Join us  

World Osteoporosis Day 2022 : हाडे ठिसूळ होऊ नयेत म्हणून आहाराबाबत ४ नियम...झीज वेळेत टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 1:52 PM

World Osteoporosis Day 2022 Diet Tips for Strong Bones : हाडांचे पोषण व्हावे यासाठी आहार चांगला असणे अतिशय गरजेचे असते.

ठळक मुद्देचहा-कॉफी ही पेय योग्य त्या प्रमाणातच घ्यावीत. जेणेकरुन हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. एकदा ही हाडं ठिसूळ झाली की आपल्याला त्यावर फार काही उपाय करता येत नाही.

हाडं हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. इतर अवयवांबरोबरच हाडांमुळे आपले शरीर बांधलेले आणि एकसंध अवस्थेत असते. मात्र ही हाडे मोडली, ठिसूळ झाली किंवा त्यांना आणखी काही समस्या निर्माण झाली तर मात्र आपले दैनंदिन जीवन अवघड होऊन जाते. अनेकदा व्यायाम न केल्याने किंवा आहारातून योग्य ते पोषण न मिळाल्याने हाडांचे दुखणे मागे लागते. कधी आपली पाठ किंवा मणका खूप दुखतो तर कधी आपल्या हाता-पायाची हाडं ठणकतात. एकदा हाडं दुखायला लागली की आपल्याला काय करावे ते सुधरत नाही. मात्र हाडांचे पोषण व्हावे यासाठी आहार चांगला असणे अतिशय गरजेचे असते (World Osteoporosis Day 2022 Diet Tips for Strong Bones). 

हाडे कायम मजबूत राहावीत यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा हे माहित असणे आवश्यक आहे. ठराविक वयानंतर आपल्या हाडांची झीज होते आणि हाडं ठिसूळ होत जातात. महिलांमध्ये मेनोपॉजनंतर ही समस्या जास्त प्रमाणात भेडसावते. हाडे ठिसूळ होणे यालाच ओस्टीओपोरॅसिस म्हणून ओळखले जाते. एकदा ही हाडं ठिसूळ झाली की आपल्याला त्यावर फार काही उपाय करता येत नाही. मात्र ही हाडे ठिसूळ होऊ नयेत आणि दिर्घकाळ चांगली राहावीत यासाठी आहाराबाबत काय काळजी घ्यावी याविषयी... 

१. व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ 

व्हिटॅमिन डी आपल्या हाडांसाठी आणि स्नायूंसाठी अतिशय उपयुक्त असते. सूर्यकिरणे हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत असतात. मात्र संत्री, मोसंबी, मोड आलेले मूग, पालक, टोमॅटो, बटाटा, लिंबू यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीराला व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळते आणि हाडे मजबूत राहण्यास मदत होते. 

२. कॅल्शियमयुक्त पदार्थ

हाडे चांगली राहावीत यासाठी शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते हे आपल्याला माहित आहे. हाडांचा ठिसूळपणा दूर करायचा असल्यास आहारा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असायला हवा. यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, केळी, संत्री, मटार यांचा समावेश हवा. 

(Image : Google)

३. मीठाचे प्रमाण कमी 

मीठ किंवा मीठ जास्त प्रमाणात असलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरातील कॅल्शियम शोषले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप मीठ असलेले पापड, लोणची यांसारखे पदार्थ, पॅकेज फूड, जंक फूड शक्यतो टाळावे किंवा अतिशय कमी प्रमाणात खावे. यामुळे हाडांचे कार्य दिर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते. 

४. चहा-कॉफी किंवा सोडा 

चहा किंवा कॉफी ही आपल्याकडे अगदी सहज सातत्याने घेतली जाणारी पेय आहेत. मात्र जास्त प्रमाणात चहा -कॉफी किंवा सोडा असलेली पेय घेतल्यास हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ही पेय योग्य त्या प्रमाणातच घ्यावीत. जेणेकरुन हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजना