भाग्यश्री मुळे
त्या तिघी. सर्वसामान्य कुटुंबात जन्मल्या. शिरस्त्याप्रमाणे शाळेत गेल्या. शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढे काय करायचं? नेहमीची वाट सोडून त्या तिघींनी एक खास वाट निवडली. संस्कृत आणि त्यातही न्याय शास्त्र, व्याकरण शास्त्र अशा अत्यंत अवघड समाजल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. ते ही गुरुकुलात राहून. एक नाही, दोन नाही तर सलग ६ वर्ष ते १० वर्ष पूर्णवेळ पाठशाळेत राहून, मेहनत करून अत्यंत अवघड समाजाला जाणारा अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. देशभरात वेळोवेळी झालेल्या धर्मसभा मध्ये भाग घेऊन अभ्यासपूर्ण सादरीकरण करून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं. नुकतीच नाशिकमध्ये पहिल्यांदाच महिलांची अशी संस्कृत धर्मसभा (चर्चासत्र) पार पडली. त्यात या तिघींचा विशेष सत्कार करण्यात आला. आज या तिघीजणी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांचा अभ्यास, त्यांची मेहेनत, त्यांचे यश, अनुभव याविषयी त्यांच्याशी या गप्पा..
प्रणाली कोळपकर सांगतात..
प्रणाली देवेंद्र कोळपकर या मुळच्या अहमदनगरच्या रहिवासी. घरी आई वडील आणि त्या असे छोटे मध्यमवर्गीय कुटुंब. संस्कृत वगैरेचा घरी अजिबात संबंध नाही. नगरमध्येच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर बीए करण्यासाठी त्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाल्या. पदवी पूर्ण झाल्यावर संस्कृतमध्ये अजून शिक्षण घ्यावे अशी इच्छा बोलून दाखविल्यानंतर एका परिचितांच्या माहितीतून त्यांना देवदत्त पाटील यांच्या गोवा येथे सुरु असलेल्या श्री विद्या पाठशाळेची माहिती समजली. त्या गोव्याच्या पाठशाळेत दाखल झाल्या. शिक्षणास सुरुवात झाली. पण आपण जे संस्कृत शिकलो ते आणि इथला अभ्यासक्रम यात जमिन आसमानचा फरक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला सारे काही डोक्यावरून गेले पण काही काळानंतर त्यांना विषय समजू लागला, त्याची गोडी निर्माण झाली. मोहन शर्मा गुरुजी यांच्याकडून त्या १० वर्ष व्याकरण शास्त्र शिकल्या. यानंतर अहमदनगर येथे शृंगेरी विद्यापीठाशी सलग्न असलेल्या वेदांत विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी महापरीक्षा दिली. ती उत्तमरीत्या पास झाल्यामुळे त्यांना ‘व्याकरणालंकार’ ही पदवी प्राप्त झाली. आता त्या नगरच्या वेदांत विद्यापीठात मुलीना संस्कृत शिकवतात. याशिवाय संस्कृत व्याकरण या विषयाचे ऑनलाईन वर्ग घेतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर काय वाटतं आणि समाजाला काय सांगाल असे विचारले असता प्रणाली सांगतात की आपल्या प्राचीन अस्सल संस्कृतीचा अभिमान बाळगून हा अभ्यासक्रम पूर्ण केला तर याचे अगणीत फायदे आहेत. खरंतर याआधी हा अभ्यासक्रम शिकण्याची महिलांना संधी नव्हती. त्यामुळे आता संधी मिळाली आहे तर तिचे सोने करणे ही महिलांचीच जबाबदारी आहे असं त्या आग्रहाने सांगतात.
कल्याणी हर्डीकर सांगतात..
कल्याणी हर्डीकर पूर्वाश्रमीची भार्गवी सावईकर फोंडा, गोवा इथली रहिवासी. घरी आई, वडील, बहिण असा परिवार. वडील कालिदास सावईकर थोडफार शास्त्र शिकलेले पण पौराहीत्य व्यवसाय करणारे तर आई गृहिणी. घरात संस्कृतचे वातावरण. आपल्या मुलीनी मोठेपणी संस्कृतचा अभ्यास करावा ही आई वडिलांची पहिल्यापासून इच्छा. त्यामुळे शास्त्र शाखेतून बारावी उत्तीर्ण होताच कल्याणी आणि तिच्या बहिणीने गुरुकुल पद्धतीने पुण्यातील देवदत्त पाटील गुरुजी यांच्या श्री विद्या पाठशाळेत शिकण्यास प्रारंभ केला. देवदत्त पाटील यांच्या पाठशाळेत २ वर्ष शिक्षण झाल्यानंतर कल्याणी या गोवा येथील वेदमूर्ती तर्करत्न श्री दत्तभार्गव टेंगसे यांच्या वागवर्धिनी पाठशाळेत दाखल झाल्या. तेथे त्यांनी ४ वर्ष शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर कल्याणी यांचा विवाह रत्नागिरी येथील तन्मय हर्डीकर यांच्याशी झाला. आज हे दोघे पतीपत्नी गोवा येथील श्री विद्या पाठशाळेत अध्यापनाचे काम करत आहे. तन्मय हे तेथे न्यायशास्त्र तर कल्याणी या व्याकरणशास्त्र शिकवतात. भविष्यात कल्याणी यांचा ग्रंथ लिहिण्याचा मानस आहे.
त्या सांगतात, या क्षेत्रात येणाऱ्यांकडे शिकण्याची जिद्द पाहिजे. दुसऱ्याने सांगून करू असा हा विषय नाही. हे शिक्षण खूप सारे कष्ट करूनच साध्य होत. परीक्षा कठीण असतात. एकाग्रता खुप लागते. विषय समजून घ्यायचा आणि दुसऱ्यांपुढे तो मांडायचा असतो. त्यामुळे विषय समजून घेऊन दिवसभर त्याचे चिंतन, मनन करावे लागते. आपण जे शिकलो ते पहिल्या धड्यापासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी सतत लक्षात ठेवाव्या लागतात. त्यांचा सतत वापर करावा लागतो. हे क्षेत्र खूप चांगले आहे फक्त खूप कष्ट करायची तयारी पाहिजे.
ऋतुजा कुलकर्णी सांगतात..
ऋतुजा या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील मुळच्या रहिवासी आहे. वडिलांच्या नोकरीमुळे त्याचं शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. शालेय शिक्षणापासून त्यांनी संस्कृत विषय घेतला होता. ऋतुजा यांच्या घरात आई वडील आणि लहान भाऊ असे चौकोनी कुटुंब आहे. त्यांचे वडील आयुर्विमा कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करतात. लहान भाऊ ऋग्वेदाचा अभ्यास्क्रम पाठशाळेत राहून पूर्ण करत आहे. अगदी अनपेक्षितपणे ऋतुजा त्यांच्या आयुष्याला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कलाटणी मिळाली. ऋतुजा यांना बारावी नंतर संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा निर्माण झाली. त्यासाठी त्या छत्तीसगड येथील पुष्पा दीक्षित यांच्याकडे जाणार होत्या. पण त्यापूर्वी कांची शंकर मठाच्या पाठशाळेत शिकत असलेल्या लहान भावाला भेटायला गेल्या असता तेथे अमित जोशी गुरुजी यांच्याशी याबद्दल चर्चा करताना तिकडे जाण्यापेक्षा पुण्यातील पाटील गुरुजी यांच्या श्री विद्या पाठशाळेत एकदा भेट द्यावी असे सुचविण्यात आले. त्या प्रमाणे गुरुजी आणि वाहिनी यांच्याशी बोलने झाल्यावर जून २०१६ मध्ये ऋतुजा यांचा शिक्षणास रीतसर प्रारंभ झाला. सुरवातीला शिकविण्यात आलेल्या न्यायशास्त्र विषयात गोडी लागल्याने ऋतुजा यांनी हाच विषय पुढे सखोलपणे अभ्यासण्याचे निश्चित केले. त्यापमाणे कठोर मेहेनत घेऊण २०२२ पर्यंत त्यांनी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. आता प्रयोगिक तत्वावर मराठवाडा भागातील मुलीना या शिक्षणाचे द्वार खुले करावे या उद्देशाने संभाजीनगर येथे भारती पाठशाला सुरु करण्यात आली असून तेथे अध्यापनाचे काम करत आहेत.
ऋतुजा सांगतात, या क्षेत्रात येताना खुप संयम हवा. कष्ट करायची तयारी हवी. हे वेगळे क्षेत्र आहे. वेगळा अभ्यास आहे. आताशी कुठे या क्षेत्रात महिला, मुलीना प्रवेश मिळू लागला आहे. अधिकाधिक महिलांनी यात स्वत:ला सिद्ध करावे. कमी खर्चात उच्च दर्जाचे आयुष्य जगण्याचे धडे हे शिक्षण चालू असतानाच नकळतपणे गिरवायला मिळतात हे आम्ही त्यांना स्वत:च्या उदाहरणावरून पटवून देतो.