लहान वयात तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करायची जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्हाला यशापासून कोणीच अडवू शकत नाही. कौशल्याच्या जोरावर आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याने तुम्ही जगात नाव कमवू शकता. पुण्यातील अवघ्या ७ वर्षाच्या चिमुकलीने हे सिद्ध करुन दाखवले आहे. इतक्या लहान वयात देशना नहार हिने 'लिंबो स्केटिंग' या प्रकारामध्ये ‘गीनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव कोरत भारताचे आणि पुण्याचे नाव मोठे केले आहे. याआधी चीनमधील एका मुलीने २०१५ मध्ये असाच विक्रम १४.१५ सेकंदात पूर्ण केला होता. देशनान तिचा विक्रम मोडत ही कामगिरी केल्याने तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. (7 year old Deshna Nahar from Pune Made Guinness World Record for Limbo Skating).
लिंबो स्केटींग हा काय खेळ आहे असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर सामान्य स्केटींग न करता पाय पूर्ण स्ट्रेच करुन हे स्केटींग केले जाते. मेहनत आणि सरावाच्या जोरावर देशनाने केवळ १३.७४ सेकंदांमध्ये २० चारचाकी गाड्यांखालून १९३ फूट अंतर स्केटिंग करत पूर्ण केले आहे. लहान वयात तिने केलेली ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आणि देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे. चारचाकी गाडीखालून स्केटींग करत असताना अनेकदा इजा होण्याची शक्यता असते. देशनालाही हा विक्रम करताना डोक्याला लहान-मोठ्या इजा झाल्या. पण तिने हार न मानता भरपूर सराव करत आपली चमक दाखवून दिली. देशना पुण्यातील रॉक ऑन व्हिल्स या स्केटिंग अॅकॅडमीमध्ये विजय मलजी यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
वयाच्या ५ व्या वर्षापासून स्केटिंग करणारी देशना पुण्यातील हचिंग्ज स्कूलची विद्यार्थिनी असून ती आता तिसरीमध्ये आहे. तिचे वडील आदित्य रसिकलाल नहार बांधकाम व्यावसायिक असून या स्पर्धेसाठी त्यांनी बरीच तयारी केल्याचे ते म्हणाले. यावर्षी १६ एप्रिल रोजी क्लोव्हर प्लाझा मॉलच्या पार्कींग लॉटमध्ये हे रेकॉर्ड करण्यात आले. त्यावेळी गिनिज रेकॉर्डमधून ३ निर्णायक याठिकाणी आले होते. त्यांनी देशनाची कामगिरी पाहून सर्व स्तरावर योग्य पद्धतीने चाचणी घेऊन तिला या रेकॉर्डचा मान देण्याचा निर्णय घेतल्याचे देशनाच्या वडिलांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले.