शिकायचं वेड काही जणांना शांत बसू देत नाही. लहानपणी शिक्षणाची इच्छा अर्धवट राहीली म्हणून एका आजीबाईंनी थेट वयाच्या ९२ व्या वर्षीत शाळेत प्रवेश घेतला. उत्तर प्रदेशातील बुलंद शहर याठिकाणी राहणाऱ्या या आजीबाई आपल्या नातवंडांना आणि पतवंडांना शाळेत जाताना पाहत होत्या. तेव्हा त्यांनाही शिक्षण घेण्याची इच्छा झाली. इच्छा झाल्यावर त्या शांत बसल्या नाहीत तर त्यांनी खरोखरीच शाळेत प्रवेश घेतला. शाळेच्या मुख्याध्यापकांनीही या वयस्कर महिलेच्या इच्छेला मान देऊन त्यांना शाळेत प्रवेश दिला. आपल्या पतवंडांच्या वयाच्या मुलांबरोबर वर्गात बसून या ज्येष्ठ महिलेने अभ्यासाचे धडे गिरवले (92 Years old Women attends primary school and gave exam in bundelkhandshahar Uttar Pradesh).
अक्षर ओळख झाल्यावर या महिलेने अतिशय उत्तमप्रकारे सलीमा खान हे आपले नाव लिहीण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर ती हळूहळू वाचायलाही शिकली आणि आता ही ९२ वर्षांची महिला पुस्तके अतिशय सहजरित्या वाचू शकते. याचे श्रेय तिने शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले. या महिलेने वयाच्या ९२ व्या वर्षी परीक्षाही दिली. परीक्षेच्या केंद्रावर ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. परीक्षेत आपल्याला किती येते आणि वयाच्या या टप्प्यावर आपण परीक्षा देऊ शकतो का हे अजमावून पाहण्यासाठी या महिलेने ही परीक्षा दिली. अशाप्रकारे परीक्षा देऊन आपल्याला आनंद होत असल्याचे ही महिला म्हणाली.
आपल्याला लहानपणापासून शिकण्याची इच्छा होती मात्र घराच्या आसपास शाळा नसल्याने शिकण्याची संधीच मिळाली नाही. वयाच्या १४ व्या वर्षी या महिलेचे लग्न झाले आणि त्यामुळे अंगावर जबाबदाऱ्या पडल्याने शिक्षणाची इच्छा मागेच पडली. काही वर्षांनी महिलेचा पती वारल्याने तिने स्वत:च्या हिमतीवर मुलांना आणि नातवंडंना शिकवले पण तिची शिक्षणाची इच्छा मात्र मागे पडत गेली. नवसाक्षर अभियानामध्ये ९२ व्या वर्षी महिलेने शिक्षण घेणे ही आमच्यासाठी खरंच अतिशय आनंदाची बाब असल्याचे शिक्षण अधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले. या जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार जणांना साक्षर केले असल्याचे पांडे म्हणाले.