Join us  

73 वर्षांच्या आजीचा जलवा, लठ्ठ-आजारी-बिचारी आजी झाली सुपरफिट, तरुणतरुणींना आता देतेय कॉम्प्लेक्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 3:30 PM

आजींच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी वाचून आपणही करुया जीवनशैलीत बदल

ठळक मुद्देतरुणांनाही लाजवेल असा आजींच्या जिद्दीचा प्रवास महिलांनीही त्यांच्याकडून फिटनेसची प्रेरणा घ्यायला हवी

वजन कमी करायचं ही सध्या अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाची समस्या झाली आहे. लहान मुलींपासून ते वयस्कर स्त्रियांपर्यंत सगळेच बारीक होण्यासाठी झगडताना दिसतात. कोणाला शेपमध्ये दिसण्यासाठी तर कोणाला तब्येत चांगली राहावी यासाठी बारीक व्हायचे असते. आता बारीक काय फक्त आपण तरुण असलो तरच होऊ शकते असे नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करु शकतो. कॅनडातील ७३ वर्षीय आजींनी हे नुकतेच सिद्ध करुन दाखवले. या वयातही त्यांनी आपले वजन कमी करुन त्या इतक्या शेपमध्ये आल्या आहेत की तरुणींनाही त्या लाजवतील. 

( Image : Instagram)

वयाच्या सत्तरीत म्हणजेच ३ वर्षांपूर्वी टोरंटो येथे राहणाऱ्या या आजींचे वजन ९० किलो होते. जॉन मॅकडोनल्ड असे त्यांचे नाव असून त्यांना वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या विविध तक्रारींचा सामना करावा लागत होता. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या वयाचा किंवा वजनाचा बाऊ न करता वाढलेले वजन काही करुन कमी करायचे असे ठरवले आणि नुसते ठरवले नाही तर त्यांनी ते सिद्धही करुन दाखवले. त्यांनी सत्तरीच्या वयात घेतलेल्या या आव्हानाची आणि त्यांच्या जिद्दीची दखल स्थानिक फिटनेस मासिकांनी घेतली आहे. काही मासिकांनी आपल्या कव्हर पेजवर या आजींचा फोटो छापून आपल्या वाचकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर संपूर्ण आयुष्यात कधीही नाही इतक्या त्या आता फिट असल्याचे म्हटले जात आहे.

( Image : Instagram)

वय झाले की साधारणपणे शरीर थकते आणि काही व्याधी मागे लागतात. त्याचप्रमाणे सरकारी नोकरीतून निवृ्त्त झाल्यावर जॉन यांना उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, आर्थरायटीस यांसारख्या समस्या उद्भवू लागल्या. या समस्यांवर उपाय म्हणून नियमितपणे डॉक्टरांना दाखवणे आणि औषधोपचार असे सुरू होते. पण इतके वजन आणि आरोग्याच्या तक्रारी यांमुळे मी खूप अस्वस्थ आणि दु:खी असायचे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी स्वत:चे छायाचित्र घेणे टाळत होते, कारण ते पाहून मला स्वत:च तिरस्कार वाटत होता असे त्या म्हणाल्या. मात्र एक वेळ अशी आली जेव्हा डॉक्टरांनी या आजींना त्यांचे औषधाचे डोस वाढवावे लागतील असे सांगितले. आता जास्त औषधे घ्यायची नसतील तर आपल्याला नक्कीच  काहीतरी करावे लागेल असा विचार त्यांनी केला. आपल्या आईप्रमाणे आपल्याला नर्सिंग होममध्ये आयुष्याचे दिवस काढायचे नाहीत या विचाराने  त्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल करायचे ठरवले. दिवसेंदिवस बिघडत चाललेली तब्येत आपल्याला वाचवायची असेल तर बदल करावाच लागेल या विचाराने त्या कामाला लागल्या.  

विशेष म्हणेज या सगळ्या प्रवासात आजींची मुलगी मिशेल यांनी त्यांना उत्तम साथ दिली.  मिशेल काही वर्षांपूर्वी त्यांना ख्रिसमस दरम्यान भेटायला आली. त्यावेळी आपल्या आईची खराब होत असलेली तब्येत पाहून तिला धक्का बसला. प्रोफेशनली बॉडी बिल्डर असलेल्या मिशेल हिने आपल्या स्वत: आपल्या आईसाठी एक सहा महिन्यांचा फिटनेस प्रॉग्रॅम तयार केला. आश्चर्य म्हणजे आजींनीही आपल्या मुलीच्या या म्हणण्याला सकारात्मक प्रतिसाद देत फिटनेस बाबतच्या गोष्टी करायला तयारी दाखवली. मिशेलच्या मदतीने आजींनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी तर बदलल्याच. पण जिममध्ये योग्य पद्धतीने कसा व्यायाम करायचा याबाबतच्या गोष्टीही  त्यांनी गितल्याप्रमाणे फॉलो केल्या. 

( Image : Instagram)

आता वयाच्या सत्तरीत जॉन मॅकडोनल्ड यांना हे सगळे करणे किती आवघड गेले असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही. पण त्यांच्यातील जिद्दीमुळे त्यांनी आपले वजन कमालीचे कमी करुन दाखवले. अनेकदा त्या इतक्या मन लावून व्यायाम करत असत की थोडा ब्रेक घेऊन दमाने कर असे तिला सांगावे लागायचे अशी त्यांची मुलगी मिशेल सांगतात. तर मॅक्सिकोमध्ये मुलीकडे प्रचंड उष्ण वातावरणात मला व्यायाम करताना बादलीभर घाम यायाच असे आजी गमतीने सांगतात. २ आठवडे ट्रेनिंग घेतल्यानंतर आजी पुन्हा आपल्या घरी आल्या आणि त्यांनी मुलीने शिकवलेल्या आणि संगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. अवघ्या सहा महिन्यात त्यांनी तब्बल २० किलो वजन कमी केले. लोकांना असे वाटते की वय झाल्यावर वजन उचलायचे नसते किंवा वेट ट्रेनिंग करायचे नसते. पण तुम्ही जेवढे वजन उचलता तेवढी तुमची हा़डे मजबूत होतात. 

इन्स्टाग्रामवर ट्रेनविथजॉन अशा नावाने त्यांनी पेड सुरु केले असून त्यावर त्या आपल्या फिटनेस विषयीच्या गोष्टी शेअर करत असतात. त्यांना ५ लाखांहून अधिक जण फॉलो करतात. त्या म्हणतात, मी या वयातही लोकांसाठी प्रेरणा होऊ शकते. माझे कौतुक व्हावे यासाठी मी हे करत नाही तर माझ्या फिटनेसवरुन इतरांनी प्रेरणा घ्यावी यासाठी मी हे सोशल मीडियावर पोस्ट करते. त्यांचे इन्स्टाग्राम पेज सर्व वयोगटात बरेच प्रसिद्ध आहे. अनेक जण त्यांच्याप्रमाणे व्यायाम करण्याचा प्रयत्नही करतात. मी पूर्वी हळूहळू मरत होते, पण आता फिटनेसमुळे मी जगणार आहे असे त्या अतिशय आनंदाने सांगतात. माझ्या गोष्टीतून महिलांनी प्रेरणा घ्यावी आणि वयाची मर्यादा न घालता आपली तब्येत जपावी.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसोशल व्हायरलसोशल मीडियाफिटनेस टिप्स