रेशर, डायबिटीस, थायरॉईडचे विकार असे आजार असतील तर त्यावर मनोभावे उपचार घ्या आणि ते डॉक्टरी सल्ल्यानुसार चालू ठेवा. ‘डॉक्टरांनी औषधांची आवश्यकता आहे, असं सांगितलंय; पण मी लई भारी! मी माझ्या निश्चयाच्या बळावर, माझ्या मनोनिग्रहाने, माझ्या मनःशक्तीने निव्वळ डाएट करून, निव्वळ व्यायाम करून, निव्वळ योगासनांनी ब्लडप्रेशर आणि/किंवा डायबिटीस आणि/किंवा थायरॉईड वगैरे आटोक्यात आणून दाखवतेच,’ असली भीष्मप्रतिज्ञा करू नका.
4. डॉक्टरांशी बोलून आवश्यक त्या लसी आधीच घेऊन टाका. रूबेला, स्वाइन फ्लू, बी प्रकारची कावीळ अशा लसी दिवस राहण्यापूर्वी घेतलेल्या चांगल्या.

(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com

Web Title: What is the reason for premature birth? symptoms and causes, Can it be avoided?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.