Lokmat Sakhi >Health > बाळासाठी डबा-बाटलीतले दूध नकोच ! ६ महिने स्तनपान बाळासह आईसाठीही फार महत्त्वाचे

बाळासाठी डबा-बाटलीतले दूध नकोच ! ६ महिने स्तनपान बाळासह आईसाठीही फार महत्त्वाचे

world breastfeeding week : नव्या पिढीतल्या मातांनी तरी आता स्तनपानाचे महत्त्व समजून घ्यायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2023 04:20 PM2023-08-01T16:20:19+5:302023-08-03T17:12:11+5:30

world breastfeeding week : नव्या पिढीतल्या मातांनी तरी आता स्तनपानाचे महत्त्व समजून घ्यायला हवे.

world breastfeeding week : breastfeeding is important for babies, no formula no bottle milk | बाळासाठी डबा-बाटलीतले दूध नकोच ! ६ महिने स्तनपान बाळासह आईसाठीही फार महत्त्वाचे

बाळासाठी डबा-बाटलीतले दूध नकोच ! ६ महिने स्तनपान बाळासह आईसाठीही फार महत्त्वाचे

डॉ. ज्योत्स्ना पडळकर
आईनं अंगावरचे दूध बाळाला पाजणं हाच नैसर्गिक नियम असताना हळूहळू ही पाजण्याची ऊर्मी कमी का होत गेली? बाळाला पाजायला बाटली कधीपासून सर्रास अस्तित्वात आली? हे फार पूर्वी झालं नाही फार तर एक शतक मागे. याची सुरुवात परदेशात झाली. आपल्यातल्या काही उच्चभ्रू परदेशात थोडा काळ वास्तव्य केलेल्यांनी आणि परदेशातल्या हरेक गोष्टीचं कौतुक वाटणाऱ्या मंडळींनी हे लोण आपल्याकडे पसरवलं. समाजातल्या उच्चवर्णीयांनी आणि श्रीमंत मंडळींनी ही कल्पना उचलून धरल्यानं साहजिकच ती प्रतिष्ठा पावली आणि अनुकरणीय होत गेली. कोणतीही नवी गोष्ट समाजात चटकन पसरते आणि सोयीची वाटली तर उचललीही जाते. जोपर्यंत त्या नव्या बदलामुळे काही खास तोटे होत आहेत असं लक्षात येत नाही किंवा पटत नाही तोवर हा बदल सर्वांच्या मनात घर करून राहतो त्याला सहज काढून टाकणं अवघड होतं तसंच या बाटलीचं आणि वरच्या दुधाच्या पावडरींचं झालं.

(Image : google)

आपल्याकडेही गावाकडच्या लोकांनी व्यवसायासाठी, पोटापाण्यासाठी शहरांकडे धाव घेतली होती. शहरात औद्योगिक वसाहती वाढत होत्या. स्त्रियांनाही त्यात सामावून घेतलं जात होतं.  इतरही नोकरीच्या संधी स्त्रियांना मोकळ्या होत होत्या. ऑफिसेस बँका शाळा इत्यादी ठिकाणी कित्येक स्त्रिया कामाला लागल्या होत्या. तिच्या मिळवतेपणाचे फायदेही दिसू लागले होते. सहाजिकच या मिळवतीचं सामाजिक स्थानही उंचावलेलं दिसत होतं. अशावेळी या शहरातल्या विभक्त छोट्या कुटुंबाच्या वास्तव्यात कोणी वडीलधारं सल्लागार नसणं, मुलांच्या सांभाळासाठी कोणाचा आधार नसणं आणि अर्थार्जनाची गरज मात्र वाढलेली असणं झालं होतं. अशावेळी मुलांना वरचं दूध दिलं तर चालतं, या कामासाठी बाटली वापरली तर फार सोपं पडतं आणि आईनं बाळाच्या जवळ नसलं तरी चालतं अशी सोपी संकल्पना पर्याय म्हणून सापडली. साहजिकच तिच्याकडे या स्त्रिया आकर्षित झाल्या यात काय आश्चर्य? त्यातच तिला नव्या अडचणींनाही तोंड द्यावं लागू लागलं. बाळाला अंगावर पाजण्यासाठी जी मोकळीक लागते, एकांत लागतो, सवड लागते ती कमी पडू लागली. चारचौघात पाजायची लाज वाटणं, नेसत्या कपड्यांची अडचण वाटणं अशा गोष्टींमुळं सामाजिक दडपण येऊ लागलं. कामाच्या ठिकाणी बाळाच्या सांभाळाची सोय नसणं, तिथं बाळाला पाजायची चांगली सोय नसणं यामुळं बाळाला पाजण्यावर आपोआपच बंधनं येत गेली.अशावेळी खरंतर संभाव्य धोक्यांची जाणीव डॉक्टरांनी आणि सरकारनी या स्त्रियांच्या मनावर ठसवायला हवी होती. पण तसं झालं नाही दुधाच्या पावडरी करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या मालाची विक्री उत्तम व्हावी यासाठी भडक जाहिरात तंत्र वापरलं आणि ते यशस्वी झालं. त्यांच्या या विक्रीवर कोणाचाही अंकुश नव्हता. क्वचित मोठ्या वैद्यकीय संस्थांमार्फतही असे डबे वापरले गेले आणि नकळत त्यांची आणखीच जाहिरात झाली. डॉक्टरांनाही त्यांनी आपल्या जाळ्यात ओढायला कमी केलं नाही. आर्थिक मदती, आकर्षक सवलती, भेटवस्तू देऊन त्यांनी त्यांच्या मालाची विक्री वाढवली. प्रसूती गृहापासूनच गोंधळून टाकणारे सल्ले मिळाले. डॉक्टरांकडून जे स्तनपानाचं महत्त्व सांगणारे सल्ले, मार्गदर्शन मिळायला हवं ते कमी पडलं आणि दुधाच्या पावडरींचं उत्पादन करणाऱ्या देशी परदेशी कंपन्यांनी मात्र आपला कार्यभाग साधला. दुधाच्या पावडरींवर पोसलेल्या गुटगुटीत बाळांची चित्रं दाखवून सफाईदारपणे त्यांच्या दुधाची माहिती सांगून या नव्या आयांना भुलवून टाकलं. त्यांना स्तनपानापासून परावृत्त करायला हे एक मोठंच कारण ठरलं. हे नवं दूध या कंपन्यांना बाळांच्या "गळी उतरवायला" फारच सोपं झालं. त्यांचे मोठे फायदे होत गेले पण आपल्याला आपले तोटे समजून यायला फार दिवस लागले.आईच्या अर्थार्जनातून बाळाचं वरचं दूध, त्याचा खर्च, त्याच्या बाटल्यांची स्वच्छता आणि ती नीट न झाल्यामुळं होणारे आजार, या आजारांवर होणारा खर्च यांची तोंड मिळवणी होणं कठीण जाऊ लागलं. त्यातून कुटुंबाचं विशेषतः आईचं कुपोषण होऊ लागलं. आईचं कुपोषण, तिची दमणूक, बाळाचं वरचं दूध पिणं,त्याचे आजार,त्याचं कुपोषण आणि मग बालमृत्यू असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न पाश्चात्य देशात इतक्या तीव्रतेनं जाणवले नव्हते, याचं कारण तिथली स्वच्छता, लोकांचं शिक्षण. त्यांची आरोग्य सेवेची पातळी आपल्या तुलनेत कितीतरी सरस आहे आणि हवामान चांगलं असल्यानं आजारांचं प्रमाणही कमी आहे.आपल्या देशात डब्याचं दूध- बाटली ही चैन कोणत्याही दृष्टीनी आपल्याला परवडण्यासारखी नाही हे हळूहळू लक्षात येऊ लागलं.सगळ्या प्रश्नांचं मूळ स्तनपानाची कमतरता असल्याचं पटलं. मग मात्र हे सगळे दुष्परिणाम लक्षात येताच बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेनं सरकारच्या मार्फत कायदा केला.



काय आहे हा कायदा?
हा कायदा शिशु दूध पर्याय आणि दुधाच्या बाटल्या आणि शिशु आहार, यासाठी "इन्फंट मिल्क सब्स्टिट्यूट" कायदा १९९२ म्हणून ओळखला जातो.या कायद्यामार्फत दुधाच्या पावडरी आणि बाळाचे घन आहार यावर प्रसार माध्यमातून जाहिराती करण्यावर बंदी आणली. याची कडक अंमलबजावणीही होते आहे.म्हणूनच आपल्याला संपूर्ण भारतात कोणत्याही टीव्हीवर, रेडिओवर, रस्त्यावर, वर्तमानपत्रं, मासिकं किंवा दवाखान्यात कुठेही बाळाच्या दूध पावडरी आणि घन आहाराच्या जाहिराती दिसत नाहीत. हे आपल्या लक्षात आलं आहे का?या कंपन्यांतर्फे कोणत्याही सवलती, भेटवस्तू, प्रायोजक म्हणून सहभाग घेण्याचं जाहीरपणे आणि ठामपणे नाकारलं. कोणत्याही कृत्रिम दुधाच्या पावडरच्या डब्यावर किंवा बाळांच्या घन आहाराच्या डब्यावर स्तनपानाची माहिती आणि महती छापण्याची सक्ती केली. पावडरचं दूध अगदी जरूर तेव्हाच कसं वापरावं, ते कसं तयार करावं, बाटली वापरायचीच असल्यास तिची स्वच्छता कशी करावी वगैरेही छापायची सक्ती केली. याचा परिणाम आता नव्या पिढीच्या आयांच्या स्तनपानाच्या उत्साहावर होत आहे म्हणूनच स्तनपान न करण्याचा निर्णय बदलून आज कित्येक स्त्रिया स्तनपानाकडे आकर्षित होताना दिसतात.स्तनपानाबद्दलची माहिती आणि महती कळल्यामुळं त्याचे फायदे बाळापर्यंत पोहोचवण्याची ओढ दिसते. एकाच घरात नोकरी करणाऱ्या स्त्रियांची दुसरी पिढी आता दिसते. पहिल्या पिढीतल्या स्त्रीनं तिच्या बाळाला डबा- बाटली वापरलेली असली तरी नव्या पिढीतली आई स्तनपानाला उत्सुक दिसते. परदेशात सुद्धा आईच्या दुधाचे कित्येक फायदे पटल्यामुळे ते लोकही स्तनपानाला उत्तेजन देण्याचा कामाला लागले आहेत. त्यांच्याकडे अशा उत्तेजन देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. अमेरिकेसारख्या देशातही फक्त १५% आया सहा महिने पर्यंत बाळाला स्तनपान करतात. आपल्याकडे हा आकडा पन्नास टक्क्यांहून अधिक आहे.तरीही आपल्याकडेही अशा संस्थांमार्फत उत्तेजन देणाऱ्या यंत्रणेची आणखी वाढ होणं जरुरी आहे.या संस्था काय काम करतात? पहिलं काम म्हणजे सध्याच्या यंत्र युगातल्या घडामोडींचा स्तनपानाच्या नैसर्गिक क्रियेवर कसा विपरीत परिणाम होतोय हे लोकांच्या लक्षात आणून देतात. दुसरं, डॉक्टर मग ते स्त्री रोग तज्ज्ञ असोत किंवा बालरोग तज्ज्ञ त्यांचं या विषयात विशेष शिक्षण झालेलं असतंच असं नाही. त्यांना याची जाणीव करून देऊन त्यांनाही शिक्षण देणं हे मोठं काम या संस्था करतात.  तिसरं,आईच्या दुधाच्या अमूल्य फायद्यांची माहिती सर्वांनाच नसते. त्याची माहिती पुरवतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्तनपानामुळे पैशाचीही अप्रत्यक्षपणे बचत कशी होते ते दाखवून देतात. आपल्यासारख्या देशातल्या मुलांना आईचं दूध सोडून वरचं दूध देणं कसं परवडणार नाही हे मनावर ठसवतात. असं हे संस्थांमार्फत होणारं काम भावी आयांपर्यंत आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं फार जरुरीचं आहे. स्तनपानाबद्दल अज्ञान आणि गैरसमजुती लवकर दूर होणं आवश्यक आहे.    आईच्या दुधाचा सर्वोत्तम फायदा बाळाला आणि आईला मिळावा हीच सदिच्छा!
 

(लेखिका बालरोगतज्ज्ञ आहेत.)

jyotsnapadalkar@gmail.com

(स्तनपानाचे महत्त्व सांगणारी विशेष लेखमाला आजपासून रोज वाचा खास लोकमत सखी.कॉमवर)

 

Web Title: world breastfeeding week : breastfeeding is important for babies, no formula no bottle milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.