झोप ही आपल्या जीवनशैलीतील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. रात्री शांत आणि गाढ झोप झाली तर आपण दिवसभर फ्रेश राहतो. रोज आपल्याला किमान ७ ते ८ तासांची शांत झोप गरजेची असते. पण ही झोप मिळाली नाही तर मात्र दुसऱ्या दिवशी थकवा येणे, अॅसिडीटी, डोकेदुखी, अंगदुखी अशा समस्या उद्भवतात. मग आळस आल्यासारखे होते आणि कामाचा उत्साह राहत नाही. मोबाइलचे व्यसन, कामाचा ताण किंवा अन्य काही कारणांनी आपल्याला रात्री गादीवर पडल्या पडल्या शांत झोप लागत नाही (Yoga For Good Sound Sleep).
तर काही वेळा झोप लागली तरी दर काही वेळाने जाग येते आणि सलग झोप मिळत नाही. अशावेळी रात्री झोपताना काही आसनं केल्यास तुम्हाला रिलॅक्स वाटते आणि थकवा दूर होण्यासही त्याची चांगली मदत होते. इन्स्टाग्रामवर योग अभ्यासक काम्या याविषयी महत्त्वाची माहिती देतात. नियमितपणे ही आसनं केल्यास गाढ आणि शांत झोप लागण्यास निश्चितच फायदा होतो. सुरुवातीला ही आसनं ५ आकडे होईपर्यंत करुन नंतर ती ८ ते १० आकड्यांपर्यंत वाढवत न्यायची. पाहूयात ही आसनं कोणती आणि ती कशी करायची.
१. बद्धकोनासन
यामुळे शरीराला आलेला थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच पाय आणि मणक्याच्या स्नायूंना यामुळे आराम मिळण्यास मदत होते. यातच डोके खाली टेकवण्याचा प्रयत्न केल्यास आणखी आराम मिळतो. अनेक स्त्रिया दिवसभर बैठे काम करतात त्यामुळे शरीर अवघडून जाते. अशावेळी हे आसन केल्यास शरीराची ठेवण चांगली होण्यास मदत होते. बेडवर बसल्या बसल्या आपण हे आसन सहज करु शकतो.
२. मांड्यांचा व्यायाम
अनेकदा बैठे काम करुन आपल्या मांड्यांचा भाग खूप दुखतो. अशावेळी रात्री झोपताना मांड्यांचे सोपे स्ट्रेचिंग केल्यास त्याची चांगली मदत होते. दोन्ही हात जमिनीवर टेकवून पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. त्यानंतर दोन्ही पाय कंबरेतून एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा.
३. कपोतासन
या आसनामुळे कंबर आणि मांड्यांचा भाग ताणल्या जातात. तसेच पाठीच्या मागच्या मणक्याला चांगला ताण पडतो आणि दिवसभराच्या कामाने आलेला फटीग निघून जाण्यास याची चांगली मदत होते.
४. ओटीपोटाचा भाग उघडणे
रक्तदाब कमी होण्यास हे आसन उपयुक्त ठरते. ताण कमी होणे, शारीरिक संबंध सुधारणे आणि पाठदुखी यांसाठी हे आसन फायदेशीर असते. पाठीवर झोपून पाय भिंतीला लावायचे आणि दोन्ही पाय ताणायचे.