मनाली बागुल
अनेक महिला नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी नैसर्गिक उपाय वापरण्याचा प्रयत्न करतात. त्यातील एक म्हणजे शरीर संबंधानंतर अनेक महिला मुत्र विसर्जन करतात. त्यांना असं वाटतं की लघवी केल्यानंतर नको असलेली गर्भधारणा टाळता येऊ शकते. याउलट प्रेग्नेंसीसाठी प्लॅनिंग करत असलेल्या महिला इंटरकोर्सनंतर लघवीला जात नाहीत.
दरम्यान काहीवेळा स्त्रीरोग तज्ज्ञांकडून इन्फेक्शनपासून बचावासाठी लघवी करण्याचा सल्ला दिला जातो. प्रेग्नेंसी टाळण्यासाठी सेक्सनंतर लघवी करणं कितपत योग्य ठरतं? योनीतून स्पर्म बाहेर पडल्यानंतरही तुम्ही प्रेग्नेंट होऊ शकता का? याबाबत स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर यांनी लोकमतशी बोलताना अधिक माहिती दिली आहे.
संबंधानंतर लघवी केल्यानंतर प्रेग्नेसी टाळता येऊ शकते हा समज कितपत योग्य?
डॉ करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लघवी करणं आणि सेक्शुअल इंटरकोर्स होणं हे दोन वेगळ्या शरीराच्या कार्यप्रणाली आहेत. साधारणपणे महिलांच्या योनीची रचना पाहिली तर दिसून येईल. सगळ्यात वर मुत्र बाहेर येण्यासाठी छोटंस छिद्र असतं. त्याखाली मासिक पाळीची लहानशी जागा असते. त्याला व्हजायनल आऊटलेट असंही म्हणतात. त्यानंतर त्वचेचा भाग (perineal body) मग शेवटी शौचाची जागा असते. हे तिन्ही पार्ट्स वेगवेगळे कार्य करतात. लघवीचे छिद्र एका युरिनच्या बॅगेला जोडलेले असते. या बॅगेतून दोन नळ्या येतात ज्याला युरेटर म्हणतात.
या दोन नळ्या किडनीशी कनेक्टेट असतात, ही एक वेगळी स्वतंत्र रचना आहे. याऊलट जिथे सेक्सुअल संपर्क होतो म्हणजेच योनी मार्गाचे छिद्र आत गर्भपिशवी आणि गर्भाशयाशी जोडलेले असते. सामान्यतः शरीर संबंध हे योनीमार्गात होतात याद्वारे बाहेर येणारे स्पर्म योनी मार्गात शिरतात. त्यानंतर ते गर्भाशयाच्या मुखाकडे प्रवास करतात.
वीर्य योनीमार्गात गेल्यानंतर व्यक्तीच्या बॉडी टेम्परेचरच्या संपर्कात येतं. त्यावेळी त्या वीर्याचे लिक्विफॅक्शन होते. त्यानंतर स्त्री बीज तयार होण्याचा दिवस असल्यास शुक्राणू त्याला मिळतात. मग एम्ब्रियो म्हणजेच गर्भ तयार होऊ शकतो. अर्थातच संबंधानंतर लघवी करणं आणि प्रेग्नंसी टाळण्याचा काही संबंध नाही. कारण लघवी करण्याची जागा आणि योनी यांचे मार्ग ( Track) वेगवेगळे असतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.
लघवीला गेल्यानंतर सेमीनल फ्लूईल म्हणजेच पातळ द्रवपदार्थ बाहेर येऊ शकतात पण शुक्राणू बाहेर पडतातच असं नाही. अनेकदा तरल पदार्थ बाहेर येण्याआधीच शुकाणू गर्भाशयाकडे गेलेले असू शकतात. त्यामुळे शरीर संबंधानंतर लघवी केल्यानंतर प्रेग्नंसी टाळता येईल, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरतं.
इन्फेक्शनचा धोका असतो का?
शारीरिक संबंधानंतर युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं नाही, तर ज्यांना आधीपासूनच इन्फेक्शन असतं त्याचं इन्फेक्शन वाढू शकतं. पार्टनरला जर इन्फेक्शन असेल तर एकमेकांना होण्याची शक्यता असते. व्यवस्थित स्वच्छता ठेवली नाही तर युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. यावर उपाय म्हणून कधीही त्वचा डिहाड्रेट होऊ देऊ नका. इन्फेक्शन जर सुरूवातीच्या स्टेजला असेल तर पाण्याच्या वापरानं तीव्रता कमी होऊ शकते. संबंधानंतर लगेचच लघवीला जायलाच हवं असं काही नाही.
अशी घ्या काळजी
शरीराच्या नाजूक भागांची नेहमीच स्वच्छा ठेवायला हवी.
साबण आणि पाण्यानं किंवा टिश्यूनं गुप्तांग स्वच्छ करावेत.
योनी मार्ग, मुत्राशय नेहमीच पुढून मागे स्वच्छ करायला हवेत
मेडिकेटेट उत्पादनांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. अन्यथा पीएच संतुलन बिघडण्याची शक्यता असते.