ओजस सु. वि.
काही सरळ, साध्या, सोप्या गोष्टी आपण उगाचच अवघड करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे जे आपसूकच साध्य व्हायला पाहिजे ते अप्राप्त ध्येय होऊन बसते! आता आईने तान्ह्या बाळाला योग्यवेळी, पोटभर, बाळ पुरेसे मोठे होईपर्यंत दूध पाजणे - किती सहज, नैसर्गिक गोष्ट आहे. सगळ्या सस्तन प्राण्यांच्या माद्यांना आपसूकच ही गोष्ट माहिती असते, माणूस वगळता! बाळाला जन्मल्यावर एका तासाच्या आत आईच्या स्तनावर लावायचं म्हणजे ते नैसर्गिक उर्मीने चोखू लागते. बाळाला किमान सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध पाजावे. किमान दोन वर्षांपर्यंत स्तनपान चालू ठेवावे. आईचं दूध हा बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे, या गोष्टी सर्वांना माहिती असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन अशा सर्वांनी वारंवार विविध माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या असतात. तरीही सुयोग्य स्तनपान साध्य का होत नाही बरं? भारतीय संस्कृती तर मातृत्व या संकल्पनेला फार महत्त्व देणारी आहे. स्तनपान हा आई आणि बाळाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. बाळाचं आरोग्य ठणठणीत राहील, वाढ चोख होईल, याची खात्री देणारी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या देशात तर स्तनपानाची आकडेवारी उत्तमच असायला हवी.
(Image : google)
२०२१ च्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार भारतात - जन्मल्यानंतर पहिल्या तासात (गोल्डन अवरमध्ये) बाळाला स्तनपान देण्याचं प्रमाण केवळ ४१.६ टक्के आहे. सहा महिने केवळ आईचे दूधच बाळाला द्यावे, असे परिमाण असताना त्याचे प्रमाण केवळ ५५ टक्के आहे. म्हणजे बाकीच्या ४५ टक्के बाळांना आईच्या दुधासोबत किंवा दुधाखेरीज अन्य काहीतरी दिले जाते. परिणामी ३८ टक्के बाळांची वाढ खुंटली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार सहा महिने स्तनपानाचे देशातील प्रमाण किमान ७० टक्के असायला हवे. म्हणजे आपल्याला अजून किती मजल गाठायची आहे!
इतकी सहज सोपी गोष्ट साध्य का होत नाहीये?
नक्की कुठे आपण कमी पडतोय? आता इथे ‘आपण’ का म्हटलं? स्तनपान तर आई आणि बाळाचा प्रश्न आहे ना? इथेच तर गडबड होतेय ! स्तनपान हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे. बाळांचं शारीरिक आरोग्य चांगलं राहावं, आईचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं व त्यातूनच पुढचा सुदृढ, निरोगी, मानसिकदृष्ट्या शांतीपूर्ण समाज निर्माण होत राहणार, यासाठी सुयोग्य स्तनपानाला पर्याय नाही. पण स्तनपान करताना आईचं स्वतःचं शारीरिक, मानसिक आरोग्य बिघडलेलं असेल; तिच्यावर गृह कलहांपासून ते लवकरात लवकर करिअरमध्ये परतण्याचे ताण असतील; घरात-घराबाहेर स्तनपान करण्याची मोकळीक नसेल, अनेक निर्बंध असतील तर स्तनपान करण्यात खूप साऱ्या अडचणी येतात. त्यांना कंटाळून, अवघडून, कधी चुकीचे सल्ले मिळाले म्हणून नवमाता दूध पाजणे लवकर सोडून देतात. स्तनपानाऐवजी फॉर्म्युला किंवा पावडरचे दूध द्यायला सुरुवात करतात. बाळाची पचनशक्ती तयार व्हायच्या आधीच वरचा आहार द्यायला लागतात. त्याचा बाळांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. परिणामतः भारतात इनफंट फॉर्म्युल्याचे मार्केट ५.४ अमेरिकन डॉलर्स इतके आहे ! फॉर्म्युला किंवा पावडरच्या दुधाचे असंख्य दुष्परिणाम मुलांमध्ये दिसतात. आईचं खास बाळासाठी बनत असलेलं टेलर मेड दूध तर चक्क फुकट असतं ! मग त्याला प्रोत्साहन का दिलं जात नाही ?
(Image : google)
स्तनपान सुरळीत न होण्याची कारणे
१. आईचं दूध बाळाला पुरेल का ? याविषयी अविश्वास ! हा घरच्यांकडून जास्त दर्शविला जातो. आईचाही आत्मविश्वास यामुळे ढासळतो.
२. बाळ रडतंय म्हणजे दूध पुरत नाहीये हा गैरसमज ! बाळ वेगवेगळ्या कारणांसाठी रडत असतं. कधी आई हवी म्हणून, कधी गॅसेस झाले म्हणून, कधी नुसतं कुशीत झोपायचं म्हणून!
३. हॉस्पिटलमध्ये पहिल्या दिवसापासून सर्रास दिला जाणारा फॉर्म्युला ! याची बहुतेक बाळांना काहीच गरज नसते. आईचं दूध पुरेसं असतं, बाळाची तहान भूक त्याने भागणार असते.
४. स्तनपान करताना स्तन दुखावतात, कधी त्यातून रक्त येतं, कधी त्यात जंतूसंसर्ग होऊ शकतो. यामुळे स्तनपान करणं अवघड जातं.
५. आक्रमक मार्केटिंग ज्यामुळे आईला स्वतःच्या दुधापेक्षा फॉर्म्युला जास्त सोयीचा वाटतो. कधी-कधी मैत्रिणीने तिच्या बाळाला फॉर्म्युला दिला तर आपणही देऊया, असा विचार होतो.
काय व्हायला हवं?
१. सुरुवात हॉस्पिटलपासून व्हायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या बालक स्नेही हॉस्पिटलसाठीच्या दहा पायऱ्या अंगिकारल्या जाव्यात.
२. स्तनपानाचे महत्त्व जाणून त्यासाठी स्वतंत्र, स्तनपान सल्लागार प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जोडलेले असावेत.
३. स्तनपान करताना येणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणींकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर स्तनपान सल्लागारांची मदत घ्यावी.
४. बाळाला किमान सहा महिने संपूर्ण व दोन वर्षांपर्यंत अंशतः आईचे दूध मिळावे, यासाठी कामाच्या ठिकाणी सामाजिक जाणिवेने पुरेशी पगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच ब्रेस्ट पंपिंगची, फिडिंग रूमची सोय सर्व कामाच्या व सार्वजनिक ठिकाणी करावी.
५. बाळाला दूध पुरते आहे, याची एक सोपी चाचणी म्हणजे बाळाची शू ! २४ तासांत बाळाला सहापेक्षा जास्त वेळा शू होत असेल आणि बाळाची वाढ व विकास योग्य प्रमाणात होत असेल, तर बाळाला दूध व्यवस्थित पुरत आहे, अशी शाबासकी आईने स्वतःला द्यावी आणि कुठल्याही अनाहूत सल्ल्यांना बळी न पडता पूर्ण आत्मविश्वासाने बिनधास्त बाळासोबत वाढत जाणं एन्जॉय करावं !
स्तनपान सल्लागार
Ojas.sv.lc@gmail.com