वयाच्या पन्नाशीनंतर आपण आयुष्यात ज्या वेगानं धावतो तो वेग कमी करण्याची इच्छा बहुतेकांना होते आणि तसं ते करतातही. पण असेही काही असतात ज्यांना वयाची साठी गाठल्यानंतर आपलं स्वत:चं काही तरी सुरुवात करण्याची इच्छा होते. त्यांच्या या वयतील उद्यमशिलतेचं तरुणांनाही कौतुक आणि कुतुहल वाटतं. कर्नाटकच्या 88 वर्षीय नागमणी यांची गोष्ट तरुणांसोबतच प्रौढांनाही ( senior citizen entrepreneur) प्रेरणा देणारी आहे. 'बेटर इंडिया' या डिजिटल पोर्टलवर नागमणी यांची मुलाखत प्रसिध्द झाली असून सर्वत्र नागमणी ज्यांना प्रेमाने मणि आण्टी म्हटलं जातं त्यांची आणि त्यांच्या हर्बल तेलाची (roots and shoots) चर्चा सुरु आहे.
Image: Google
मणि आण्टीनं हर्बल तेलाचं उत्पादन वयाच्या साठाव्या वर्षी सुरु केलं तरी त्याचं बीज मात्र वयाच्या 24व्या वर्षात होतं. मणि आण्टी 24 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे केस खूप गळायचे. त्यांची म्हैसूर येथे राहाणारी एक मैत्रीण होती जी वयानं 60 वर्षांची होती त्यांनी मणि आण्टीला एका तेलाचा उपाय सांगितला. मणि आण्टी यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते तेल बनवलं आणि वापरायला सुरुवात केली. एका महिन्यात त्यांना या तेलाचा फरक दिसून आला. मणि आण्टीचे केस गळणं थांबलं. तेव्हापासून मणि आण्टी या स्वत:साठी आणि स्वत:च्या कुटुंबासाठी तेल तयार करत आणि वापरत. तेव्हा त्यांच्या डोक्यात आपण हे तेल मोठ्या प्रमाणावर तयार करुन ते विकायला हवं हा विचारही आला नाही. त्याचं कारण मुलांच्या आणि घरातल्या जबाबदाऱ्या. पण त्यांच्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर त्यांना एकटेपणा आला. हा एकटेपणा घालवण्याचा उपाय म्हणून या तेलाची व्यावसायिक पातळीवर निर्मिती करायचं त्यांनी ठरवलं.
Image: Google
पती निधनानंतर तीन वर्षांनी वयाच्या साठीत त्यांनी 'रुट्स ॲण्ट शूट्स' नावाचं हर्बल तेल व्यावसायिक पातळीवर तयार करायला सुरुवात केली. मणि आण्टी सांगतात की हे तेल तयार करण्याची पध्दत 150 वर्षं जुनी आहे. हे तेल तयार करण्यासाठी त्या चार प्रकारचं तेल वापरतात. त्यात खोबऱ्याचं आणि मेथीच्या तेलाचाही समावेश आहे. शिवाय हिमाचल प्रदेश येथेच भेटणाऱ्या दोन स्थानिक औषधी वनस्पतींचाही त्यात वापर करतात. हे तेल तयार करताना ते न उकळता सूर्याच्या प्रखर उन्हात सहा आठवडे ठेवतात. मणि आण्टी वर्षाला 60 ते 70 लिटर हर्बल तेल तयार करुन 300 मिलीच्या बाटल्यांमध्ये विकतात. मणि आण्टी यांनी जेव्हा हे तेल व्यावसायिक पातळीवर तयार करायला सुरुवात केली तेव्हा त्याचा ग्राहक स्थानिक पातळीवरील सलून आणि ब्यूटी पार्लर होते. हलासूर येथे अम्बारा नावाचं बूटीक चालवणाऱ्या मेरी यांनी मणि आण्टीचं हे तेल ' अ हण्ड्रेड हॅण्डस' या सामाजिक संस्थेला दिलं. ही सामाजिक संस्था गृहउद्योग करणाऱ्या महिलांच्या उत्पादनांचं प्रदर्शन भरवायची. त्या प्रदर्शनात त्यांनी मणि आण्टीचं तेलही ठेवलं. या तेलाची प्रसिध्दी अ हण्ड्रेड हॅण्डस या सामाजिक संस्थेच्या प्रदर्शनातून झाली आणि मणि आण्टीच्या तेलाला मागणी वाढू लागली.
Image: Google
आता मणि आण्टीच्या तेलाला मागणी खूफ आहे. पण वय आणि मर्यादित मनुष्यबळ यामुळे हर्बल तेलाचं उत्पादन त्या वाढवू शकत नाही. मणि आण्टीनं प्रसिध्दीला न हुरळून जाता गुणवत्तेकडे लक्ष दिलं आहे. त्यांनी आपल्या मर्यादा मान्य करुन हर्बल तेलाचं उत्पादन मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण वाढणारी मागणी आणि मर्यादित पुरवठा यांचा ताळमेळ कसा जमेल हे शेवटी मणि आण्टी यांच्यावरच अवलंबून आहे.