>> ज्योत्स्ना गाडगीळ पंचमुखी
'रस्त्यावरून जाताना एखादी हॅरिअर किंवा सफारी दिसली की आम्ही आमच्या कुटुंबियांना, मित्र मैत्रिणींना अभिमानाने सांगतो, ही गाडी आम्ही तयार केली आहे. त्याक्षणी उर भरून येतो. मूठभर मांस चढतं आणि आत्मविश्वास दुणावतो.' हे शब्द आहेत टाटा हॅरिअर आणि सफारी बनवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे! अवघ्या तिशीतल्या मुली आज शिक्षण घेत, नोकरी करत, आपल्या घराला आर्थिक हातभार लावत आहेत.
मुलींच्या वाहन चालवण्यावरून अनेकदा विनोद केले जातात, मात्र अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार महिला पुरुषांपेक्षा उत्तम चालक असल्याचे सिद्ध झाले आहे. बस, रिक्षा, टेम्पो, ट्रेन, विमान, जहाजदेखील त्या चालवतात. मेकॅनिक बनून गॅरेजमध्ये दुरुस्तीही करतात आणि टाटाच्या या प्रकल्पात तर अत्यंत महागड्या सफारी आणि हॅरिअर या गाड्या तयार सुद्धा करतात. ज्या मुलींनी कधी काळी हातात स्क्रू ड्रायव्हरसुद्धा धरला नव्हता त्याच मुली आज आत्मविश्वासाने गाड्या बनवत आहेत.
प्लांट हेड नीरज अगरवाल आणि उपाध्यक्ष प्रमोद चौधरी या प्रकल्पाबद्दल बोलताना म्हणाले, '२०२१ मध्ये टाटा मोटर्सने पिंपरी चिंचवड येथे 'वुमन इन ब्लु' हा प्रोजेक्ट सुरु केला. हॅरिअर आणि सफारी या गाड्यांची घडण इतर गाड्यांच्या तुलनेत थोडी किचकट असल्याने त्यासाठी कुशल कामगार नेमणे गरजेचे होते. तरीदेखील टाटा मोटर्सने त्यावेळी धडाडीचा निर्णय घेतला आणि हा प्रकल्प महिलांकडून करवून घ्यायचा असे ठरले. त्यातही ग्रामीण मुलींना प्राधान्य देत 'कौशल्या' उपक्रम सुरु केला. ज्या अंतर्गत मुलींना प्रात्यक्षिक अनुभवाबरोबर डिप्लोमा, डिग्रीचेही शिक्षण घेण्याची संधी दिली. गावागावातून १२ वी पास झालेल्या मुलींचे अर्ज मागवले. ग्रामीण मानसिकता, मुलींच्या लग्नाची घाई, त्यांची सुरक्षा अशा विषयांमुळे मुलींना पाठवण्यासाठी पालकांचा नकार होता. त्यावेळी टाटाच्या समुपदेशकांनी घरोघरी जाऊन मुलींच्या राहण्याची, जेवणाची, सुरक्षेची हमी दिली आणि बऱ्याच परिश्रमानंतर ३०० मुलींना घेऊन पिंपरी चिंचवड येथे या प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यावेळेस डॉ. सुधा मूर्ती उपस्थित होत्या. त्यांना ही संकल्पना आवडली आणि टाटाबरोबर काम करण्याचा आपला पूर्वानुभव सांगत त्यांनी मुलींचा आत्मविश्वास वाढवला.'
प्रकल्पाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. अवजड पार्ट उचलणे, लावणे, तपासणे अशा अनेक तांत्रिक बाबी मुलींना सहजतेने करता याव्यात यासाठी बारकाईने अभ्यास केला आणि प्रकल्पाची आखणी केली. गाडीची फ्रंट मिरर उचलण्यासाठी रोबोट, मुलींच्या उंचीनुसार प्लॅटफॉर्म, सकस जेवण, आरोग्य तपासणी, ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि त्यावर चोवीस तास पाळत ठेवणारे कर्मचारी, राहण्याची व्यवस्था, शिक्षणाचा खर्च, तिन्ही शिफ्टमध्ये मुलींना ने-आण करणारी बस, जोडीला सुरक्षा रक्षक या मूलभूत गरजा भागवल्याने मुली निर्धास्तपणे काम करत आहेत. चांगला मोबदला मिळाल्याने घरखर्च भागवून, भावंडांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारे वातावरण, मार्गदर्शन, निकोप स्पर्धा, मनोरंजन, बक्षीस यामुळे मुलींची सर्वांगीण प्रगती होत आहे. इथले प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना आपल्या ग्रामीण भागात टाटाच्या अन्य प्रोजेक्टमध्ये सामील करून घेण्याची हमी मिळाल्याने भविष्याची चिंता त्यांना सतावत नाही. त्यामुळे या मुली प्रामाणिकपणे आपले काम करताना दिसतात आणि भविष्यात कष्ट करून हीच गाडी विकत घेण्याचे स्वप्न बाळगतात.
स्वालीया मुल्ला ही २३ वर्षांची मुलगी सांगते, 'मी सांगलीतल्या छोट्याशा खेडेगावात राहते. माझं संयुक्त कुटुंब आहे. २००६ मध्ये वडील वारले, पण काकांनी मला शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिलं. इंजिनिअरिंग करण्याचं माझं स्वप्नं होतं. पण आर्थिक परिस्थिती अनुकूल नव्हती. टाटाचा 'कमवा आणि शिका' हा उपक्रम कळल्यावर मी अर्ज केला आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमधून इथे आले. चार वर्ष प्रात्यक्षिक कामाचा अनुभव आणि पुण्याच्या डी. वाय. पाटील या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये बी. टेकचं शिक्षण घेत आहे. तीस मुलींची टीम लीडर म्हणून जबाबदारी सांभाळताना घरालाही आर्थिक हातभार लावत आहे. टाटा हे माझ्यासाठी नोकरीचे ठिकाण राहिले नसून ते आता माझं कुटुंब झालं आहे.'
धुळ्याची वैशाली पाटील सांगते, 'माझे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे. दोन धाकटी भावंडं आहेत. कोरोनाकाळात काम बंद पडले, वडिलांना कोरोना झाला, घराची जबाबदारी माझ्यावर आली. टाटाच्या वुमन वर्कशॉपबद्दल कळलं. यापूर्वी हातात कधीही नटबोल्टही न धरलेली मी इथे सगळं प्रशिक्षण घेतल्यावर महागडी गाडी बनवू लागले आणि पदवीचे शिक्षण घेत भावंडाचंही शिक्षण पूर्ण करत आहे. एकदा आई बाबा पुण्यात आले असताना त्यांना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले, तेव्हा मला बिल भरताना पाहून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. आमच्या खेडेगावातून नोकरी आणि शिक्षणासाठी बाहेर पडलेली मी पहिली मुलगी आहे. या चार वर्षात माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. याचं संपूर्ण श्रेय टाटा मोटर्सना देते.
गोंदिया जिल्ह्यातल्या दुर्गम भागात राहणारी वीणा टेंबरे सांगते, 'कोरोना काळात माझी आई गेली. तिच्या निधनाने बाबांचं मानसिक संतुलन बिघडलं. धाकटा भाऊ होता. घराची जबाबदारी माझ्यावर आली. मला मिळेल ती नोकरी चालणार होती. अशातच टाटाची सुवर्णसंधी चालून आली. मी चिकाटीने काम केलं. आता टीम लीडर झाले. बी. टेक करतेय आणि बाबांना सांभाळत धाकट्या भावाचं शिक्षणही करतेय.
नगरच्या शिर्डी गावातली रोहिणी ढोले सांगते, ''२००७ मध्ये आई वडिलांचं अपघाती निधन झालं. आजी आजोबांनी मला आणि धाकट्या भावाला सांभाळलं. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न लावून दिलं. वर्षभरात मुलगी झाली आणि नवऱ्याशी विभक्त होण्याची वेळ आली. एकल पालक म्हणून मुलीचा आणि घरच्यांचा सांभाळ करायचा हे माझ्यासमोर मोठं आव्हान होतं. एक नोकरी केली पण पुरेसा पगार नव्हता. एका मैत्रिणीने टाटाबद्दल सांगितलं, मी अर्ज केला आणि सुदैवाने नोकरीला लागले. तीन वर्षात माझ्या घरचं चित्र बदललं. घरच्यांचा सांभाळ करण्यास मी सक्षम झाले आहे आणि शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहिले.'
८० टक्के ग्रामीण भागातून आलेल्या इथल्या मुलींच्या कथा जवळपास अशाच आहेत. मात्र परिस्थितीसमोर न झुकता त्या मेहनत करत आहेत. ज्ञानाने, अनुभवाने अधिकाधिक परिपक्व होत आहेत आणि येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह समस्त टाटा मोटर्स त्यांच्या चिमुकल्या पंखांना बळ देत आहे. महिला सबलीकरणाचं याहून उत्तम उदाहरण ते काय? महिला दिन विशेष (Women's Day 2025) या सख्यांचा कसा वाटला हा आगळा वेगळा 'कार'नामा?